इस्रायलचे भारतातील राजदूत नाओर गिलन यांनी बुधवारी सांगितले की, आमचे टाटा, कल्याणी, भेलसह सुमारे 80 भारतीय कंपन्यांसोबत संयुक्त उपक्रम आहेत. बंदरे हा अदानी समूहाचा मुख्य व्यवसाय आहे. मी त्यांना बंदरांच्या बाबतीत खूप चांगले काम करताना पाहतो. अदानी समूह इस्रायलमध्ये आणखी प्रकल्प शोधत आहे आणि मला आशा आहे की ते यशस्वी होतील.आमच्या दृष्टिकोनातून हे एक अतिशय महत्त्वाचे पाऊल आहे. हैफा बंदर ही आमची सामरिक संपत्ती आहे. अदानी समूहाकडे हैफा बंदर बनवण्याची क्षमता आहे. तसेच भारत आणि इस्रायलमधील व्यापार वाढवण्याची क्षमता आहे. अदानीच्या हैफा बंदर विकास कामावर इस्रायलच्या भारतातील राजदूत यांनी हे सांगितले आहे.
भारत आणि इस्रायल मुक्त व्यापार करार लवकरच अंतिम
भारत आणि इस्रायल मुक्त व्यापार करार लवकरच अंतिम होणार आहेइस्रायलचे राजदूत नॉर गिलन म्हणाले की, भारत आणि इस्रायलमधील द्विपक्षीय व्यापारी संबंध अधिक दृढ होणार आहेत. दोन्ही देश मुक्त व्यापार कराराला (FTA) अंतिम स्वरूप देण्यास उत्सुक आहेत. कारण यामुळे संपूर्ण व्यावसायिक संबंधांना अधिक गती मिळेल. भारत-इस्त्रायल संरक्षण करारात अदानी समूहाची बाजू घेतल्याच्या राहुल गांधींच्या आरोपासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना राजदूत म्हणाले की, इस्रायली कंपन्यांचे भारतीय कंपन्यांसोबत सुमारे 80 संयुक्त उपक्रम आहेत. ते म्हणाले की, संरक्षण संबंध केवळ एका कंपनीशी संबंधित नाहीत.
एकीकडे हिंडेनबर्ग रिसर्चच्या आरोपानंतर अदानी समूहाच्या अडचणीत सातत्याने वाढ होताना दिसत आहे. गेले महिनाभर नवनव्या आव्हानांची मालिका अदानी ग्रुपसमोर उभी ठाकली आहे. आरबीआय ने बँकाकडून अदानी ग्रुपच्या कर्जाचे डिटेल्स मागितले होते. आता सेबीने देखील एक महत्वाचे पाऊल उचलले आहे. बाजार नियामक सेबीकडून क्रेडिट रेटिंग एजन्सींकडून अदानी समूहाच्या कंपन्यांनी घेतलेल्या स्थानिक कर्ज आणि रोख्यांच्या रेटिंगची माहिती मागवण्यात आली आहे. तसेच, 25 जानेवारी 2023 पासून अदानी समूहाच्या शेअर्समध्ये 78 टक्क्यांपर्यंत घसरण झालेली बघ्याला मिळत आहे. सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) ने रेटिंग एजन्सींना सर्व थकबाकी रेटिंग, कोणतीही संभाव्य चर्चा आणि त्यांचा दृष्टीकोन अदानी समूहाच्या अधिकाऱ्यांसोबत शेअर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. परदेशी संस्थांनी रेटिंग कमी केले आहे. ओरिएंट सिमेंट या सीके बिर्ला समूहाच्या कंपनीने अदानी पॉवर महाराष्ट्र सोबतचा करार रद्द केला आहे. असे सांगण्यात आले की, अदानी समूह या करारासाठी आवश्यक मंजुरी मिळवण्यात अपयशी ठरला. अदानी पॉवरने व्यवहार पुढे न ठेवण्याची विनंती केली आहे, असे कंपनीने म्हटले आहे. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहासाठी हा एक धक्का मानला जात आहे.एकीकडे ही संकटांची मालिका सुरू असताना या सगळ्या स्थितीत इस्रायलच्या राजदूतांनी दाखवलेला विश्वास हा अदानी ग्रुपसाठी दिलासादायक ठरला आहे.