वन विभागाच्या परिक्षेत्रात अनेकदा ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांवर वन्यप्राण्यांनी जीवघेणा हल्ला (wild animal attack) केल्याच्या घटना घडल्या आहेत. अशा प्रकारच्या हल्ल्यांमध्ये एखाद्या व्यक्तीचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना घडल्या आहेत. तर काही वेळा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे एखाद्या व्यक्तीस कायम स्वरुपीचे अपंगत्व येऊ शकते.या पार्श्वभूमीवर वन विभागाकडून वन्य प्राण्यांच्या हल्ल्यांतील वारसांना आर्थिक स्वरुपात मदत (compensation) दिली जाते. तसेच पीडित जखमींनाही उपचारासाठी अर्थसहाय्य केले जाते. या आर्थिक मदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. ही आर्थिक मदत किती मिळते याबाबतची माहिती आपण जाणून घेऊयात..
मृताच्या वारसाला मिळणार 25 लाख
राज्य सरकराकडून वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात जीव गेल्यास, अथवा जखमी झाल्यास देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईमध्ये भरघोस वाढ केली आहे. त्यासाठीचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. त्यानुसार आता वाघ, बिबट्या, अस्वल, रानगवा, तरस, लांडगा, हत्ती, वनगाय, माकड या सारख्या प्राण्यांच्या हल्ल्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीच्या वारसास 25 लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याच प्रमाणे जर वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात कायमचे अपंगत्व आल्यास पीडित व्यक्तीस 7.50 लाख आणि गंभीर जखमी झाल्यास 5 लाख, तसेच किरकोळ जखमींना औषधोपचारासाठी 50 हजार रुपयांपर्यंतचा खर्च दिला जाणार आहे.
अशी मिळणार रक्कम
वन्यप्राण्याच्या हल्ल्यात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना निधी देताना सुरुवातीला 10 लाख रुपये रोख रक्कम दिली जाणार आहे. या शिवाय उर्वरित रकमेपैकी 10 लाख रुपये वारसाच्या नावे 5 वर्षाची एफडी केली जाणार आहे. याशिवाय 5 लाख रुपयांची 10 वर्षा करिता एफडीमध्ये गुंतवणूक केली जाणार आहे. तसेच एखाद्या व्यक्ती किरकोळ जखमी झाल्यास मात्र त्याला खासगी रुग्णालयात उपचाराची गरज भासत असेल तर त्यास 50 हजार रुपयांपर्यंतची आर्थिक मदत केली जाणार आहे.
एक महिन्यात नुकसान भरपाई
राज्य शासनाकडून वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातील पीडित व्यक्ती, अथवा मृतांच्या वारसास आर्थिक मंजुर झाल्यानंतर 30 दिवसात ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे. तसेच ही रक्कम देण्यास दिरंगाई झाल्यास त्या रकमेसाठी व्याज दिले जाणार असल्याचा निर्णयही यापूर्वीच घेण्यात आला आहे.