माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील विप्रो कंपनीच्या संचालक मंडळाने 12000 कोटींच्या शेअर बायबॅक प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. कंपनीने आज गुरुवारी 27 एप्रिल 2023 रोजी चौथ्या तिमाहीतील निकालांची घोषणा केली. 31 मार्च 2023 अखेर संपलेल्या तिमाहीत कंपनीला 3074 कोटींचा नफा झाला. गतवर्षाच्या तुलनेत यंदा नफ्यात किंचिंत घसरण झाली.
आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपन्या टीसीएस आणि इन्फोसिस यांच्या निराशाजनक कामगिरीनंतर गुंतवणूकदारांचे विप्रोच्या निकालांवर लक्ष लागले होते. कंपनीच्या नफ्यात 0.4% घसरण झाल्याने आयटी कंपन्यांसाठी पुढील आर्थिक वर्ष संघर्षाचे राहण्याची शक्यता आहे.
विप्रोला 3074 कोटींचा नफा मिळाला. यात 0.4% घसरण झाली. आर्थिक वर्ष 2021-22 मधील चौथ्या तिमाहीत कंपनीला 3087 कोटींचा नफा झाला होता. नफ्यात किंचिंत घट झाली असली तरी एकूण महसुलात मात्र 11% वाढ झाली आहे. कंपनीला जानेवारी ते मार्च 2023 या काळात 23190 कोटींचा महसूल मिळाला. दरम्यान, तिमाहीली निकालांचा फारसा परिणाम आजच्या सत्रात विप्रोच्या शेअरवर झाला नाही. दिवसअखेर विप्रोचा शेअर 374.40 रुपयांवर बंद झाला.
आयटी सेवांमधून मिळणारा महसूल 4% वाढला आहे. वार्षिक आधारावर विप्रोला 2823 मिलियन डॉलर्सचा महसूल मिळाला. याच तिमाहीत कंपनीचे आयटी सेवांचे मार्जिन 16.3% इतके होते. चौथ्या तिमाहीत जागतिक पातळीवर कठिण परिस्थिती असताना देखील विप्रोने मार्जिन कायम राखल्याचे कंपनीचे सीएफओ जतीन दलाल यांनी सांगितले.
वार्षिक कामगिरीचा विचार केला तर आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये विप्रोला 11350 कोटींचा नफा मिळाला. त्यात 7.2% घसरण झाली. त्याआधीच्या वर्षात विप्रोला 12229.6 कोटींचा नफा झाला होता. आर्थिक वर्ष 2023 मध्ये कंपनीला 90487.6 कोटींचा नफा झाला आहे. त्यात 14.40% वाढ झाली.
कंपनीच्या संचालक मंडळाची शेअर बायबॅकला मंजुरी
विप्रो कंपनीच्या संचालक मंडळाने 26.9 कोटी शेअर्स बायबॅक करण्याच्या प्रस्ताव मंजूर केला आहे. एकूण शेअर्सपैकी हे प्रमाण 4.91% इतके आहे. कंपनी प्रती शेअर 445 रुपयाने पुनर्खरेदी करणार आहे. सध्याच्या शेअरच्या तुलनेत बायबॅक ऑफर 18.9% ने जास्त आहे. या बायबॅकमध्ये प्रमोटर्स देखील सहभागी होण्याची शक्यता आहे.
बायबॅकच्या प्रस्तावाला समभागधारकांची देखील मंजुरी आवश्यक आहे. तो मंजूर झाल्यानंतर कंपनीकडून बायबॅक प्रक्रियेचा तपशील जाहीर केला जाणार आहे.
यापूर्वी कंपनीने 29 डिसेंबर 2020 ते 11 जानेवारी 2021 या काळात शेअर बायबॅक केला होता. 9500 कोटींचे शेअर विप्रोने पुनर्खरेदी केले होते.