भाडेकरु आणि मालक यांच्या कितीही मैत्री असली,खूपच घनिष्ठ संबंध असले अगदी नाते असले तरी प्रॉपर्टी भाड्याने देताना एक करार करावा लागतोच.हा करार सर्वसाधारणपणे 11 महिन्यांसाठी केला जातो. हा करार 11 महिन्यांसाठीच का 12 महिन्यांसाठी का नाही असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.पण भाडे करार 11 महिन्यांचाच असण्यामागे काही कारणे आहेत.(Lease Agreements or Leave and License Agreement)
भाडे करारामध्ये दोन्ही पक्षांसाठी अटी आणि शर्थींचा उल्लेख केलेला असतो आणि करार पूर्ण झाल्यावर या अटी आणि शर्थी दोन्ही पार्टीजना मान्य असतात असे मानले जाते. अॅग्रीमेंट हा भाडेकरु आणि घरमालक यांच्यातील कायदेशीर संबंध म्हणून काम करते. नेहमीच्या भाडे कराराच्या स्वरूपामध्ये प्रस्तावित भाडे, आगाऊ रक्कम, घरमालकाने दिलेल्या अटी व शर्ती, मालमत्तेचा अचूक आकार आणि स्थान, प्रस्तावित वापर आणि दोन्ही पक्षांशी संबंधित इतर तपशील यांचा समावेश असतो.
फारपूर्वी भाडे करार हा तोंडी किंवा परस्पर विश्वासावर होत असे. नाममात्र भाडं असल्याने घरमालक आणि भाडेकरु यांच्यात लिखीत करार करण्याची आवश्यकता भासत नसे. मात्र या पद्धतीचा भाडेकरुकडून गैरफायदा घेण्याचे प्रकार वाढू लागले. अनेकदा घरमालकाला भाडेकरुकडून मालमत्ता खाली करुन घेण्यासाठी कायदेशीर लढाई लढावी लागल्याचे दिसून आले. दिर्घ मुदतीच्या भाडेपट्ट्याच्या काही प्रकरणांमध्ये भाडेकरुने मालमत्तेवर मालकी दाखवल्याचेही प्रकार घडले आहेत. कोर्टकज्जे झाले आणि दोन्ही बाजूने यात मनस्ताप सहन करावा लागला. कायदेशीर लढाई दिर्घकाळ सुरु राहिल्याने घरमालकाला न्याय मिळण्यासही बराच कालावधी लागतो. या दरम्यान देखील भाडेकरु मालमत्तेचा वापर करत असतो.
यामुळेच भाडे करार हा इथं महत्वाचा दस्त ठरतो.घरमालक आणि भाडेकरु यांच्यात मतभेद होण्याची शक्यता असते. अशा प्रकरणांमध्ये भाडे करार हा तोडगा काढण्यासाठी महत्वाचा दस्त ठरतो.लिखीत करारामुळे घरमालकाला भाडेकरुकडून झालेल्या नुकसानीबाबत दावा दाखल करण्यास मदत होते. शिवाय करार एखाद्याला भविष्यातील खटल्यापासून संरक्षण देतो.
...म्हणून नोंदणीची आवश्यकता नाही
एक वर्षापेक्षा कमी कालावधीचा करार असल्याने भाडे कराराची नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. रजिस्ट्रेशन अॅक्ट 1908 च्या कलम 17अन्वये, एक वर्षापेक्षा कमी कालावधीसाठी भाडेपट्टी कराराची नोंदणी करण्याची आवश्यकता नाही. एक वर्षापेक्षा कमी कालावधीचे भाडेकरार नोंदणीशिवाय केले जाऊ शकतात.म्हणूनच सर्वसाधारणपणे घरमालक आणि भाडेकरु यांच्यात 11 महिन्यांचा भाडेकरार करण्याची पद्धत लोकप्रिय आहे. भाडेकरार एक वर्षापेक्षा कमी असेल तर त्याची नोंदणी करावी लागणार नाही किंवा तुम्हाला मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही. यामुळे पैशांचीही बचत होते.भाडे कराराची नोंदणी करायची झाल्यास मुद्रांक शुल्काची रक्कम भाडे आणि कराराचा कालावधी यावरुन निश्चित केली जाते.भाडेकरु जितका जास्त काळ राहतील तितके जास्त मुद्रांक शुल्क भरावे लागेल.त्यामुळे भाडे करार नोंदणीकृत असला तरीही कमी कालावधीमुळे मुद्रांक शुल्कातून बचत होते. ज्यांना नोंदणी करायची नसेल ते साधी नोटरी करुन देखील आपसांत करार करतात.