Exchange old Note to RBI: आपण रोज कुणाशी ना कुणाशी पैशांचा व्यवहार करत असतो. किराणा दुकानात, भाजी विक्रेत्याला, दुधवाल्याला, बसमध्ये कंडक्टरला आपण पैसे दते असतो. अनेकदा आपण घाईत असल्याने परत दिले गेलेले पैसे फाटलेले तर नाही ना याची खातरजमा करायला विसरतो. घरी आल्यानंतर आपल्याला कळते की कुणीतरी आपल्याला फाटकी किंवा अगदीच जीर्ण नोट दिली आहे. आता आपल्याकडून ही नोट कुणी घेईल का? याची चिंता आपल्याला छळायला लागते. जर नोट जास्त किमतीची असेल तर मग विचारायलाच नको!
आता आपल्याजवळ असलेल्या फाटक्या नोटांचे करायचे काय हा प्रश्न आपल्यासमोर असतो. अनेकदा आपण देखील हातचालाखी करत कुणाला तरी ती नोट द्यायचा प्रयत्न करतो, परंतु हा प्रयत्न प्रत्येकवेळी यशस्वी होईलच याचा काही नेम नाही. फाटलेली नोट घेऊन बँकेत गेलो तर तिथले कर्मचारी आपल्यालाच रागावतील आणि नको नको ते प्रश्न विचारतील अशी देखील भीती अनेकांच्या मनात असते. देशाच्या चलनी नोटांची हानी करण्याच्या गुन्हा आपल्यावर नोंदवला जाऊ शकतो अशी देखील भीती लोकांना असते. आपल्याकडचे कायदे किचकट असले तरी त्यावर योग्य तो तोडगा काढणारे कर्मचारी आणि अधिकारी देखील असतात हे लक्षात ठेवा. तुम्ही कितीही जीर्ण किंवा फाटकी नोट घेऊन बँकेत गेलात तर तुम्हांला आहे त्या किमतीची नवीकोरी नोट बँकांना देणे बंधनकारक आहे. जुन्या जीर्ण नोटा बदली करण्यासाठी रिजर्व बँक ऑफ इंडियाने काही नियमावली जाहीर केली आहे. ती आपल्या सगळ्यांना माहीती असणे गरजेचे आहे.
तुमच्या जवळच्या कोणत्याही बँकेत जाऊन तुम्ही नोट बदली करू शकता. खरे तर हा खूप सोपा मार्ग आहे. नागरिकांचे नुकसान होऊ नये यासाठीचे नियम आरबीआयने केले आहेत. रिझर्व्ह बँकेने एका परिपत्रकात म्हटले होते की, जर इतर बँकांनी खराब नोटा बदलून देण्यास नकार दिला तर त्यांना 10,000 रुपयांचा दंड होऊ शकतो. हा नियम बँकांच्या शाखेलाही लागू होतो.त्यामुळे यापुढे फाटक्या चलनी नोटा बदलण्यासाठी बिनदिक्कतपणे बँकेत जा.
RBI clarifies: No change in existing Currency and Banknoteshttps://t.co/OmjaKDEuat
— ReserveBankOfIndia (@RBI) June 6, 2022
RBI ने भारतीय रिझर्व्ह बँक (नोट रिफंड) नियम, 2009 हा कायदा बनवला आहे. रिझर्व्ह बँकेच्या संकेतस्थळावरही या नियमाची प्रत उपलब्ध करून देण्यात आली आहे. या कायद्यांतर्गत प्रत्येक पैलूचा तपशीलवार विचार करण्यात आला आहे.सामान्य नागरिकांचे कुठलेही आर्थिक नुकसान होऊ नये आणि त्यांना कुठल्याही प्रकारचा मानसिक त्रास होऊ नये यासाठी रिझर्व बँक ऑफ इंडियाने विशेष मेहनत घेतलेली आहे.
येथे वाचा नियमावली: https://rbi.org.in/commonman/hindi/scripts/noterefund.aspx
या नियमाच्या प्रस्तावनेत असे म्हटले आहे की, 'रिझर्व्ह बँक आपल्या सर्व इश्यू ऑफिसेस आणि व्यावसायिक बँकांच्या करन्सी चेस्ट (currency chest) शाखांमध्ये फाटलेल्या आणि खराब झालेल्या नोटा बदलण्याची सुविधा लोकांना प्रदान करत आहे. नोट रिफंड नियम समजण्यास आणि वापरण्यास सुलभ करण्यासाठी, या नियमांमध्ये सर्वसमावेशक सुधारणा आणि सुलभीकरण करण्यात आले आहे. तसेच नियुक्त केलेल्या शाखेचा कोणताही अधिकारी संबंधित शाखेत सादर केलेल्या फाटलेल्या नोटांचा न्यायनिवाडा करू शकेल, असा निर्णय घेण्यात आला आहे.'
त्यात असे देखील नमूद केले आहे की सर्व बँकांनी त्यांच्या सर्व शाखांमध्ये जीर्ण नोटा बदलून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, तर फाटलेल्या नोटा बदलून देण्याची सुविधा नियुक्त बँक शाखा (सहकारी बँका आणि प्रादेशिक ग्रामीण बँकांसह) प्रदान केली जाऊ शकते. सर्व निविदाधारकांना त्या बँकेत खाते असले किंवा नसले तरीही नोट बदली करून घेता येणार आहे. ही संपूर्ण बँकिंग व्यवस्थेची जबाबदारी आहे जी जनतेप्रती कार्यरत आहे. रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाच्या नोट रिफंड नियमांचे सरलीकरण आणि विस्तार हे सर्वसामान्यांना त्यांच्या फाटलेल्या नोटा कोणत्याही अडचणीशिवाय बदलून घेण्यास मदत करण्याच्या उद्देशाने आहे हे सांगण्याची गरज नाही. नियुक्त बँक शाखांनी सक्रियपणे कार्य करावे आणि याची खात्री करावी असे या नियमात म्हटले आहे.
RBI च्या या मॅन्युअलमध्ये पाळले जाणारे नियम आणि योजनेअंतर्गत स्वीकारल्या जाणाऱ्या प्रक्रियेचा समावेश आहे. जलद आणि सहज समजण्यासाठी महत्त्वाचे नियम बदलले आहेत. फाटलेल्या नोटांची स्वीकृती, निर्णय आणि पेमेंट याबाबत शाखांनी अवलंबायची प्रक्रिया या पुस्तिकेत दिली आहे.
अधिक तपशीलांसाठी RBI संचालित क्रमांक 14440 वर मिस्ड कॉल द्या.