Solar Power Project: मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यात गव्हाणकुंड येथे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला. 20 मेगावॅटच्या या प्रकल्पाचे काम 26 एप्रिल 2018 पासून सुरू झाले होते. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ होता. या प्रकल्पाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते 24 डिसेंबर 2017 रोजी जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील गव्हाणकुंड येथे झाले. 20 मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता असलेल्या या प्रकल्पाचे काम 3 वर्षात पूर्ण झाले.
गव्हाणकुंड येथील 30 हेक्टर जागेवर सौरऊर्जा प्रकल्पाचे बांधकाम आणि विकासाचे काम संगम अॅडव्हायझर लिमिटेड, यांच्या देखरेखीखाली करत पूर्ण करण्यात आले. अमरावती जिल्हा व तालुक्यातील गव्हाणकुंड येथे 20 मेगावॅट वीज निर्मिती करणारा सौर ऊर्जा प्रकल्प विदर्भात एकमेव प्रकल्प आहे. शेतकऱ्यांना कृषी पंपाकरिता दिवसा वीजपुरवठा मिळावा म्हणून राज्य शासनाने गव्हाणकुंड येथे सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण केला.
सौर ऊर्जा प्रकल्पामुळे होते विजेची बचत
या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना वीजपुरवठा सुरू झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना रात्रीऐवजी दिवसा वीजपुरवठा होत असल्याने शेतकरी समाधान व्यक्त करत आहे. याचा लाभ 5 हजार शेतकरी घेत आहे. शेतकऱ्यांना रात्री ओलिताकरिता शेतात जावे लागणार नाही. तर या सौर विजेचे दर सुद्धा कमी आकारण्यात येणार असल्याने शेतकऱ्यांना वरदान ठरणारा हा प्रकल्प उभा झाला आहे.
शेतकऱ्यांना शेतात रात्री ओलीत करतांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. गव्हाणकुंड येथील रोशन आमले सांगतात, वाढलेल्या पिकात आत काय असेल याची कोणालाही कल्पना नसते. स्वतःचा जीव धोक्यात टाकून शेतकऱ्याला काम करावे लागते. त्यापासून थोडी तरी या प्रकल्पामुळे सुटका झाली. काही दिवस जावं लागत रात्रीला शेतात आठवड्यातून एकदोन दिवस.
विजेचा खर्च सुद्धा कमी झाला आणि विजेची बचत सुद्धा होत आहे. सध्या 5000 शेतकरी याचा लाभ घेत आहे. त्याचबरोबर धरणाचे पाणी सुद्धा शेतात पोहचवायला मदत झाली आहे. तशा तर शेतकऱ्यांच्या समस्या कधी संपणाऱ्या नाहीत. पण या प्रकल्पामुळे एक समाधान वाटते.
प्रकल्प उभारणीसाठी किती खर्च आला?
एक मेगावॅटचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारायला 12.05 कोटी रुपये खर्च येत असेल तर 20 मेगावॅटच्या या प्रकल्पाला 300 कोटी रुपयांपर्यंत खर्च आला असावा. 30 हेक्टर जागा त्यात गुंतवली गेली आहे. त्या जागेची खरेदी आणि इतर खर्च म्हणजेच जवळपास या संपूर्ण प्रकल्पाला अंदाजे 500 कोटी रुपये खर्च आला असेल, असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.