Share Market Performance: गुंतवणूक केलेल्या पैशांतून चांगला परतावा मिळावा अशी प्रत्येक गुंतवणुकदाराची अपेक्षा असते. त्यासाठी अनेकजण जोखीमही घ्यायला तयार असतात. मात्र, मागील दीड वर्षाचा विचार करता भांडवली बाजार गटांगळ्या खात आहे. जागतिक आणि स्थानिक असे दोन्ही घटक त्यास कारणीभूत आहेत. सेन्सेक्स आणि निफ्टी हे प्रमुख निर्देशांक अस्थिर असून गुंतवणुकदारांच्या भावनांवर स्वार होऊन कधी वर तर कधी खाली असा प्रवास सुरू आहे.
डेट, इक्विटी म्युच्युअल फंडाच्या अनेक योजनांनी नकारात्मक परतावा दिला आहे. काही इक्विटी फंड्सने सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मुदत ठेवींपेक्षाही (एफडी) कमी परतावा दिला आहे. भांडवली बाजारातील ही अस्थिर परिस्थिती पाहता गुंतवणुकदार कमी जोखीम असलेल्या आणि निश्चित परतावा योजनांकडे आकर्षित होत आहेत. घरखरेदी, सोने, पोस्ट ऑफिस आणि सरकार पुरस्कृत बचत योजनांना पसंती मिळत आहे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे भांडवली बाजारातील पडझड.
अनेक गुंतवणुकदारांचा पोर्टफोलिओ खाली आला आहे. त्यामुळे काहीजण गोंधळून जाऊन बाजारातून पैसे काढून घेत आहेत. मात्र, अशा परिस्थितीत चलबिचल होऊ न देता बाजाराचा चांगला अभ्यास करून निर्णय घ्यावा, असा सल्ला गुंतवणूक सल्लागार देतात. नाहीतर नुकसान होण्याची शक्यता असते. या लेखात पाहून मागील दीड वर्षापासून कोणत्या घडमोडींमुळे भांडवली बाजार डळमळीत झाला आहे.
1) रशिया युक्रेन युद्ध
रशिया-युक्रेन युद्ध सुरू होऊन आता दीड वर्ष पूर्ण होत आले आहे. या युद्धामुळे जगातील प्रमुख देश दोन गटांत विभागले गेले आहेत. रशियातून युरोपला होणारा तेल पुरवठा युद्धामुळे विस्कळीत झाल्याने युरोपात महागाईचा आगडोंब उसळला. तेलाच्या किंमती अचानक वाढल्याने कंपन्यांमध्ये तयार होणाऱ्या मालाच्या किंमती वाढल्या. वाहतूक महागल्याने त्याचा परिणाम सर्वच क्षेत्रांवर झाला.
www.nationalreview.com
हिवाळ्यात तर इंधनाची गरज आणखी वाढते. त्यामुळे महागाईच्या या आगीत जणू आणखी तेलच पडले. एकंदर रशिया-युरोप युद्धाचा संपूर्ण जगावर दिसून आला. भारतातही महागाई वाढली. परिणामी रिझर्व्ह बँकेने मागील अनेक पतधोरण बैठकांत दरवाढ केली. बाजारातील मागणीही कमी झाली.
2) कच्च्या तेलाचे दर
रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाले तेव्हा जागतिक स्तरावर इंधनाचे दर 100 डॉलरच्या पुढे गेले होते. दरम्यान, हे दर नंतर खालीही आले. मात्र, भारताला 60-65 प्रति बॅरल दरही आता जास्त वाटू लागले आहेत. डॉलरच्या तुलनेत रुपया खाली आल्याने आयातीसाठी भारताला जास्त मोजावे लागत आहेत.
तेल उत्पादक आखाती देशांचे सतत बदलणारे धोरणही तेलाच्या किंमतीवर प्रभाव पाडते. कच्च्या तेलाच्या उत्पादनात कपात करण्याचा निर्णय आखाती देशांनी घेतल्यामुळे येत्या काही दिवसांत तेलाचे भाव आणखी वाढू शकतात. या घडामोडींचा भांडवली बाजारावर नकारात्मक परिणाम झाला.
3)अमेरिकेतील व्याजदर वाढ आणि बँकिंग संकट
कोरोना काळात अनेक देशांनी अर्थव्यवस्था पुन्हा उभी राहण्यासाठी जास्त प्रमाणात पैसा अर्थव्यवस्थेत सोडला. स्वस्त कर्ज, थेट नागरिकांना विविध योजनांतून आर्थिक मदत, रोजगार भत्ता यासह अनेक गोष्टींसाठी पैसा दिला. मात्र, कोरोना संपल्यानंतर महागाईचा आगडोंब उसळला. अमेरिकेतील महागाई अद्यापही नियंत्रणात आली नाही. तसेच अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेत भूकंप झाला तर त्याचे हादरे भारतासह संपूर्ण जगभरात बसतात.
www.pewresearch.org
बँकिंग क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचा कणा म्हटले तरी वावगे ठरणार नाही. हे महत्त्वाचे क्षेत्र अमेरिकेत कोसळले. मोठ्या बँका पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या. अनेक बँकांच्या ठेवी बुडाल्या. सरकारने हस्तक्षेप करत ही पडझड तात्पुरती थांबवली मात्र, यातून भांडवली बाजारात नकारात्मक संदेश गेला. गुंतवणूकदार अधिक सावध झाले. जगभरातील प्रमुख भांडवली बाजार या घटनेमुळे खाली आले. भारतावर या घटनेचा अप्रत्यक्ष परिणाम झाला.
4) मान्सून आणि निवडणुका
यंदा मान्सूनचा पाऊस भारतात पुरेसा होणार नाही, असा अंदाज वर्तवले जात आहे. कमी पाऊस म्हणजेच शेतीचे उत्पन्न घटेल. ग्रामीण अर्थव्यवस्था आणखी खाली जाईल. तसेच शेती ही अर्थव्यवस्थेतील अनेक क्षेत्रांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या जोडलेली असते.
अन्नधान्य किंमत वाढ, आयात-निर्यात, प्रक्रिया, निर्मितीसह अनेक क्षेत्रांवर याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अपुऱ्या मान्सूनचे पडसाद आतापासूनच बाजारावर दिसू लागले आहेत. महागाई वाढली तर पुन्हा आरबीआयकडून दरवाढ झाली तर बाजार आणखी खाली येईल.
www.thedailyeye.info
चालू वर्षात अनेक कर्नाटक, छत्तीसगडसह अनेक महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणुका आहेत. तसेच पुढील वर्षी लोकसभेच्या निवडणुका होतील. या निवडणुकांचा भांडवली बाजारावर नकारात्मक परिणाम होतो. उद्योग व्यवसायांना स्थिर सरकार हवे असते. जर राज्य किंवा केंद्रातही सरकार बदलले तर कंपन्यांच्या निर्णयावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे आगामी काळातही भारतीय भांडवली बाजारात अस्थिर वातावरण दिसू शकते.