मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. मध्यमवर्गीय, चाकरमानींपासून ते देशातल्या सर्वाधिक मोठ्या उद्योजकांनीही या शहराला आपलं मानलंय. इथल्या रिअल इस्टेट क्षेत्राची तुलना तर फक्त जगात न्यूयॉर्क शहराशीच होऊ शकते. एकमेकांना लागून उभ्या असलेल्या चाळी आणि इमारती या शहराची ओळख आहेत. तर दुसरीकडे गगनचुंबी इमारती आणि बंगले भुरळ पाडणारे आहेत.
बॉलिवूड सेलिब्रिटी आणि उद्योगपतींचे बंगले बाहेरून बघायला अनेकदा मुंबईकर हौसेनं रविवारी बाहेर पडतो. पण, आधीच रिअल इस्टेट महाग असलेल्या मुंबईत या मोठ्या बंगल्यांच्या किमती किती असतील तुम्हाला माहीत आहे का? आज बघूया मुंबईतील 5 महागडी घरं, त्यांच्या किंमती आणि त्यांचे मालक कोण?
Table of contents [Show]
अँटिलिया टॉवर
मुंबईतील सर्वात महागड्या बंगल्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर अँटिलिया बंगला (Antilia Tower) आहे. इतकेच नाही तर जगातील सर्वात महागड्या बंगल्यांच्या यादीतही याचा समावेश करण्यात आला आहे. हा बंगला भारतीय अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचा आहे. अँटिलिया हा मुंबईच्या दक्षिण भागात असलेल्या अल्टामाउंट रोडवर मोठ्या दिमाखात उभा आहे.
या इमारतीत 27 मजले आणि 9 हाय स्पीड लिफ्ट देण्यात आल्या आहेत. यात एक बहुमजली गॅरेज देखील आहे, ज्यामध्ये 160 पेक्षा जास्त कार एकावेळी सामावू शकतात, याशिवाय 3 हेलिपॅड देखील या इमारतीवर आहेत, जिथून मुंबईचे विस्तीर्ण स्वरूप आणि समुद्राचा विलोभनीय देखावा पाहायला मिळतो.
ही गगनचुंबी इमारत 37,000 चौरस मीटर असून यामध्ये 600 हून अधिक कर्मचारी काम करतात. या इमारतीच्या आर्किटेक्चरल डिझाईनमध्ये अनेक मौल्यवान वेगवेगळे दगड आणि संगमरवरीचा वापर करण्यात आला आहे. Magic Bricks ने दिलेल्या माहितीनुसार या इमारतीची किंमत 15,000 कोटी रुपये इतकी आहे.
जेके हाऊस
सर्वात महागड्या बंगल्यांच्या यादीत जेके हाऊसचा (JK House) दुसरा क्रमांक लागतो. मुंबईच्या ब्रीच कँडी येथील प्राईम लोकेशनवर हा बंगला आहे. रेमंड, चेअरमन अँड चीफ गौतम सिंघानिया (Raymond, Chairman and Chief Gautam Singhania) हे या बंगल्याचे मालक आहेत. या बंगल्यात एक संग्रहालय उभारण्यात आलंय, ज्यामध्ये विविध फॅब्रिक मटेरियल, कुटुंबाचे फोटो, प्रमाणपत्रे आणि व्यवसायात वापरण्यात आलेली उपकरणं आठवण म्हणून ठेवण्यात आली आहेत.
6,000 चौरस फुटांमध्ये पसरलेल्या या बंगल्यात 30 पेक्षा जास्त मजले आहेत. त्यापैकी सहा मजले हे पार्किंगसाठी राखून ठेवण्यात आलेत. अगदी राजेशाही थाटाप्रमाणे या बंगल्याच्या बांधकामात सुमारे 350 टन संगमरवरी दगडाचा वापर करण्यात आला आहे.
स्विमिंग पूल, जिम, स्पा आणि हेलिपॅड अशा अनेक सुसज्ज सुविधांनी हा बंगला सजलेला आहे. विशेष म्हणजे प्रत्येक निवासी युनिटला स्वतःचं टेरेस आहे, आणि त्याला प्रायव्हेट गार्डन सुद्धा देण्यात आलंय. Magic Bricks ने दिलेल्या माहितीनुसार या बंगल्याची किंमत 6,000 कोटी रुपये आहे.
अबॉड हाउस
धीरूभाई अंबानींचे सुपुत्र आणि मुकेश अंबानींचे भाऊ अनिल अंबानींची अबॉड हाउस (Abode House) ही इमारत महागड्या बंगल्यांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. ही उंच इमारत वांद्र्यातील पाली हिल (Pali Hill, Bandra) येथे आहे.
या आलिशान इमारतीत स्विमिंग पूल, जीम, स्पा, काही हेलिकॉप्टरसह हेलिकॉप्टर पॅड यांचा समावेश आहे. 1600 स्क्वेअर फुटाच्या या इमारतीची किंमत Magic Bricks ने दिलेल्या माहितीनुसार 5,000 कोटी रुपये आहे.
लिंकन हाऊस
एका ब्रिटिश वास्तुविशारदाने 1993 मध्ये वांकानेरच्या महाराजांसाठी बांधलेली लिंकन हाऊस (Lincoln House) ही वास्तू देखील या यादीत चौथ्या क्रमांकावर येतीये. अब्जाधीश सायरस पूनावाला (Cyrus Poonawalla) हे लिंकन हाऊस या भव्य संपत्तीचे मालक आहेत.
Magic Bricks ने दिलेल्या माहितीनुसार 2015 मध्ये त्यांनी ही मालमत्ता 750 कोटी रुपयांना विकत घेतली होती. 50,000 चौरस फुटांचे हे घर मुंबईच्या ब्रीच कँडी परिसरात आहे. ज्यामध्ये अनेक सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत.
जटिया हाऊस
मलबार हिलच्या उंचावर असलेला जटिया हाऊस (Jatia House) हा मुंबईतील पाचवा महागडा बंगला आहे. हा बंगला आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला (Kumar Mangalam Birla, Aditya Birla Group chairman) यांच्या मालकीचा आहे. 30,000 चौरस फुटांच्या या बंगल्यामधून समुद्राचं विहंगमय दृश्य पाहायला मिळतं.
या दोन मजली बंगल्यामध्ये एकूण 20 बेडरूम्स आहेत. एक मोठं स्विमिंगपूल, वेगवेगळ्या फुलझाडांनी सजलेलं एक सुंदर गार्डनही इथे पाहायला मिळेल. या बंगल्यात 500 ते 700 लोकं आरामात सहज सामावू शकतात. विशेष म्हणजे या बंगल्याचे इंटेरिअर हे सागवानाच्या लाकडापासून तयार करण्यात आलंय. Magic Bricks ने दिलेल्या माहितीनुसार 2015 साली हा बंगला 425 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आला होता.