Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Crypto investment scam : क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक करताय? मुंबईतल्या 8 डॉक्टरांची दीड कोटी रुपयांनी झालीय फसवणूक

Crypto investment scam : क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक करताय? मुंबईतल्या 8 डॉक्टरांची दीड कोटी रुपयांनी झालीय फसवणूक

Crypto investment scam : क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून तब्बल 8 डॉक्टरांची फसवणूक करण्यात आली. आता या भल्या मोठ्या घोटाळ्याची चौकशी पुणे पोलिसांनी सुरू केलीय. चांगला परतावा देण्याचं आमिष दाखवून पैसे लुबाडण्यात आले होते. मुंबईतल्या आठ डॉक्टरांची या दीड कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली होती.

क्रिप्टो करन्सी गुंतवणूक (Crypto investment) घोटाळ्याची व्याप्ती वाढत चालली आहे. तब्बल दीड कोटी रुपयांच्या फसवणुकीचा हा प्रकार पुण्यात घडला. नोंदणीकृत दोन कंपन्यांनी गुंतवणूकदारांनी विकसित केलेल्या अॅप्लिकेशनद्वारे बिटकॉइन्समधल्या गुंतवणुकीवर चांगला परतावा (Return) देण्याचं आमिष दाखवलं. डॉक्टरांकडून पैसे मागितले. ही रक्कम तब्बल दीड कोटी रुपये होती. मुंबईतल्या एका डॉक्टरसह किमान आठ गुंतवणूकदारांनी आता कंपनीच्या मालकांकडून आपली फसवणूक झाल्याचं सांगत पोलिसांकडे धाव घेतलीय. मुंबईतल्या मुलुंड भागात संबंधित डॉक्टर राहतो. या डॉक्टरनं आरोपी कंपन्यांमार्फत सुमारे 25 लाख रुपयांची गुंतवणूक केल्याची तक्रार दाखल केली. त्यानंतर या प्रकरणी एफआयआर (First Information Report) नोंदवण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या दोन कंपन्यांमार्फत फसवणूक झाली, त्या दोन्ही कंपन्या पुण्यातल्या एका पत्त्यावर नोंदणीकृत आहेत. त्यांनी गेल्या वर्षी मे महिन्याच्या सुमारास या सर्वांकडून गुंतवणूक करण्यास सुरुवात केली होती.

ऑक्टोबर 2022पासून फसवणूक करणारे फरार 

दोन्ही कंपन्यांच्या मालकांनी संबंधित व्यक्तींना बिटकॉइन्सद्वारे गुंतवणूक करण्यास सांगितले. ही गुंतवणूक त्यांनी डेव्हलप केलेल्या अॅपच्या माध्यमातून करण्यास सांगितलं. पहिल्या योजनेतल्या गुंतवणुकीवर या कंपन्यांनी 12 महिन्यांत पैसे दुप्पट करण्याचं आश्वासन दिलं. तर दुसऱ्या योजनेत, कंपन्यांनी 15 महिन्यांच्या कालावधीसाठी प्रतिमाह गुंतवलेल्या रकमेच्या 15 टक्के देण्याचं आश्वासन दिलं. या दोन्ही योजनांसाठी संबंधित कंपन्यांनी गेल्या वर्षीच्या मे महिन्यापासून पैसे घ्यायला सुरुवात केली. पाच महिने हे सर्व झालं मात्र पुढे ऑक्टोबरच्या सुमारास या लोकांनी आपल्या ऑफिसमधून पळ काढला. ऑक्टोबर 2022पासून फसवणूक करणारे फरार आहेत, असं येरवडा पोलीस ठाण्यातल्या एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

तक्रारींची संख्या वाढली

या घोटाळ्यात आतापर्यंत आठ गुंतवणूकदार समोर आले आहेत. त्यांनी आपली 1.47 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचं सांगितलं, असं पोलिसांनी म्हटलंय. काही गुंतवणूकदार मुलुंड, पनवेल, डोंबिवली आणि इतर मुंबईतल्या विविध ठिकाणचे आहेत. काही तर औरंगाबादसह इतर परिसरातलेदेखील आहेत. खरं तर आत्ता केवळ आठ जण समोर आलेत. मात्र हा आकडा मोठा असू शकतो. फसवणूक झालेल्यांनी समोर येवून तक्रार दाखल केली, तर याविषयी अधिक सविस्तर तपास करता येईल. मात्र सध्यातरी आम्ही विविध लीड्सवर काम करत असल्याचं पुणे पोलिसांनी म्हटलं आहे. क्रिप्टोकरन्सी, त्यातली गुंतवणूक, मोठ्या परताव्याचं आश्वासन आणि त्यामाध्यमातून फसवणूक अशा प्रकरणांच्या तक्रारींची संख्या 2021मध्ये 71 होती. मात्र पुढच्याच वर्षी म्हणजे 2022मध्ये ती 154वर पोहोचली.

सायबर ठगांपासून सावधान

अधिकाऱ्यांनी सांगितलं, की अधिक चांगला परतावा मिळवण्यासाठी विविध आमिषं दाखवली जातात. व्हर्च्युअल करन्सी हे तर आता मोठ्या प्रमाणात वापरलं जातंय. अशाप्रकारे गुंतवणूक करणाऱ्या लोकांच्या वाढत्या संख्येमुळे तसे प्लॅटफॉर्मही वाढले आहेत. हे जाळं खूप मोठं असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. सायबर प्रकारातल्या गुन्ह्यांचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या फसवणुकी तीन प्रकारे केल्या गेल्या आहेत. काही प्रकरणांमध्ये सायबर गुन्हेगार माहीत असलेल्या क्रिप्टोकरन्सीत गुंतवणूक करण्यास सांगून त्या गुंतवणुकीवर उच्च परतावा देण्याचं आश्वासन देणाऱ्या लोकांकडून गुंतवणूक शोधतात. काहीवेळा तर हे ठग आपण स्वत: क्रिप्टोकरन्सी तयार केल्याचा दावा करतात आणि या माध्यमातून गुंतवणूकदारांना फसवतात. तर काहीवेळा हे ठग सुप्रसिद्ध व्हर्च्युअल चलनांसाठी फसव्या एक्सचेंज करतात आणि गुंतवणूकदारांचे पैसे घेऊन फरार होतात.