जागतिक अर्थव्यवस्थेवर कोरोनाआधीही अनेक संकटे आली आहेत. महामंदीमुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले. कर्जफेड करणं उद्योगांना अशक्य झालं होतं. 2008 आणि 1990 साली आलेल्या मंदीमध्ये अनेक कंपन्या बुडाल्या. मात्र, आता पुन्हा कॉर्पोरेट कंपन्या अडचणीत आल्याचे ब्लूमबर्ग या वृत्तवाहिनीने म्हटले आहे.
जगभरातील कंपन्यांवर 500 बिलियन डॉलरचे विविध प्रकारचे कर्ज असून हे फेडणं कंपन्यांना अशक्य होत आहे. त्यामुळे दिवाळखोरीत निघणाऱ्या कंपन्यांचं प्रमाण येत्या काळात आणखी वाढेल, असेही ब्लूमबर्गने म्हटले आहे.
आधीच्या संकटांपेक्षा आताची स्थिती गंभीर
Cleary Gottlieb ही दिवाळखोरीची प्रकरणं हाताळणारी जगातील प्रमुख लॉ फर्म आहे. या कंपनीचे रिचर्ड कूपर यांनी सुद्धा यास दुजोरा दिला आहे. 2008 ची महामंदी, 2016 सालातील तेल संकट, कोरोना सारख्या संकटामध्ये रिचर्ड यांनी कंपन्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर निघण्यास मदत केली. मात्र, यावेळचे संकट आधीच्या संकटापेक्षा वेगळे असून पुढे धोका असल्याचे सूचित केले.
कोरोनाकाळात कॉर्पोरेट कंपन्यांना मोठ्या प्रमाणात स्वस्तात कर्ज मिळाले. मात्र, त्यानंतर महागाई वाढू लागल्याने जगभरातील प्रमुख बँकांनी व्याजदर वाढवण्यास सुरूवात केली. त्यामुळे कर्जाचा आकडा आता फुगला आहे. हे कर्ज फेडण्यास कॉर्पोरेट कंपन्यांच्या नाकीनऊ येत असल्याचे ब्लूमबर्गने तयार केलेल्या अहवालात म्हटले आहे.
कोणत्या उद्योगांवर सर्वाधिक कर्जाचा बोजा (बिलियन डॉलरमध्ये)
अमेरिकेत जोखमीच्या कर्जाचे प्रमाण पुन्हा वाढत आहे. ही आकडेवारी 2008 च्या मंदीपेक्षा जास्त आहे. चीन आणि युरोपातील अर्थव्यवस्थांची वाढ खुंटली आहे. त्यामुळे कंपन्यांना व्यवसायाच्या संधीही कमी होत आहेत. अमेरिकेत 2021 नंतर 360 टक्क्यांनी अडचणीतील कर्जांची संख्या वाढली आहे. म्हणजेच या उद्योगांना कर्ज फेडणे अशक्य होत आहे.
मंदीत जाहिरातीवरील खर्चात कपात
जेव्हा आर्थिक मंदी येते तेव्हा कंपन्या सर्वप्रथम जाहिरातीवर खर्च कमी करतात. सध्या जगभरातील कॉर्पोरेट कंपन्यांवरील कर्जाचा बोजा वाढत असल्याने जाहिरातीवरील खर्च कमी केला आहे. त्यामुळे उत्पन्न कमी झाल्याने मीडिया क्षेत्रातील कंपन्याही दिवाळखोरीत निघण्याचा मार्गावर आहे.