लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज मंगळवारी 15 नोव्हेंबर 2022 रोजी जागतिक लोकसंख्येने 800 कोटींचा टप्पा पार केला आहे. संयुक्त राष्ट्र संघटना लोकसंख्या वाढीविषयी विविध अंदाज जाहीर करत असते. संयुक्त राष्ट्राच्या (UN) अंदाजानुसार, जगाची लोकसंख्या 2030 पर्यंत 850 कोटीपर्यंत (8.5 बिलियन) पोहोचेल. 2050 पर्यंत 970 कोटी (9.7 बिलियन) तर या शतकाच्या अखेरीपर्यंत लोकसंख्या 1040 कोटी (10.4 बिलियन) पर्यंत पोचेल.
Table of contents [Show]
लोकसंख्या वाढतेय पण वाढीचा दर मंदावलाय
जगाची लोकसंख्या नवनवे रेकॉर्ड पार करत असली तरी लोकसंख्या वाढीचा दर कमी झाला आहे. 1950 पासून लोकसंख्या कमीत कमी वेगाने पुढे जात आहे. लोकसंख्या वाढीचा हा मंद वेग असाच पुढे राहणार असल्याचा अंदाज संयुक्त राष्ट्राने (UN) वर्तवला आहे. जगाची लोकसंख्या 700 कोटींवरून 800 कोटीपर्यंत पोचण्यास 12 वर्षे इतका कालावधी लागला. आता 900 कोटींचा टप्पा गाठायला आणखी 15 वर्ष लागू शकतात. म्हणजे 2037 पर्यंत जगाची लोकसंख्या 9 बिलियनपर्यंत पोचेल असे युनायटेड नेशन्सचे म्हणणे आहे. ही आकडेवारी लोकसंख्या वाढीचा वेग मंदावल्याचे आणि भविष्यात असाच राहणार असल्याचे अधोरेखित करते.
भारत चीनला मागे टाकणार
सध्या भारत आणि चीन या दोन देशांची लोकसंख्या प्रत्येकी 1.4 बिलियनपेक्षा अधिक आहे. चीन पहिल्या क्रमांकावर असून या देशाने 145 कोटींचाही आकडा पार केला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अंदाजाप्रमाणे अवघ्या वर्षभरात भारत लोकसंख्येच्याबाबत जगातील सर्वात मोठा देश बनेल. 2023 मध्ये भारत चीनला मागे लोकसंख्येच्या बाबतीत मागे टाकेल.
Fertility जास्त तिथे दरडोई उत्पन्न कमी
भारत लोकसंख्येच्या बाबतीत साधारण वर्षभरात चीनला मागे टाकेल. मात्र, यात अभिमानास्पद असे काही नाही. कारण जिथे fertility लेवल जास्त असते तिथे दरडोई उत्पन्न कमी असल्याचे आढळून येते. दरडोई उत्पन्न कमी असल्यास जीवनमानाचा दर्जा खालावतो.
सरासरी आयुष्यात वाढ होतेय हे लोकसंख्या वाढीच एक कारण
2019 मध्ये जन्मावेळचे अपेक्षित आयुर्मान 72.8 वर्षे इतके होते. 1990 पासून यात 9 वर्षे इतकी वाढ झाली आहे. 2050 पर्यंत सरासरी आयुष्य 77.2 वर्षापर्यंत पोचेल. लोकसंख्या वाढीचे हे देखील एक कारण आहे. 2050 पर्यंत लोकसंख्या 970 कोटींपर्यंत पोचू शकेल. यामध्ये सर्वाधिक वाढ कांगो, इजिप्त, इथिओपिया, भारत, नायजेरिया, पाकिस्तान, फिलिपाईन्स, टांझानिया या देशात होईल असा अंदाज आहे.
सर्वाधिक लोकसंख्येचे पाच देश
चीन - 145 कोटी 25 लाख
भारत - 141 कोटी 28 लाख
अमेरीका - 33 कोटी 56 लाख
इंडोनेशिया - 28 कोटी 5 लाख
पाकिस्तान - 23 कोटी 15 लाख