Railway Minister Ashwini Vaishnav: देशातील दळणवळण क्षेत्राचे जाळे मजबूत आणि विकसित व्हावे यासाठी रेल्वे मार्गाचा विकास देशाअंतर्गत केला जात आहे. 2023 पर्यंत 50 लाख कोटी प्रस्तावित गुंतवणूकीद्वारे रेल्वेला देशाच्या विकासाचे इंजिन बनवण्याचा आराखडा 2019 च्या संकल्पात सादर करण्यात आला होता. त्यानुसार आतापर्यंत भारतामध्ये सध्या 10 पेक्षा अधिक वंदे भारत एक्सप्रेस धावत आहेत. अत्याधुनिक उपकरनांनी सुसज्ज असलेल्या या सेमी हाय स्पीड ट्रेन मुळे प्रवाशांचा प्रचंड वेळ वाचण्यास मदत झाली. तसेच अनेक शहरांसोबतची कनेक्टीव्हीटी वाढली. परंतु, वंदे भारत एक्सप्रेसवर विविध ठिकाणी काही समाजकंटकांनी दगडफेक केल्याने 2019 पासून रेल्वेला 55.60 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी पावसाळी अधिवेशनात संसदेत ही माहिती दिली.
भारतीय रेल्वेचं 55.60 लाखांचं नुकसान
वंदे भारत एक्सप्रेसवर होणाऱ्या दगडफेक बाबत अधिक माहिती देतांना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, हल्ला करणाऱ्या आणि सरकारी संपत्तीला नुकसान पोहचविणाऱ्या 151 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. परंतु वर्ष 2019 ते 2023 च्या जून महिन्यापर्यंत नागरिकांनी केलेल्या या दगडफेकमुळे भारतीय रेल्वेचं 55.60 लाखांचं नुकसान झालं आहे. परंतु, या काळात वंदे भारत एक्सप्रेस अंतर्गत कुठल्याही प्रवाशाचे सामान चोरीला गेले नाही आणि ही एक सकारात्मक बाब आहे.
ऑपरेशन साथी
रेल्वेवर दगडफेक किंवा इतर कुठला हल्ला होत असल्यास दरम्यान रेल्वेत प्रवास करणाऱ्या नागरिकांच्या जिवाला धोका असतो. त्यामुळे लोकांच्या सुरक्षेबाबत आणि तोडफोड करण्याच्या विरोधात लोकांना जागरुक करण्याकरीता अभियान राबविल्या जात आहे. लोकांना या गोष्टींचे महत्व पटवून देण्याकरीता ऑपरेशन साथी राबविल्या जात आहे. रेल्वे लाइनच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांपासूनच रेल्वेला अधिक धोका असतो, ही बाब लक्षात घेऊन आरपीएफ, जीआरपी, जिल्हा पोलिस यंत्रणा, सामाजिक संस्था आणि स्थानिक प्रशासन ऑपरेशन साथी राबविण्यात मदत करीत आहेत.
सध्या भारतातील अनेक राज्यांमध्ये वंदे भारत एक्सप्रेस धावत आहे. भविष्यात देशातील सर्वच रेल्वे स्थानकांवरुन ही ट्रेन धावणार अशी अपेक्षा आहे. तसेच केंद्र सरकार वंदे भारत स्लिपर कोच देखील आणण्याच्या तयारीत आहे. अशा परिस्थितीत वंदे भारत एक्सप्रेसवर होणारे हल्ले थांबविणे हे एक चॅलेंज रेल्वे मंत्रालयापूढे उभे आहे.