Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

2 लाख रुपयांच्या गुंतवणुकीवर 90 हजार व्याज आणि मॅच्युरिटीनंतर मुद्दलही परत मिळवा, जाणून घ्या कालावधी

Post Office Time Deposit Scheme

Image Source : www.businessleague.in

Post Office Saving Scheme: पोस्टाच्या या बचत योजनेमध्ये 2 लाख रुपयांची गुंतवणूक करून त्यावर 90 हजार रुपयांपर्यंत व्याज मिळू शकते. तसेच या योजनेचा कालावधी पूर्ण झाला की, मुद्दल 2 लाख रुपये देखील परत मिळणार.

Post Office Time Deposit Scheme: तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल आणि त्या गुंतवणुकीवर फिक्स व्याजदर अपेक्षित आहे. तर तुमच्यासाठी पोस्टाच्या बऱ्याच बचत योजना उपलब्ध आहेत. त्यातलीच एक योजना आहे;  टाईम डिपॉझिट योजना (Time Deposit Scheme). या योजनेवर सरकार साधारण 7.5 टक्क्यांपर्यत व्याज देतं. याव्यतिरिक्त यातून तुम्हाला टॅक्समध्ये सवलत देखील मिळवता येते.

टाईम डिपॉझिट या योजनेबद्दल सांगायचे झाल्यास यामध्ये गुंतवणूकदाराने एकत्रित 2 लाख रुपये गुंतवले, तर त्याला त्यावर 90 हजार रुपयांपर्यंत व्याज मिळू शकते. त्याशिवाय यामध्ये गुंतवलेली मूळ रक्कम योजनेचा कालावधी पूर्ण झाल्यावर परत मिळते. चला तर या योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेऊ.

योजनेचा कालावधी 1 ते 5 वर्षे

पोस्टाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट (Post Office Time Deposit) योजनेमध्ये 4 वेगवेगळ्या कालावधीकरीता खाते सुरू करता येते. याचा प्रत्येक वर्षाचा व्याजदर हा वेगळा आहे. एका वर्षासाठी 6.8 टक्के, दोन वर्षासाठी 6.9 टक्के, 3 वर्षासाठी 7 टक्के आणि 5 वर्षासाठी 7.5 टक्के व्याजदर मिळतो. या योजनेवरील व्याज हे त्रैमासिक मोजले जातात आणि प्रत्येक वर्षाला ते गुंतवणूकदाराच्या खात्यात जमा केले जातात. यामध्ये किमान 1000 रुपयांपासून गुंतवणूक करता येते.

2 लाखाच्या गुंतवणुकीवर 90 हजार व्याज

पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट कॅल्क्युलेटरनुसार, जर एखाद्या गुंतवणूकदाराने या योजनेमध्ये 5 वर्षांसाठी 2 लाखांची गुंतवणूक केली, तर त्याला त्या गुंतवणुकीवर 89,990 रुपये व्याज म्हणून मिळतील. तसेच योजनेचा कालावधील पूर्ण केल्यावर त्याला त्याची मूळ मुद्दल 2 लाख रुपये देखील परत मिळणार.

5 वर्षांच्या गुंतवणुकीवर टॅक्स सवलत

पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट योजनेमध्ये 5 वर्षांसाठी खाते सुरू केले तर त्यावर गुंतवणूकदाराला कर सवलत देखील मिळते. या योजनेत केलेल्या गुंतवणुकीवर सेक्शन 80C अंतर्गत सवलत मिळते. यामध्ये वैयक्तिक किंवा संयुक्त खाते (Individual or Joint Account) ओपन करता येते. या योजनेत गुंतवणूक केल्यावर त्यामधून बाहेर पडायचे असेल तर, किमान  6 महिन्यानंतरच यातून बाहेर पडता येते.

एकापेक्षा जास्त खाती सुरू करण्याची सुविधा

पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक केल्यानंतर गुंतवणूकदाराला योजनेचा कालावधी संपल्यानंतर त्यात पुन्हा नव्याने वाढ करता येते. तसेच गुंतवणूकदार स्वत:च्या नावाने एकावेळी अनेक खाती या योजनेसाठी सुरू करू शकतो.

पोस्ट ऑफिस टाईम डिपॉझिट स्कीममध्ये गुंतवणूक केल्यानंतर त्यावर जे वार्षिक व्याज मिळते. ते गुंतवणूकदाराने आपल्या खात्यात ट्रान्सफर करून घेतले नाही तर ते खात्यामध्ये तसेच राहतात. त्या रकमेवर पोस्ट ऑफिस व्याज देत नाही.