Cotton Stock: संकट, नुकसान, आपत्ती या तिन्ही बाबी या वर्षी शेतकऱ्यांच्या पाचवीला पुजल्यागत मागे लागल्या आहेत. आधी पिकांवर रोग मग अवकाळी पाऊस आणि मालाला भाव नाही. यामुळे शेतकरी अधिक चिंताग्रस्त आहे. मार्च संपला तरीही कापसाला अपेक्षित दर मिळत नाही. म्हणून अनेक शेतकऱ्यांनी अजूनही कापूस विक्रीला काढला नाही. जवळपास 45% कापूस शेतकऱ्यांच्या घरात आहे. कापूस हंगाम संपल्याने त्यात कीड लागली आणि आता घरात रोग पसरण्याची शक्यता सुद्धा वाढली आहे. घरातील लहान मुलांच्या अंगावर लाल पुरकुड्या दिसून येत आहे. त्याचबरोबर माल विक्री केली नाही तर कर्ज कसे फेडणार. म्हणून शेतकरी अधिकच चिंतेत आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत कापूस दरात घट
मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी कापसाचे भाव खूप कमी झाले आहेत. मागील वर्षी 15 हजार रुपये क्विंटल असा कापसाचा दर होता आणि या वर्षी 10 हजारच्या वर कापूस गेला नाही. मागील वर्षी कापूस दर जास्त असल्याने शेतकऱ्यांनी कापसाचा पेरा वाढविला होता. दिवाळीत झालेले वेचे सुद्धा शेतकऱ्यांनी अजून पर्यंत घरातच ठेवले आहे. मागील महिन्यात कापसाच्या दरात घसरण बघता अनेक शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात विक्री केली पण अजूनही काही शेतकरी भाववाढीच्या आशेवर आहेत. 45% शेतकऱ्यांकडे अजूनही कापूस भरलेला आहे.
जगाचा पोशिंदाच असतो नेहमी चिंतेत..
विदर्भातील शेतकरी सांगतात, नोव्हेंबरमध्ये 9000 रुपयांवर भाव असल्याने आम्हाला आणखी भाववाढीची आशा होती. डिसेंबरमध्ये 10000 रुपयांचा आकडा गाठणार म्हणून आम्ही कापूस घरात भरून ठेवला आहे. पण आता त्यात अजून घट होतांना बघता काही लोकांनी कापूस विक्री केली. लागणारा खर्च सुद्धा त्यातुन निघणार नाही असा भाव सध्या कापसाला आहे. 7900 रुपयांचा भाव असताना 7700 रुपये शेतकऱ्यांना मिळत आहेत.
बँकेचे कर्ज फेडायचे आहे त्यामुळे आता मिळतोय त्या भावात आम्हाला कापूस विक्री करावी लागणार आहे. दरवर्षी कोणत्या न कोणत्या प्रकारे शेतकऱ्यांना त्रास सहन करावाच लागतो. कधी संपणार शेतकऱ्यांची व्यथा? या प्रश्नाचे उत्तर कदाचित कोणीच देऊ शकणार नाही. आपण पिकावलेले अन्नधान्य संपूर्ण जगाला देणारा बापच नेहमी चिंतेत असतो.
(News Source: deccanchronicle.com)