Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Drugs Quality test fail : सावधान! भारतीयांकडून सर्रास घेतली जाणारी 48 औषधं गुणवत्ता चाचणीत फेल

CDSCO Report

Drugs Quality test fail : सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून वेळोवेळी औषधांची गुणवत्ता तपासून त्या संदर्भात अहवाल प्रकाशित केला जातो. यामुळे औषधांची गुणवत्ता कायम राहण्यास मदत होते. तसेच बनावट औषध विक्रेत्यांवरसुद्धा योग्य ती कारवाई होण्यास मदत होते. या माध्यमातून रूग्णांचे हित साधण्यास मदत होते.

Drugs Quality test fail : ग्वाफेनेसिन या कफ सिरप विरोधात WHO ने धोक्याचा इशारा दिला आहे. त्यानंतर आता भारतामध्ये सर्रास विक्री केल्या जाणाऱ्या 48 औषधं सुद्धा अडचणीत आली आहेत. औषधांची गुणवत्ता चाचणी तपासणाऱ्या सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनने (CDSCO) आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या अहवालामधून ही बाब उघडकीस आली आहे.  

सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशनकडून नुकताच नियमीत वापरातील एकुण 1,497 औषधांची गुणवत्ता तपासण्यात आली. त्यापैकी 48 औषधं या गुणवत्ता चाचणीमध्ये फेल ठरली आहेत.

कोणत्या औषधांचा आहे समावेश

या 48 औषधांमध्ये व्हिटामिन सी, व्हिटामिन बी 12, फॉलिक अॅसिड, कॅल्शियम, व्हिटामिन D3, एपिलेप्सी ड्रग, हायपरटेन्शन ड्रग संबंधित टेलमा, तेलमिसार्टन आणि अमलोडिपिन, अँटी-डायबिटीज ड्रग, एचआयव्ही वरील औषधं, नियासीनामाइड इंजेक्शन अशा औषधांचा समावेश आहे.

औषध कंपन्यांचं मत 

        
सीडीएससीओ संस्थेच्या अहवालानंतर ब्लडप्रेशर संबंधित टेलमा-एएम या औषधांची निर्मिती करणाऱ्या  ग्लेनमार्क कंपनीने आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, सीडीएससीओ कडून तपासण्यात आलेल्या मार्च महिन्यातील औषधांची बॅच क्रमांक 18220076 मधली औषधं ही बनावट असून ती ग्लेनमार्क कडून बनवण्यात आलेली नाहीयेत. त्यामुळे ही बनावट औषधं बनवणाऱ्या कंपनीचा तपास करून कारवाई करावी अशी विनंती सीडीएससीओ संस्थेकडे केली आहे.

दरम्यान, अबॉट इंडिया लिमिटेड कंपनीकडून विशेष नोटिस जारी करून बॅच क्र. AEJ0713 मधील औषधं बाजारामधून परत मागवली आहेत. ही औषधं हायपरथायरोडीझमच्या उपचारासाठी वापरली जातात. या बॅचमधली औषधं ही मध्यप्रदेश व तेलंगणामध्ये वितरीत केली गेल्याने त्या राज्यातल्या वितरकांना तशी नोटीस देण्यात आली आहे.

शेअरवरील परिणाम

दरम्यान, सीडीएससीओ संस्थेच्या अहवालानंतर  अबॉट इंडिया लिमिटेड कंपनीला बाजारातून आपली एक संपूर्ण औषधांची बॅच ही परत मागवावी लागली आहे. यामुळे या कंपनीच्या शेअर्सवर सुद्धा आज नकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून येतंय. आज या कंपनीच्या शेअर मध्ये 80.85 ने घसरण झाली आहे.

मात्र, ग्लेनमार्क कंपनीच्या शेअर्सवर कोणताही नकारात्मक परिणाम झालेला नाहीये. या कंपनीचा आजच्या शेअरची किंमत 526 असून यामध्ये 4.75 रूपयाची वाढ झाली आहे. 

फार्मा इंडस्ट्रीवर होणारा परिणाम

कोरोना काळामध्ये भारतामध्ये मास्क, पीपीई किट, कोरोनावरील औषधं, लस यांची मोठ्या प्रमाणावर र्निर्मिती करत संपूर्ण जगभरात त्याचा पुरवठा केला गेला. या क्षेत्रातल्या निर्यातीमध्ये चांगली वाढ झाली आहे. आजही भारत हा फार्मा इंडस्ट्रीमधील निर्यातीतील क्रमवारीत भारताचा पहिला क्रमांक लागतो.  एप्रिल 22 ते फेब्रुवारी 2023 या कालावधीत औषध निर्यातीत 3.14 टक्क्यांची वाढ झाली असून एकुण 22.9 बिलीयन डॉलरचा व्यापार झाला आहे. 

मात्र, कोरोना काळानंतर भारताकडून पुरवठा केल्या जाणाऱ्या कफ सिरप सारख्या औषधांवर काही औषधां विरोधात तक्रारी नोंदवल्या गेल्या. या औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांवर वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनकडून सुद्धा कारवाई केली गेली आहे. या सर्व घटनांमुळे भारतातून निर्यात केल्या जाणाऱ्या औषधांवर नकारात्मक परिणाम होऊन विश्वासार्हता कमी होऊ शकते. त्यामुळे सरकारडूनच वेळोेवेळी औषधांची गुणवत्ता तपासण्यावर आता भर दिला जात आहे.