Fixed Deposit: दोन महिन्यांपूर्वी गावात बेले आजीच निधन झालं. मग तिच्या दशक्रीयेचा कार्यक्रम, तेरावीचा कार्यक्रम कधी ठरवायचा यावरून घरात चर्चा सुरू झाली. तेव्हा तिचे नातवंड म्हणाले, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या अनेक निर्णयामुळे आज प्रत्येकाला दोन वेळच जेवण आपल्या गावात मिळतं आहे. मग जेवण देण्याऐवजी काहीतरी नवीन करूया गावकऱ्यांसाठी. मग त्यांनी निर्णय घेतला आणि गावात विद्यार्थ्यांना हवी ती पुस्तक आणून वाचनालय स्थापन केले.
याच प्रमाणे तेराव्याला येणारा खर्च मंदिरात दान करणे, वृद्धाश्रमात देणे, अनाथ आश्रमात देणे या सर्व बाबी तर ऐकल्यात पण आईच्या तेराव्याला येणारा खर्च टाळून चक्क गावातील 11 मुलींच्या नावाने फिक्स डिपॉजिट केले ही गोष्ट फार नवीन आहे. जाणून घेऊया सविस्तर..
माजलगाव तालुक्यातील पिंपळगाव येथील प्रगतशील शेतकरी कुटुंबातील किसनाबाई रोहिदास मायकर यांचे 7 मार्च रोजी निधन झाले. 8 मार्च रोजी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर पारंपरिक कुठलाही विधी न पाळता व होणाऱ्या खर्चाचा सदुपयोग म्हणून 11 मुलींच्या नावे प्रत्येकी दहा हजार रुपये फिक्स डिपॉझिट करून त्यांना बॉण्ड सुपूर्द करणार असल्याची माहिती मायकर कुटुंबातील मुलांनी दिली. आम्ही देत असलेला निधी भविष्यात या मुलींच्या कामाला येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.
पिंपळगाव येथील सुभाष मायकर हे शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी धार्मिक कोणताही विधी न पाळता किसनाबाईची अस्थी गंगेत न टाकता त्यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण करून तिथेच टाकली, हीच झाडे आम्हाला आईच्या मायेची सावली व गोड-मधूर फळे चाखायला देतील या भावनेतून शेतकरी मायकर कुटुंबाने आईच्या अस्थी आंब्याच्या रोपट्याखाली केल्या. तेराव्या साठी होणारा खर्च जवळपास 1 लाख 10 हजार रुपये मुलींच्या भविष्यनिर्वाहासाठी वितरित करण्याचे ठरवले.
मायकर कुटुंब हे जवळपास शंभर उंबरठ्याचे असल्याने केवळ अगदी जवळच्या चारच कुटुंबातील सदस्यांनी प्रथेप्रमाणे पाच दिवसांचा विटाळ पाळावा. अन्य कुटुंबीयांना कुठलेही बंधन राहणार नाही, असे मायकर यांनी सांगितले. आईच्या स्मरणार्थ घेण्यात आलेला हा निर्णय सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.
मुलींचा सन्मान होईल..
सुभाष मायकर, ज्ञानोबा मायकर, सरपंच कुंडलिक मायकर यांच्या अभिनव उपक्रमाची प्रेरणा प्रत्येकाने घेतल्यास स्त्रीभ्रूण हत्या होणार नाहीत. तसेच मुलींचा सन्मान होईल, असे मत शेतकरी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष कालिदास आपेट यांनी व्यक्त केले. मुलींना शिक्षणासाठी मदत केल्यास त्यांना भरारी घेण्यास तुमचं मोलाचा वाटा असेल. प्रत्येकाने ही प्रेरणा घेतली तर अनेक मुलींचे शिक्षण पूर्ण होईल.
मायकर यांच्या उपक्रमावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया..
संतोष शिंदे म्हणतात.. वडिलांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण त्यात अपयश आले. त्यामुळे आम्ही वडिलांच्या निधनानंतर 25000 रुपयाचा निधी एकत्रित करून आमच्या गोरेगावात काम करणाऱ्या केशव गोरे ट्रस्ट यांच्या कडे मुलींच्या शिक्षणासाठी हा निधी सुपूर्द केला होता..त्या रात्री कमालीचा समाधान वाटत होते आमच्या या निर्णयाला अनेक जवळच्या नाते वाईक यांचा विरोध होता..अजूनही आमचे काका आमच्याशी संबंध तोडून आहेत पण आमच्या भूमिका ठाम होत्या आणि आहेत.
खंडू वाकचौरे म्हणतात.. जगात अनेक ठिकाणी अशाच प्रकारे मानसं आहेत ते असा विचार करतात कि समाज माझाच आहे त्याचा चांगला खरा विकास झाला पाहिजे असे मला कळकळीने वाटते.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            