Zomato Q1 Results: फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटो पहिल्यांदाच नफ्यात आली आहे. एप्रिल-जून तिमाहीत कंपनीला नफा मिळाल्याने शेअर्स 10 टक्क्यांनी वधारला आहे. सध्या शेअर 95.55 रुपयांवर ट्रेड करत आहे. येत्या काही दिवसांत शेअरचा भाव 100 रुपये ते 130 रुपयांपर्यंत जाऊ शकतो, असा अंदाज आघाडीच्या ब्रोकर कंपन्यांनी वर्तवला आहे.
शेअरच्या खरेदीकडे गुंतवणुकदारांचा कल
पहिल्यांदाच नफ्यात आल्यामुळे भांडवली बाजारात झोमॅटोची चर्चा सुरू आहे. आज सकाळी बाजार सुरू होताच शेअर खरेदीसाठी गुंतवणुकादारांच्या उड्या पडल्या. काल गुरुवारी झोमॅटोने तिमाही निकाल जाहीर केले.
झोमॅटोला किती नफा झाला?
झोमॅटोला जून तिमाहीत 2 कोटी रुपये नफा झाला. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला 186 कोटी रुपये तोटा झाला होता. तसेच जानेवारी-मार्च तिमाहीत 189 कोटी रुपये तोटा नोंदवला होता. मागील वर्षाच्या तुलनेत कंपनीचा एकूण महसूल 71% टक्क्यांनी वाढला आहे. त्यामुळे भविष्यात झोमॅटो आणखी चांगली कामगिरी करेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
झोमॅटो शेअर किती वर जाईल?
मॉर्गन स्टॅनली - 115 रुपये
गोल्डमॅन सॅच - 100 रुपये
कोटक सिक्युरिटिज - 105 रुपये
मोतीलाल ओसवाल - 110 रुपये
जेपी मॉर्गन - 100 रुपये
जेफरीज -130 रुपये
सिटी - 115 रुपये
झोमॅटोच्या एकूण ऑर्डरची संख्या वाढत आहे. सोबतच एकूण फूड ऑर्डर्सचे मूल्यही वाढले आहे. येत्या काळात झोमॅटोचा शेअर आणखी वर जाईल, असा अंदाज आघाडीच्या ब्रोकर फर्मने नोंदवला आहे.
झोमॅटोने 2021 साली जुलै महिन्यात IPO बाजारात आणला होता. तेव्हा इश्यू प्राइज 76 रुपये होते. मार्केटमध्ये लिस्ट होताच शेअरची किंमत 116 रुपये झाली होती. तेव्हापासून किंमतीत अनेक चढउतार पाहायला मिळाले. मात्र, आता कंपनीने पहिल्यांदा नफा मिळवल्याने सकारात्मक वातावरण तयार झाले आहे.