केंद्र सरकारने बजेटमध्ये जाहीर केलेल्या महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट स्किमला महिलांकडून जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे. या योजनेत आतापर्यंत 8630 कोटींची गुंतवणूक झाली आहे.
अल्प बचत योजनांमध्ये नव्याने दाखल झालेल्या महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट स्किमला महिला गुंतवणूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सरकारकडून अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा करण्यात आली होती.
महिला आणि मुलींना केंद्रस्थानी ठेवून बचतीच्या दृष्टीने ही खास योजना तयार करण्यात आली आहे. वर्ष 2025 पर्यंत महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट स्किम सुरु राहणार आहे. यात किमान 1000 रुपयांची तर कमाल 2 लाख रुपयांची गुंतवणूक करता येते. यात वर्षाला 7.5% इतके व्याज दिले जाणार आहे. या योजनेत तिमाही स्तरावर चक्रवाढ पद्धतीने व्याज दिले जाणार आहे. दोन वर्ष मुदतीच्या या योजनेत मुदतपूर्व काही रक्कम काढण्याची मुभा देण्यात आली आहे.
महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट स्किमबाबत केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी यांनी आज संसदेत माहिती दिली. चौधरी म्हणाले की महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट स्किममधून आतापर्यंत 8630 कोटींची गुंतवणूक प्राप्त झाली आहे. ही योजना महिलांच्या पसंतीस उतरली आहे.
टपाल कार्यालये, सरकारी बँकांकडून महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट स्किम राबवली जात आहे. याशिवाय खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, आयडीबीआय बँकांनी महिला सन्मान सेव्हिंग सर्टिफिकेट स्किम राबवण्याचे प्रस्ताव सरकारकडे पाठवले आहेत. महिलांना 31 मार्च 2025 पर्यंत या योजनेत गुंतवणूक करता येणार आहे.