माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी विप्रोची बायबॅक ऑफर्स सुरु झाली आहे. विप्रोकडून 12000 कोटींची शेअर पुनर्खरेदी केली जाणार आहे. बायबॅकसाठी 16 जून 2023 ही रेकॉर्ड डेट ठेवण्यात आली होती. या तारखेच्या एक दिवस आधी म्हणजेच 15 जून 2023पर्यंत ज्यांच्याजवळ विप्रोचे शेअर्स आहेत असे गुंतवणूकदार बायबॅकमध्ये सहभागी होणार आहेत.
विप्रोचा शेअर शुक्रवारी 16 जून 2023 रोजी 388.95 रुपयांवर बंद झाला होता. बायबॅकच्या पार्श्वभूमीवर शेअरवर दबाव दिसून आला. विप्रोचा शेअर शुक्रवारी 1.93% घसरला.
विप्रोकडून बायबॅकअंतर्गत एकूण 269662921 शेअर्सची पुनर्खरेदी करणार आहे. एकूण भागभांडवलच्या तुलनेत हे प्रमाण 4.91% इतके आहे. बायबॅकसाठी कंपनीने 445 रुपयांचा दर निश्चित केला आहे. सध्याच्या शेअरच्या किंमतीपेक्षा हा दर 15% ने जास्त आहे.
या शेअर बायबॅकमध्ये विप्रोचे प्रवर्तक आणि संचालक देखील सहभागी होणार आहेत. 31 मार्च 2023 अखेर विप्रोचे संचालक आणि प्रवर्तकांकडे एकूण 400.19 कोटी शेअर्स आहेत. किरकोळ गुंतवणूकदारांना फायदा देण्याच्या दृष्टीने कंपनीने बायबॅकमधील 15% वाटा या श्रेणीसाठी राखून ठेवला आहे. जवळपास 1800 कोटींचे शेअर किरकोळ गुंतवणूकदारांकडून खरेदी केले जाणार आहेत.
विप्रोने यापूर्वी चारवेळा बायबॅक केले आहे. यापूर्वी केलेल्या बायबॅकमध्ये 100% शेअरची पुनर्खरेदी करण्यात आली होती. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी हे प्रमाण 50% ते 100% या दरम्यान होते. जाणकारांच्या मते यंदाही शेअर बायबॅकचे प्रमाण 60% पर्यंत राहण्याची शक्यता आहे.
स्टॉक ब्रोक्रर्सचा गुंतवणूकदारांना सल्ला
- एम्के ग्लोबल फायनान्शिअल सर्व्हिसेसने बायबॅकची घोषणा झाल्यानंतर गुंतवणूकदारांना शेअर खरेदी करुन बायबॅकमध्ये सहभागी होण्याचा सल्ला दिला होता.
- एम्के ग्लोबलने विप्रोचा शेअर 470 रुपयांपर्यंत जाईल, असा अंदाज वर्तवला आहे.
- निर्मल बांग या ब्रोकिंग कंपनीने बायबॅकमुळे विप्रोला नजीकच्या काळात पाठबळ मिळेल, असे म्हटले आहे.
- राईट रिसर्च या संस्थेने विप्रो बायबॅक ही किरकोळ गुंतवणूकदारांसाठी संधी असल्याचे म्हटले आहे.
- कंपनीने सध्याच्या किंमतीच्या तुलनेत 15% प्रीमियमसह ऑफर दिली आहे जी गुंतवणूकदारांसाठी सर्वोत्तम असल्याचे राईट रिसर्चच्या संस्थापक सोनम श्रीवास्तव यांनी म्हटले आहे.
- स्वस्तिक इन्व्हेस्टमार्टच्या इक्विटी रिसर्च हेड अनूभुती मिश्रा यांनी बायबॅकमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांनी सहभागी होण्याचा सल्ला दिला आहे. सध्याच्या शेअरच्या किंमतीनुसार बायबॅकमध्ये 15% जादा नफा मिळणार आहे.
- अॅंजलवनचे अॅडव्हायझरी प्रमुख अमर देओल सिंग यांनी विप्रोच्या शेअरची कामगिरी बायबॅकनंतर सुधारू शकते. या बायबॅकमध्ये 40% शेअरची पुनर्खरेदी शक्य असल्याचा अंदाज त्यांनी म्हटले आहे.