गुगलमध्ये वरिष्ठ व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या एका व्यक्तीला कंपनीच्या खर्चात कपात करण्याच्या प्रक्रियेचा भाग म्हणून नुकतेच काढून टाकण्यात आले. पण हार न मानता त्यांनी स्वतःची कंपनी काढण्याचा निर्णय घेतला. हेन्री कर्क नावाच्या या व्यक्तीला अशाच प्रकारे कामावरून काढण्यात आलेल्या इतर अनेक कर्मचाऱ्यांकडूनही पाठिंबा मिळत आहे. आठ वर्षे गुगलवर काम करणारे कर्क कंपनीने कामावरून काढलेल्या 12 हजार कर्मचाऱ्यांपैकी एक होते. कर्क म्हणाले की त्यांनी स्वत: ला आणि त्यांच्या टीमला न्यूयॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्कोमध्ये डिझाइन आणि डेव्हलपमेंट स्टुडिओ उभरायचा आहे. यासाठी त्यांच्याकडे सहा आठवडे आहेत.
कर्क यांनी याविषयी आपली भावना शेअर केली आहे. मार्चमध्ये Layoff नोटिसनंतरची 60-दिवसांची अंतिम मुदत संपणार आहे. त्यापूर्वी कंपनी स्थापन करण्याचा कर्क यांचा मानस आहे. ते म्हणाले, 'माझ्याकडे 52 दिवस शिल्लक आहेत. त्यांनी सहकाऱ्यांना आवाहन केले की, मला तुमच्या मदतीची गरज आहे. माझा नेहमीच विश्वास आहे की, कठोर परिश्रम तुम्हाला आयुष्यात खूप पुढे नेईल. सध्याच्या परिस्थितीमुळे त्या विश्वासावर शंका निर्माण होऊ शकते, परंतु हा माझा अनुभव आहे की ही जीवनातील आव्हाने अद्वितीय संधी देतात. गेल्या आठवड्यात सोशल मिडियावर त्यांनी हे सांगितले.
गूगलच्या 6 माजी कर्मचाऱ्यांची मिळाली साथ
या उपक्रमात गुगलचे सहा माजी कर्मचारीही त्यांच्यासोबत सामील होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. आज मी एक झेप घेत आहे आणि या कठीण परिस्थितीचे संधीत रूपांतर करत आहे. माझे भविष्य घडवण्यासाठी मी 6 गूगलच्या माजी कर्मचाऱ्यांसोबत सोबत काम करत आहे. आम्ही न्यूयॉर्क आणि सॅन फ्रान्सिस्कोमध्ये डिझाइन आणि विकास स्टुडिओ सुरू करत आहोत. सध्या असे काही करण्यासाठी ही कदाचित सर्वात वाईट वेळ आहे. पण ही सर्व प्रक्रिया रोमांचक आणि आव्हानात्मक आहे, असे ते म्हणाले. त्यांच्या स्टार्टअपमध्ये ते इतर कंपन्यांच्या अॅप्स आणि वेबसाइट्ससाठी संशोधन साधने डिझाइन करू इच्छित आहेत. कर्क म्हणाले, "Google च्या सात उत्कृष्ट माजी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले आहे. ते महत्त्वाकांक्षी सॉफ्टवेअर प्रकल्पांसाठी संशोधन, डिझाइन आणि विकास सुविधा सुरू करण्यास उत्सुक आहेत."
12 हजार जणांना गमवाव्या लागल्या नोकऱ्या
गुगल समूहामधील अल्फाबेट कंपनीने 12 हजार कर्मचारी कपात केली आहे. एकूण कर्मचाऱ्यांच्या 6 टक्के इतकी ही कर्मचारी कपात आहे. याविषयीचा निर्णय कंपनीने यापूर्वीच घेतला आहे. भारतीय वंशाचे सुंदर पिचाई हे अल्फाबेट कंपनीचे सीईओ आहेत. मागील काही महिन्यांपासून आयटी क्षेत्रातील अनेक कंपन्यांकडून मोठी नोकरकपात करण्यात आली आहे. जागतिक महामंदी आणि रोडावलेल्या उत्पन्नामुळे कंपन्यांनी नोकर कपातीवर भर दिला असल्याचे सांगण्यात आले आहे. अल्फाबेटच्या देशभरातील विविध कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा समावेश नोकर कपातीमध्ये करण्यात आला आहे. कर्मचारी कपातीच्या निर्णयाची संपूर्ण जबाबदारी माझी असल्याचे सुंदर पिचाई यांनी यावेळी म्हटले होते. अमेरिकेतील सर्वाधिक कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या यामध्ये जाणार आहेत.
ज्या कर्मचाऱ्यांची कामगिरी चांगली नाही, अशा 6 टक्के कर्मचाऱ्यांना अल्फाबेट कमी करण्याच्या तयारीत आहे, अशी बातमी मागील काही दिवसांपासून वृत्तपत्रांमध्ये आली होती. अखेर ही बातमी खरी ठरत गुगलकडून याविषयीचा निर्णय घेण्यात आला. गुगलमध्ये दीड लाखांपेक्षाही जास्त कर्मचारी आहेत. तसेच कर्मचाऱ्यांना दोन लाख डॉलरपेक्षा जास्त सरासरी पगार देण्यात येतो. अॅमेझॉन, मेटा, मायक्रोसॉफ्ट, ट्विटर यांच्या पंगतीमध्ये गुगलही जाऊन बसली आहे. या सर्व बलाढ्य आयटी कंपन्यांनी कर्मचारी कपात गूगलच्या आधी केली आहे. मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी 13 टक्के म्हणजेच 11 हजार कर्मचारी कपात केली आहे. तर ट्विटरचे प्रमुख एलन मस्क यांनी साडेसात हजार कर्मचारी कपात केली आहे. अॅमेझॉननेही 18 हजार कर्मचारी कमी करण्याविषयी यापूर्वीच सांगितले आहे. तसेच, मायक्रोसॉफ्टनेही 10 हजार कर्मचाऱ्यांना नारळ दिला.
एकीकडे ही कर्मचारी कपात होत असताना काही जण यामुळे खचून जात आहेत. काही जण दुसरी नोकरी शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा स्थितीत कर्क यांच्याप्रमाणे काही जण सहकाऱ्यांना साथीला घेत स्वत:ची कंपनी सुरू करून खंबीरपणे उभे राहण्याचा प्रयत्न करत आहेत.