देशातील गव्हाच्या वाढलेल्या किमतीमुळे केंद्र सरकार हैराण झाले होते. गव्हाच्या भावाचा परिणाम पिठावर होताना दिसत होता. नुकतेच केंद्र सरकारने गव्हाचे भाव कमी करण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, एफसीआयने (FCI) 30 लाख टन गहू खुल्या बाजारात विकण्याची योजना तयार केली. याचा परिणाम गव्हाच्या दरावर (Wheat Price) दिसून आला आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे.
केंद्रीय अन्न सचिव संजीव चोप्रा यांनी गव्हाच्या किंमतीबाबत वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, खुल्या बाजारात 30 लाख टन गहू विकण्याच्या निर्णयाचा परिणाम घाऊक आणि किरकोळ बाजारातील गव्हाच्या किमतीवर दिसून आला आहे. गव्हाचे दर किलोमागे पाच रुपयांनी कमी झाले आहेत. ते म्हणाले की, केंद्र सरकारला सर्वसामान्यांना अधिक स्वस्त गहू उपलब्ध करून द्यायचा आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. गव्हाचे भाव कमी करण्यासाठी जे काही शक्य होईल. ती पावले उचलली जातील.
गव्हाचे भाव कमी झाले
केंद्र सरकारने 30 लाख टन गहू बाजारात आणल्यानंतर त्याचा परिणाम घाऊक आणि किरकोळ बाजारात दिसून येत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, गव्हाचा घाऊक दर प्रति क्विंटल 3000 रुपयांवरून 2500 रुपये प्रति क्विंटलवर आला आहे. किरकोळ बाजारात गव्हाचे दर सुमारे 3400 रुपये प्रति क्विंटलवरून 2900 रुपये प्रति क्विंटलवर आले आहेत. या प्रक्रियेनंतर केंद्र सरकारने गव्हाचे भाव खाली येतील, अशी अपेक्षा व्यक्त केली होती, तीही दिसून येत आहे. त्याचबरोबर येत्या काही दिवसांत किंमत आणखी कमी होण्याची शक्यता आहे.
गव्हावरील निर्यातबंदी उठणार का?
रशिया-युक्रेन युद्ध, अधिक निर्यातीमुळे गव्हाच्या किमती झपाट्याने वाढल्या होत्या. गव्हाच्या दरात वाढ झाल्याचा परिणाम पीठाचा किंमतीवरही होऊ लागला आहे. पिठाच्या किमती नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र सरकारने गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. गव्हाचे व्यापारी अनेक दिवसांपासून निर्यातीमध्ये सूट देण्याची मागणी करत होते. मात्र नुकतेच केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, केंद्र सरकार गव्हाच्या निर्यातीवरील बंदी उठवण्याचा कोणत्याही प्रकारचा विचार करत नाही. गेल्या वर्षी मे महिन्यात गव्हावर बंदी लागू करण्यात आली होती.
गव्हाचे उत्पादन
काही राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेमुळे भारताचे गव्हाचे उत्पादन 2021-22 पीक वर्षात (जुलै-जून) 10 कोटी 95.9 लाख टनांवरून घसरून 10 कोटी 77.4 लाख टन झाले. गेल्या वर्षीच्या सुमारे 4.3 कोटी टनांच्या खरेदीच्या तुलनेत यावर्षी 1.9 कोटी टन खरेदी झाली आहे. चालू रब्बी (हिवाळी-पेरणी) हंगामात गहू पिकाखालील क्षेत्र थोडे जास्त आहे. कृषी मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की चालू पीक वर्ष 2022-23 मध्ये गव्हाचे उत्पादन विक्रमी 11 कोटी 21.8 लाख टनांपर्यंत वाढू शकते. एप्रिलपासून गहू खरेदीला गती मिळण्याची अपेक्षा आहे.