मागील चार सत्रात शेअर मार्केटमध्ये झालेल्या घसरणीत अदानी ग्रुपच्या शेअर्सची दाणादाण उडाली. अदानी ग्रुपचे सर्वच्या सर्व सातही शेअर मागील चार सत्रात घसरले. यामुळे गुंतवणूकदारांचे जवळपास 2 लाख कोटींचे नुकसान झाले.
शेअर मार्केटमधील पझडीतून अदानी समूहाचे शेअर्स देखील सूटले नाहीत. अदानी विल्मर, अदानी पॉवर, अदानी ट्रान्समिशन यासह सर्वच शेअरमध्ये घसरण झाली.शुक्रवारच्या सत्रात अदानी पॉवरच्या शेअरमध्ये 5% लोअर सर्किट लागले होते. अदानी पॉवरचा शेअर 262.25 रुपयांपर्यंत खाली आला होता. 19 डिसेंबर 2022 नंतर अदानी पॉवरचा स्टॉक 14.23% ने घसरला आहे.
अदानी विल्मरचा शेअर 9.56% घसरणीसह 499.70 रुपयांवर स्थिरावला. अदानी ट्रान्समिशनचा शेअर 9.71% घसरणीसह 2272.30 रुपयांवर स्थिरावला. चार सत्रात हा शेअर 15% ने घसरला आहे. तसेच अदानी एंटरप्राईसेस या शेअरमध्ये 5.85% घसरण झाली. दिवसअखेर अदानी एंटरप्राईसेसचा शेअर 3640.95 रुपयांवर बंद झाला. चार सत्रात हा शेअर 14% ने घसरला आहे.
अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी पोर्ट्स हे शेअर 8 ते 9% ने घसरले आहेत. अदानी टोटल गॅसचा शेअर 3% ने घसरला. 19 डिसेंबर 2022 रोजी अदानी समूहाचे बाजार भांडवल एकूण 18.81 लाख कोटी इतके होते. ते शुक्रवार अखेर 16.80 लाख कोटी इतके कमी झाले आहे. यात अदानी एंटरप्राईसेसच्या बाजार भांडवलात सर्वाधिक घसण झाली.
वर्षभरात मात्र चमकदार कामगिरी
अदानी समूहाच्या शेअर्सची अखेरच्या आठवड्यात निराशाजनक कामगिरी झाली असली तरी वर्ष 2022 चा विचार केला तर सर्वच शेअर्सनी गुंतवणूकदारांना दमदार परतावा दिला आहे. वर्ष 2022 मध्ये आतापर्यंत अदानी एंटरप्राईसेसचा शेअर 115% ने वधारला आहे. अदानी विल्मर 92%, अदानी टोटल गॅस 90%, अदानी ग्रीन 39% , अदानी ट्रान्समिशन 36% आणि अदानी पोर्टचा शेअर 9% वधारला आहे.