झेरोधा ब्रोकरेज कंपनीला आर्थिक वर्ष 2022 मध्ये जवळजवळ दुप्पट नफा झाला आहे. वर्षभरात त्यांच्या ऑपरेटिंग महसुलात 80 टक्क्यांहून अधिक वाढ झाल्यामुळे कंपनीला सुमारे 2,094 कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सुरू करण्यात आलेली ही स्टार्टअप कंपनी भारतातील सर्वांत फायदेशीर कंपनी ठरली.
Zerodha ने आर्थिक वर्ष 2022 मध्ये 2,094 कोटी रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे. जो आर्थिक वर्ष 2021मधील (2020-21) 1,122 कोटी रुपयांच्या तुलनेत 87 टक्क्यांनी वाढला आहे, असे कंपनीने कॉर्पोरेट अफेअर्स मंत्रालयाकडे (MCA) सादर केलेल्या अहवालात नमूद केले आहे. कंपनीचा ऑपरेटिंग महसूल मागील वर्षाच्या तुलनेत 82 टक्क्यांनी वाढून 4,963 कोटी रुपयांवर गेला आहे. Zerodha ने आतापर्यंत गुंतवणूकदारांकडून फंड्ससाठी कोणतीही मागणी केलेली नाही. Zerodha प्रामुख्याने ब्रोकरेज फी आणि कमिशन गोळा करून महसूल मिळवत आहे. 2022 मध्ये कंपनीकडे शुल्क आणि कमिशनमधून एका वर्षापूर्वीच्या तुलनेत 2,252 कोटींवरून 4,128 कोटी एवढा निधी जमा झाला आहे, असे अहवालात म्हटले आहे. कमिशन आणि फीच्या उत्पन्नाव्यतिरिक्त कंपनीने 614 कोटी रुपयांहून अधिक उत्पन्न हे व्याजरुपात मिळवले आहे. यातही मागीलवर्षीच्या तुलनेत 50 टक्क्यांनी वाढ झाली.
Zerodha चा 2022मध्ये एकूण खर्च 71 टक्क्यांहून अधिक वाढून 2,164 कोटी रुपये झाला. कंपनीचा कर्मचाऱ्यांवरील खर्चातही वाढ झाली आहे. ही वाढ 45 टक्क्यांनी झाली असून यासाठी 459 कोटी रुपये कंपनीला खर्च आला आहे. Upstox आणि Groww सारख्या बहुतेक फिनटेक स्टार्टअप्सप्रमाणे, नितीन कामथ यांच्या नेतृत्वाखाली Zerodha कंपनी जाहिरात आणि मार्केटिंगवर खर्च करत नाही.
Zero + Rodha = Zerodha
Zerodha म्हणजे Zero + Rodha. यातील झिरोचा अर्थ आपल्या सर्वांना माहित आहेच, शून्य. आणि रोधा (Rodha) याचा संस्कृतमध्ये अर्थ होतो अडथळे. म्हणजे झिरोधाचा अर्थ अडथळे कमी करणे, असा होतो. गुंतवणुकीचे मार्ग लोकांसाठी सुलभ बनवणे, हाच Zerodha चा मुख्य उद्देश आहे. भारतात डिस्काउंट ब्रोकरेजची संकल्पना मांडणारी Zerodha ही पहिली कंपनी नितिन कामथ यांनी 15 ऑगस्ट 2010 रोजी स्थापन केली होती. त्यांच्या 7 वर्षांच्या ऑपरेशनमध्ये, त्यांनी कमी किमतीसह, इक्विटी गुंतवणुकीवर शून्य ब्रोकरेजसह सुरूवात केली होती. तसेच त्यांनी तांत्रिकदृष्ट्या प्रगत असे KITE प्लॅटफॉर्म आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी COIN अशा उत्तम प्लॅटफॉर्म्सची निर्मिती केली.
Zerodhaचा भारतातील विविध एक्सचेंजेसमधील दैनंदिन बाजारातील उलाढालीत 5 टक्के वाटा आहे. NSE ने ऑनलाईन ब्रोकर्सना मोफत प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्यानंतर या स्टार्टअपला खऱ्या अर्थाने किक मिळाली. त्यांना एनएसई, बीएसई आणि मल्टी कमोडिटीमध्येही प्रवेश मिळाला आहे.