असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांचा एक राष्ट्रीय डेटाबेस तयार करण्यासाठी भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने ई-श्रम पोर्टल विकसित केलं आहे. या पोर्टलवर नोंदणी केल्यानंतर संबंधित कामगाराला ई-श्रम कार्ड दिलं जात असून त्या कामगाराला 2 लाख रूपयांपर्यत लाभ मिळू शकणार आहे. आतापर्यंत देशातील 25 कोटींहून अधिक कामगारांनी या पोर्टलवर नोंदणी केल्याचे केंद्र सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाने म्हटले आहे.
कोणाला मिळू शकते ई-श्रम कार्ड
- देशाच्या कोणत्याही राज्यात, शहरात आणि प्रदेशात काम करणारे असंघटित क्षेत्रातील कामगार ई-श्रम कार्डसाठी अर्ज करू शकतात.
- यात बांधकाम क्षेत्रातील कामगार, स्थलांतरित मजूर, फेरीवाले, घर कामगार, स्थानिक रोजंदारीर काम करणारे मजूर, भूमिहीन शेतमजूर व इतर असंघटित कामगारांचा समावेश होतो.
- ई-श्रम कार्ड मिळवण्यासाठी कामगाराचे वय मात्र 18 ते 40 च्या दरम्यान असणे गरजेचे आहे.
- टॅक्स भरणारे तसेच प्रोव्हिडंट फंड आणि ESIC (Employees state insurance corporation) आदी योजनांचा लाभ घेणाऱ्या व्यक्तींना यासाठी नोंदणी करता येणार नाही.
काय आहेत ई-श्रम कार्डाचे फायदे
- ई-श्रम कार्डाच्या माध्यमातून असंघटित क्षेत्रातील कामगारांना सामाजिक देण्याचा सरकारचा उद्देश आहे.
- असंघटित क्षेत्रातील सर्व नोंदणीकृत कर्मचाऱ्यांना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेद्वारे अपघात विमा संरक्षण दिले जाणार आहे.
- एखाद्या कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा कायमचं अपंगत्व आल्यास 2 लाख रुपयांचा लाभ दिला जातो.
- अंशत: अपंगत्व आलेल्या कामगारास 1 लाख रुपयांचा लाभ दिला जातो.
- भविष्यात सर्व सामाजिक सुरक्षेच्या योजनांचा लाभ याच पोर्टलद्वारे देणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
- नोंदणी केलेल्या कामगारांना 12 अंकी युनिक कोड असलेले ई-श्रम कार्ड दिले जाईल. ज्याला युनिव्हर्सल अकाऊंट नंबर (UAN)असे म्हटले आहे.
ई-श्रम कार्डासाठी वेबसाईटवर अशी करा नोंदणी
- ई-श्रम या वेबसाईटवर उजवीकडे Register on e-shram दिसेल. त्यावर क्लिक करा.
- इथं Self Registration या चौकटीत आधारशी लिंक असलेला तुमचा मोबाईल क्रमांक आणि तिथे दिलेला कॅप्चा टाकायचा आहे.
- त्यानंतर EPFO आणि ESIC चे सदस्य नाही यावर टीक करायचे आहे म्हणजे दोन्ही प्रश्नांच्या उत्तरासाठी NO या पर्यायावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर सेंड ओटीपी वर क्लिक करायचे.
- मोबाईलवर आलेला ओटीपी टाकून सबमिट करायचे. त्यानंतर आधार क्रमांक टाकायचा. ओटीपी पर्यायावरील बरोबरची टीकमार्क तशीच ठेवायची आणि मग कॅप्चा टाकायचा.
नोंदणीच्या अटी आणि शर्ती मला मान्य आहेत, यासमोरील चौकटीवर टीकमार्क करायचे आणि पुन्हा सबमिट करायचे. - त्यानंतर पुन्हा एक मोबाईलवर ओटीपी येईल तो टाकून validate करायचे.
- validate झाल्यानंतर स्क्रीनवर आधार कार्डचे डिटेल्स जसे की, नाव, जन्मतारीख आणि पत्ता दिसेल. ही सर्व माहिती बरोबर असेल तर त्यासमोरील चौकटीवर टीकमार्क करून continue to other details वर क्लिक करायचे.
- इथे तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे. यात लग्नाची माहिती, वडिलांचे नाव आणि सामाजिक प्रवर्ग टाकायचा. नंतर अपंग कॅटेगरीमध्ये yes आणि no यापैकी एकावर टीकमार्क करायचे.
- त्यानंतर नॉमिनीचे डिटेल्स भरायचे. जसे की, नॉमिनीचे नाव, जन्मतारीख, लिंग आणि तुमच्यासोबत असलेले त्याचे नाते निवडून save and continue वर क्लिक करायचे.
- पुढे तुमचा संपूर्ण पत्ता द्यायचा आहे. त्य़ात प्रथम राज्य आणि जिल्हा निवडायचा. शहरी भागात राहणाऱ्यांनी urban आणि ग्रामीण भागात राहणाऱ्यांनी rural हे पर्याय निवडायचे. त्यानंतर संपूर्ण पत्ता पिनकोडसह टाकायचा आणि save and continue वर क्लिक करायचे.
- आता शिक्षणविषयक माहितीत तुमचे शिक्षण किती झाले आहे ते निवडायचे. त्यानंतर तुम्ही प्रत्येक महिन्याला किती रूपये कमावता तो आकडा निवडायचा आणि पुन्हा save and continue वर क्लिक करायचे.
- पुढे ऑक्युपेशन आणि स्किल या पानावर प्रायमरी ऑक्युपेशनमध्ये तुम्ही सध्या काय काम करता ते सांगायचे. त्यानंतर कामाच अनुभव किती आहे ते सांगायचे. तुम्ही अजून दुसरी काही काम किंवा व्यवसाय करत असाल तर ते सेकंडरी ऑक्युपेशनमध्ये टाकायचे. आणि पुन्हा एकदा save and continue वर क्लिक करायचे.
- आता बँकेची माहिती जसे की, बँकेचा खाते क्रमांक, खातेदाराचे नाव, आयएफएससी कोड, बँकेचे आणि शाखेचे नाव टाकून ते कन्फर्म करून save and continue वर क्लिक करायचे. त्यानंतर नोंदणी करताना आपण जी माहिती दिली ती पुन्हा एकदा वाचून घ्यायची आणि ही भरलेली सगळी माहिती खरी आहे, हे सांगण्यासाठी खाली डिक्लेरेशनवर टीकमार्क करून सबमिट करायचे.
ही संपूर्ण माहिती सबमिट झाल्यावर स्क्रीनवर तुम्हाला तुमचे ई-श्रम कार्ड दिसेल. Download UAN वर क्लिक करून ई-श्रम कार्ड डाऊनलोड करू शकता. ई-श्रम कार्ड डाऊनलोड केल्यानंतर सर्वांत खाली Complete registration वर क्लिक करा मग तुमची संपूर्ण नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल.