कायदेशीर कामासाठी कधी-कधी आपले बँक खाते फ्रीज होते किंवा गोठवले जाते. कधी-कधी प्राप्तिकर विभागाच्या तर कधी-कधी न्यायालयाच्या आदेशानेही बँक खाते फ्रीज होऊ शकते. अशा वेळी प्राप्तिकर विभाग किंवा न्यायालयाचे आदेश असल्याखेरीज खाते पुन्हा अनफ्रीज होत नाही. एकदा खाते फ्रीज झाले की खातेधारक त्यातून पैसे काढू शकत नाही. परंतु अनेक प्रकरणांमध्ये जोपर्यंत खाते अनफ्रीज होत नाही, तोपर्यंत त्या खात्यात आणखी पैसे भरण्याची अनुमती मात्र दिली जाते.
खाते फ्रीज करण्याचा अर्थ असा की, खातेधारक आपल्या बँक खात्यातून कोणतेही देवाणघेवाणीचे व्यवहार करू शकत नाही. खाते फ्रीज झाल्यानंतर त्यातून केली जाणारी सर्व प्रकारची पेमेन्टही आपोआप थांबतात.
भारतात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, आयकर विभाग, न्यायालये आणि सेबी या यंत्रणांना बँक खाते फ्रीज करण्याचा अधिकार प्रदान करण्यात आला आहे. सामान्यतः बँकेच्या खातेदाराचे खाते बंद करण्यापूर्वी त्याला रीतसर नोटीससुद्धा दिली जाते. काही वेळा एखाद्या बँक खात्यावर संशयास्पद व्यवहार होऊ लागतात. अशा वेळी सावधगिरीचा मार्ग म्हणून बँक संबंधित खाते फ्रीज करू शकते. जर एखादी व्यक्ती आपल्या बँक खात्यातून सर्वसाधारण व्यवहार करीत असेल आणि अचानक त्याच्या बँक खात्यातून ऑनलाइन खरेदी मोठ्या प्रमाणावर होऊ लागली किंवा डेबिट कार्डच्या माध्यमातून परदेशात खरेदी होऊ लागली, तर अशा वेळी बँक सक्रिय होऊन संबंधिताचे बँक खाते फ्रीज करू शकते. अशा परिस्थितीत संबंधित खातेदाराचे बँक खाते हॅक झाले असावे किंवा डेबिट कार्ड चोरीला गेले असावे, असा संशय बँकेला असतो.
बँकेचे वरिष्ठ अधिकारी सांगतात की, जे खातेदार तीन वर्षांत एकदाही केवायसी करत नाहीत. त्यांचे खाते फ्रीज केले जाते. एखाद्या खात्यात सहा महिन्यातून एकही व्यवहार झाला नाही, तरीही संबंधित खाते फ्रीज होऊ शकते. अनेक बँकांमध्ये त्यासाठी संगणकीय प्रणाली कार्यरत असते. म्हणजे, बँकेचे कर्मचारी काहीच करत नाहीत. जर सहा महिन्यांच्या काळात एखाद्या खात्यावर अजिबात व्यवहार झाला नाही, तर संगणकीय प्रणाली ते खाते आपोआप फ्रीज करते.
खाते गोठवले गेल्यास...
जर आपले बँक खाते कोणत्याही कारणाने फ्रीज झाले तर सर्वप्रथम तातडीने बँकेच्या शाखेशी संपर्क साधावा. खाते फ्रीज होण्याचे कारण काय आहे, हे बँक व्यवस्थापनाला विचारावे. जर संशयास्पद देवाणघेवाण किंवा KYC पूर्ण न होणे हे कारण असेल तर आपले खाते लगेच सुरू होऊ शकते. परंतु जर सेबी, प्राप्तिकर विभाग किंवा न्यायालयाच्या आदेशाने खाते फ्रीज झाले असेल, तर तेथून आदेश आल्याखेरीज बँक प्रशासन काहीही करू शकत नाही.
IMAGE SOURCE - https://bit.ly/3kCbEB5