भविष्यातील इंधन म्हणून जैव इंधन (Biofuel) लोकप्रिय होत आहे. विकसित देशांनी Biofuel Economy च्या दिशेनं वाटचाल सुरु केली आहे. भारतानेही याच संकल्पनेचा स्वीकार करत देशांतर्गत जैव इंधनाच्या उत्पादन आणि वापराला प्रोत्साहन देण्याचे धोरण लागू केले आहे. यामुळे जैव इंधन क्षेत्रात संशोधन आणि गुंतवणुकीला चालना मिळाली आहे.
वर्ष 2020 च्या तुलनेत जैव इंधनाची अर्थव्यवस्था वार्षिक 14.1% दराने वाढली आहे. 2021 मध्ये भारताची बायोफ्यूएल इकॉनॉमी 80 अब्ज डॉलर्स इतकी वाढली आहे. जैव इंधनाविषयक बाजारपेठ येत्या 2025 पर्यंत तब्बल 300 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढेल, असा अंदाज एका अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. बायोफ्यूएल एकूण अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी फायदेशीर ठरणार आहे.
...म्हणून साजरा केला जातो वर्ल्ड बायोफ्युएल डे!
अजीवाश्म इंधनाचे (नॉन- फॉसिल फ्युएल्स) महत्त्व अधोरेखित करण्यासाठी विशेषतः पारंपरिक जीवाश्म इंधनाच्या तुलनेत त्याबाबत जनजागृतीसाठी दरवर्षी 10 ऑगस्ट रोजी वर्ल्ड बायोफ्युएल डे साजरा केला जातो.1893 मध्ये शेंगदाण्याच्या तेलावर इंजिन चालवणाऱ्या सर रुडॉल्फ ख्रिश्चियन कार्ल डिझेल (डिझेल इंजिनचे संशोधक) यांनी केलेल्या संशोधन प्रयोगांच्या सन्मानार्थ World Biofuel Day हा दिवस साजरा केला जातो.
दरवर्षी इंधन आयात खर्चात होणार मोठी बचत
भारतातील पेट्रोलियमची निव्वळ आयात 2020-21 मध्ये 551 अब्ज डॉलर्स किंमतीमध्ये 185 एमटी होती.बहुतेक पेट्रोलियम उत्पादने वाहतुकीसाठी वापरली जातात. E20 यशस्वी झाल्यास भारतासाठी दरवर्षी 1 अब्ज डॉलर्स म्हणजेच 30,000 कोटींची बचत होईल.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार
- बायोफ्युएल्समुळे भारतात शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास, आयात कमी करण्यास, रोजगार निर्मिती करण्यास, कचऱ्यापासून संपत्ती निर्मिती करण्यास, स्वच्छ पर्यावरण तसेच आरोग्य उंचावण्यास मदत होईल. सध्या अस्तित्वात असलेल्या जैववैविध्याचा जास्तीत जास्त वापर करून, स्थानिक समाजाच्या मदतीने कोरड्या जमिनी संपत्ती निर्मितीसाठी वापर करता येईल आणि पर्यायाने शाश्वत विकासासाठी योगदान देता येईल.
- इथेनॉल हे कमी प्रदूषण करणारे व समान कार्यक्षमता देणारे इंधन आहे.मोठ्या जिरायती जमिनीची कमी उपलब्धता, अन्नधान्य आणि ऊसाचे वाढते उत्पादन यामुळे तयार होणारा सरप्लस,वनस्पतींशी संबंधित स्त्रोतांपासून इथेनॉल तयार करण्यासाठी उपलब्ध असलेले तंत्रज्ञान,ते इथेनॉल मिश्रित पेट्रोलसाठी वाहने अनुकूल बनवण्याची व्यवहार्यता यामुळे E20 उपक्रम राष्ट्रीय गरजेचा आणि धोरणात्मक पातळीवरही महत्त्वाचा ठरणार आहे.
सरकारचा इथेनॉल ब्लेंडिग उपक्रम क्रांतिकारी ठरणार
ऊर्जा सुरक्षा साध्य करणे आणि कमी कार्बन अर्थव्यवस्थेच्या दिशेने स्थित्यंतर करणे हे भारतासारख्या वाढत्या देशासाठी महत्त्वाचे आहे. स्थानिक पातळीवर तयार झालेले इथेनॉल पेट्रोलमध्ये मिसळल्यामुळे भारताला उर्जा सुरक्षा साध्य करण्यास,आयात कमी करण्यास, स्थानिक उद्योगांना सक्षम करण्यात व शेतकऱ्यांना उर्जा व्यवस्थेत सहभागी करण्यास तसेच वाहनातून होणारे उत्सर्जन कमी करण्यास मदत होईल.
बीपीसीएल रिटेलचे कार्यकारी संचालक पी. एस. रवी यांच्या मते, ‘बीपीसीएल ही इथेनॉलची लीडर आणि समन्वयक आहे. सरकारच्या इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोल उपक्रमात आम्ही मोठ्या प्रमाणावर योगदान देतो.बीपीसीएलने ओएमसीबरोबर १३१ एलटीओएजवर सह्या केल्या असून त्यानुसार इथेनॉलची कमतरता असलेल्या राज्यात अंदाजे प्रती वर्ष 757 कोटी लीटर्सचे इथेनॉल प्लँट्स स्थापन केले जाणार आहेत.त्यांनी राज्यांतील अतिरिक्त इथेनॉल, कमतरता असलेल्या राज्यांत रेल्वेमार्गाने स्थलांतरित करण्याचे आणि पर्यायाने कमतरता असलेल्या राज्यांत जास्त ब्लेडिंग करण्याचे ध्येय ठेवले आहे. E20 चे लक्ष्य (2025 पर्यंत 20% ब्लेंडिंग) पूर्ण करण्यासाठी बीपीसीएल आपले सर्व डेपो/टर्मिनल्सवरील इथेनॉल स्टोअरेजची क्षमता टप्प्याटप्प्याने वाढवत असून त्याद्वारे 2025 पर्यंत 20% ब्लेंडिंग रोलआउटसाठी अतिरिक्त गरज पुरवली जाणार आहे.