शेअर ब्रोकिंग व्यवसायात झपाट्याने वाढणाऱ्या झिरोधाला शेअर मार्केट रेग्युलेटर सेबीने म्युच्युअल फंड व्यवसायासाठी परवानगी दिली आहे. या निर्णयामुळे झिरोधाचा म्युच्युअल फंड व्यवस्थापनात उतरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. झिरोधाच्या एंट्रीने 46 लाख कोटींच्या म्युच्युअल फंड व्यवसायात स्पर्धा वाढणार आहे.
सेबीच्या परवानगीची माहिती झिरोधाचे प्रमुख नितीन कामत यांनी दिली. झिरोधा फंड हाऊस या कंपनीला सेबीने परवानगी दिली आहे. लवकरच कंपनीकडून नवीन म्युच्युअल फंड योजना बाजारात दाखल केली जाईल, असे त्यांनी सांगितले.
झिरोधा फंड हाऊसमध्ये विशाल जैन लवकरच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून रुजू होतील, असे नितीन कामत यांनी म्हटले आहे. ही कंपनी छोट्या फिनटेक कंपन्यांना सोबत घेईल, असे कामत यांनी म्हटले आहे.
मागील तीन वर्षात भारतात म्युच्युअल फंड उद्योगात भरभराट झाली आहे. त्यामुळे या उद्योगात वृद्धीच्या प्रंचड संधी झिरोधाला खुणावत होत्या. इतकी भरभराट होईल देखिल भारतात शेअर्स आणि म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची संख्या अवघी 6 ते 8 कोटी आहे. त्यामुळेच फंड उद्योगात उतरण्याचे झिरोधाने ठरवले असल्याचे नितीन कामत यांनी सांगितले.
झिरोधाला किमान एक कोटी गुंतवणूकादारांपर्यंत पोहोचायचे असल्यास म्युच्युअल फंड हा एक सोपा मार्ग असल्याचे नितीन कामत यांचे म्हणणे आहे. म्युच्युअल फंड योजना गुंतवणूकदारांना समजण्यासाठी सोपी आहे, असे त्यांनी सांगितले.
गुंतवणूकदारांना सहज समजेल अशा म्युच्युअल फंडाच्या ऑफर्स आणि ईटीएफ आणण्याचे झिरोधाचे उद्दिष्ट आहे. अशा योजना ज्या सहजपणे समजून घेत गुंतवणूकदार त्यांचे आर्थिक ध्येय साध्य करतील, असे नितीन कामत यांनी सांगितले.
46 लाख कोटींची गुंतवणूक आणि 44 फंड कंपन्या
AMFI India या म्युच्युअल फंड उद्योगातील शिखर संघटनेच्या आकडेवारीनुसार जुलै 2023 अखेर भारतातील म्युच्युअल फंड उद्योगाकडे एकूण 46 लाख 27 हजार 687 कोटींची मालमत्ता व्यवस्थापनाअंतर्गत आहे. देशभरात 44 म्युच्युअल फंड व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्या आहेत. त्यात आता झिरोधा फंड हाऊसची भर पडणार आहे.
इक्विटी ब्रोकिंगमध्ये झिरोधा आघाडीवर
भारतात इक्विटी ब्रोकिंग सेवा देणाऱ्या ब्रोकर्समध्ये नितीन कामत यांची झिरोधा ब्रोकिंग आघाडीची कंपनी आहे. झिरोधाचे एकूण 1 कोटीहून अधिक क्लाईंट्स आहेत. शेअर मार्केटमधील रोजच्या उलाढालीत जवळपास 15% हिस्सा झिरोधा ब्रोकिंगचा आहे. 2010 पासून झिरोधा इक्विटी ब्रोकिंग सेवेत आहे.