देशातील माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्यांसाठी संघर्षाचा काळ सुरु असला तर विप्रो मात्र गुंतवणूकदारांना लवकरच खूशखबर देणार आहे. विप्रोच्या व्यवस्थापनाने पुन्हा एकदा शेअर बायबॅक करण्याचा विचार केला आहे. पुढील आठवड्यात होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत बायबॅक प्रस्तावावर निर्णय होणार आहे. या वृत्ताने आज सोमवारी 24 एप्रिल 2023 रोजी विप्रोचा शेअर 3% वधारला.
भारतातील टॉप 3 आयटी कंपन्यांमध्ये विप्रोचा समावेश आहे. यापूर्वी वर्ष 2021 मध्ये विप्रोने तब्बल 9156 कोटींचे शेअर बायबॅक केले होते. त्यावेळी अझीम प्रेमझी आणि त्यांच्या कुटुंबियांनी बायबॅकमध्ये सहभाग नोंदवला होता. प्रती शेअर 400 रुपयांनी बायबॅक करण्यात आले होते.आता पुन्हा चालू आर्थिक वर्षात कंपनीने बायबॅकचा प्रस्ताव तयार केला आहे. शेअर मार्केटला यासंदर्भात विप्रो व्यवस्थापनाने माहिती दिली आहे. विप्रोच्या संचालक मंडळाची 26 आणि 27 एप्रिल 2023 रोजी बैठक होणार असून त्यात बायबॅक प्रस्तावावर निर्णय होईल, असे म्हटले आहे. 27 एप्रिल रोजी बोर्डाची मिटिंग संपल्यानंतर शेअर बाजाराल याबाबत कळवले जाईल, असे कंपनीने म्हटले आहे.
दरम्यान, बायबॅकचे वृत्त आणि तिमाही निकालांच्या पार्श्वभूमीवर आज शेअर मार्केटमध्ये विप्रोच्या शेअरला मागणी दिसून आली. आज बाजार बंद होताना विप्रोचा शेअर 377.90 रुपयांवर स्थिरावला. त्यात 2.69% वाढ झाली. 27 तारखेलाच विप्रो चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहे.
डिसेंबर 2022 च्या तिमाहीत विप्रोला 3053 कोटींचा नफा झाला होता. त्यात 2.8% वाढ झाली होती. विप्रोला तिसऱ्या तिमाहीत 23229 कोटींचा महसूल मिळाला होता. त्यात 14.3% वाढ झाली होती.जानेवारी ते मार्च 2023 या तिमाहीत विप्रोच्या महसुलात केवळ 0.5% वाढ होईल, असा अंदाज ब्रोकर्स आणि वित्तीय संस्थांनी व्यक्त केला आहे. तिमाहीत पातळीवर नफ्यात 0.40% वाढ होण्याचा अंदाज आहे.
शेअर बायबॅक म्हणजे काय?
प्रत्येक कंपनीचा मुख्य उद्देश आपला व्यवसाय वाढवणे हाच असतो. यासाठी लागणारे भांडवल कंपनी अनेक मार्गांद्वारे जमा करत असते. या अनेक मार्गांमध्ये प्रमुख मार्ग म्हणजे कंपनीच्या काही भागाची मालकी लोकांना एका ठराविक दरात विकणे. यालाच कंपनीचे शेअर्स विकणे (Company Share) असे म्हटले जाते. हे शेअर्स स्टॉक एक्सचेंज मध्ये आयपीओ (IPO - Initial Public Offering) या प्रक्रियेद्वारे विकले जातात. लोकांनी हे शेअर्स विकत घेतल्यानंतर ते कंपनीच्या ठराविक भागाचे मालक बनतात. विकलेल्या या शेअर्समधून मिळालेले पैसे कंपनी अनेक नव्या उपक्रमांसाठी व कंपनीच्या व्यावसायिक गरजा पूर्ण करण्यासाठी वापरते. कंपनीच्या प्राथमिक गरजा पूर्ण झाल्यानंतर कंपनी आपला विकलेला भाग म्हणजेच शेअर्स लोकांकडून पुन्हा खरेदी करू शकते. या शेअर्स खरेदीच्या प्रक्रियेलाच बायबॅक (buyback) म्हणजेच परत खरेदी असे म्हटले जाते.