अदानी ग्रुपच्या शेअरमधील तेजीचा फायदा प्रमोटर्सनी उचलला आहे. एस. बी. अदानी फॅमिली ट्रस्टने आज गुरुवारी 2 मार्च 2023 रोजी शेअर मार्केटमध्ये अदानी ग्रुपचे 21 कोटी शेअर्स परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांन विकले. चार कंपन्यांचे शेअर्सचे हे ब्लॉक डिल 15446 कोटींचे होते.
आज सलग तिसऱ्या सत्रात अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. ही संधी हेरुन प्रमोटर्सनी शेअर्स विक्री केले. अदानी सूमहातील प्रवर्तकांची ही ट्रस्ट आहे. एस. बी. अदानी फॅमिली ट्रस्टने आजच्या सत्रात अदानी पोर्ट, अदानी एंटरप्राईज, अदानी ग्रीन एनर्जी आणि अदानी ट्रान्समिशन या चार कंपन्यांचे 21 कोटी शेअर्स विक्री केले. अमेरिकेतील कंपनी जीक्यूजीने हे शेअर्स खरेदी केले.
या ब्लॉक डीलमध्ये अदानी एंटरप्राईजेसचा शेअर 1410.36 रुपयांना जीक्यूजीने खरेदी केला. यासाठी 5460 कोटींचा ट्रेड झाला. अदानी पोर्टचा शेअर 596.20 रुपयांनी खरेदी केला. यासाठी जीक्यूजीने 5282 कोटी मोजले. अदानी ट्रान्समिशनचे 1898 कोटींचे शेअर्स खरेदी करण्यात आले. अदानी एनर्जीचे 2806 कोटींचे शेअर्स खरेदी करण्यात आले आहे.
अदानी समूहाने कर्जाची व्यवस्था केल्यानंतर शेअर मार्केटमध्ये अदानी ग्रुपच्या शेअरमध्ये तेजी दिसून आली आहे. अदानी ग्रुपमधील अदानी एंटरप्राईजेस, अदानी पोर्ट, अदानी ग्रीन, अदानी ट्रान्समिशन हे शेअर 3 ते 5% ने वधारले होते. या मोठ्या व्यवहारांना शेअर मार्केटमधील इतर गुंतवणूकदारांमध्ये अदानी समूहाबाबत सकारात्मक चित्र निर्माण झाल्याचे बोलले जाते.
आजचे जीक्यूजी सोबतचे शेअर विक्रीचे डील अदानी ग्रुपसाठी महत्वाचे आहे. जीक्यूजी ग्रुप हा अदानी समूहाचा महत्वाचा भागीदार असून त्याची इन्फ्रा, सस्टेनेबल एनर्जी, लॉजेस्टिक, एनर्जी ट्रान्समिशनमध्ये गुंतवणूक आहे. आजच्या ब्लॉक डीलमुळे जागतिक पातळीवर अदानी समूहाबाबत एक सकारात्मक वातावरण तयार होईल, असा विश्वास अदानी ग्रुपचे सीएफओ जग्शिंदर सिंग यांनी व्यक्त केला.
मागील काही दिवसांपासून अदानी समूह कर्जफेडीबाबत आक्रमक पावले उचलत आहे. अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये आज आलेल्या तेजीमागे कंपनीला सिंगापूरमध्ये गुंतवणूकदारांचा मिळालेला प्रतिसाद आहे. सिंगापूर आणि हॉंगकॉंगमध्ये अदानी ग्रुपने आयोजित केलेल्या फिक्स्ड इन्कम रोड शोमध्ये गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. याशिवाय अदानी ग्रुपबाबत सकारात्मक घडामोडी शेअर्सला तेजीच्या वाटेवर नेण्यास फायदेशीर ठरल्या. इकॉनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार दोन गुंतवणूकादारांनी अदानी समूहाला 800 मिलियन डॉलर्सचे तातडीने कर्ज सुविधा उपलब्ध होणार आहे.