Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Abdul Karim Telgi ने केलेला बनावट स्टॅम्प घोटाळा नेमका होता काय? जाणून घ्या सविस्तर

Telgi Scam

स्टॅम्प घोटाळयातून तेलगीने कोट्यवधींची संपत्ती कमवली. CBI च्या तपासात देशभरात त्याच्या नावावर 36 ठिकाणी मालमत्ता असल्याचे निष्पन्न झाले. त्याचे शंभराहून अधिक बँक खाते होते. या बँक खात्यातून तो पैशांचे व्यवहार करायचा.

अब्दुल करीम तेलगी हे नाव आता अनेकांच्या परिचयाचे झाले आहे. याचे कारण म्हणजे स्टॅम्प घोटाळा! देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा मुद्रण घोटाळा होता. हा घोटाळा होता तब्बल 30,000 कोटींचा! 2000 च्या सुरुवातीला हा घोटाळा उघडकीस आला आणि घोटाळ्यातील मुख्य आरोपी अब्दुल करीम तेलगी याला अटक केली गेली. या घोटाळ्याचे देशाच्या आर्थिक परिस्थितीवर दूरगामी परिणाम झाले, ज्यामुळे वित्तीय संस्था, सरकारी संस्था आणि सामान्य जनता देखील प्रभावित झाली. अब्दुल करीम तेलगी याने केलेला हा स्टॅम्प घोटाळा नेमका होता काय? हे जाणून घेऊयात या लेखात…

तेलगी हा मुळचा कर्नाटकातील खानापूर येथील रहिवासी होता. त्याचे वडील इंडियन रेल्वेत एका चांगल्या हुद्द्यावर कामावर होते. वडिलांचे अकाली निधन झाल्यानंतर अब्दुल करील तेलगी, त्याचे दोन भाऊ आणि आई आर्थिक विवंचनेत सापडले. तेलगी बंधूंनी सुरुवातीच्या काळात खानापूर रेल्वे स्टेशनवर फळे विकली. अब्दुल स्वतः रेल्वेत चणे, शेंगदाणे विकायचा. हे सगळं करता करता अब्दुल शाळेतही जात होता . त्याने गावातच शाळा आणि कॉलेजचे शिक्षण पूर्ण केले. अब्दुल तेलगी बी.कॉम. उत्तीर्ण होता.

बी. कॉम. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तेलगी नोकरीच्या शोधात मुंबईला आला. मुंबईत त्याने काही ठिकाणी नोकरी करण्याचा प्रयत्न केला परंतु त्याला त्यात काही यश आलं नाही. मुंबईतून तेलगीने थेट सौदी अरेबिया गाठलं. तिथे देखील त्याने नोकरी करू बघितली, मात्र नोकरीतच त्याचे मन काही रमले नाही. तो पुन्हा भारतात आला आणि त्याने भारतातच एक ट्रॅव्हल एजन्सी सुरु केली.

इथे सुरु झाली बदमाशी!

अब्दुल करीम तेलगी सौदी अरेबियात जाऊन आला होता. तिथे भारतातून कामानिमित्त लोंढेच्या लोंढे येतात हे त्याने पहिले होते. भारतीयांना दुबईला जाण्यासाठी  खूप सारी कागदपत्रे तयार करावी लागतात हे त्याला माहित होतं. तेलगीने ‘अरेबियन मेट्रो ट्रॅव्हल एजन्सी’ च्या माध्यमातून भारतीय नागरिकांना बनावट कागदपत्रे देऊन दुबईला पाठवण्याची योजना आखली. तेलगीकडे गेले की आपले काम होतेच होते, असा अनेकांना विश्वास बसू लागला होता. यातून तेलगीने बक्कळ पैसा कमावला.

परंतु इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी 1993 साली तेलगीला रंगेहाथ पकडले आणि त्याच्यावर कारवाई केली. तेलगीला या गुन्ह्यात पहिल्यांदा अटक झाली. जेलमध्ये असताना तेलगीची ओळख एका अन्य आरोपीशी झाली. त्याचे नाव होते राम रतन सोनी.

स्टॅम्प घोटाळ्याचा कट जेलमध्ये शिजला 

मुळचा कलकत्ता येथील रहिवासी असलेला राम रतन सोनी एक मुद्रांक वितरक होता. त्याला मुद्रांक कुठे बनतात, ते कसे वितरीत केले जातात याची कल्पना होती. राम रतन सोनी यांनी जेलमधून बाहेर पडल्यावर बनावट  स्टॅम्प बनवण्याची योजना आखली.

नाशिक येथील इंडियन सेक्युरिटी प्रेस (Indian Security Press) येथे मुद्रांक छापले जायचे. जेव्हा केव्हा मुद्रांक छापणारे मशीन खराब व्हायचे तेव्हा ते एक तर भंगारात टाकून दिले जाई किंवा लिलावात विकले जाई. सोनी आणि तेलगीने 1994 साली Indian Security Press मधून बिघाड झालेले मुद्रांक छपाई मशीन खरेदी केले. हे मशीन मुंबईत आणून त्याची दुरुस्ती केली.

सरकारी अधिकाऱ्यांशी जवळीक 

आता सोनी आणि तेलगीकडे मुद्रांक छापणारे मशीन होते. मात्र मुद्रांक ज्या कागदावर छापले जायचे तो कागद आणि शाई मात्र त्याच्याकडे नव्हती. हुबेहूब सरकारी मुद्रांक दिसावेत म्हणून तेलगीने शक्कल लढवली. तेलगीने नाशिकमधल्या  इंडियन सेक्युरिटी प्रेसमधील काही कर्मचाऱ्यांशी आणि अधिकाऱ्यांशी जवळीक साधली. त्यांच्याकडून तेलगीने कागद आणि शाई मिळवली, तसेच प्रेसला कच्चा माल कोठून पुरवला जातो याची माहिती घेतली. 1994 मध्येच अधिकृत परवाना घेऊन तेलगी मुद्रांक वितरक बनला.

1995 ला दुसऱ्यांदा अटक 

तेलगीने आणि सोनीने मिळून बनावट मुद्रांक छपाई सुरु केली होती. स्टॅम्प पेपर मार्केट आपल्यासाठी अत्यंत किफायतशीर आहे असा त्यांना विश्वास होता. भारतातील विविध कायदेशीर व्यवहारांमध्ये स्टॅम्प पेपर एक आवश्यक घटक आहे, ज्याचा वापर मालमत्तेची खरेदी विक्री, शेअर बाजारातील व्यवहार आणि न्यायालयीन कागदपत्रे यांमध्ये केला जातो हे त्यांना माहिती होतं.

सोनी आणि तेलगीने बनावट मुद्रांक पेपर विकायला सुरुवात केली. पोलिसांना ही खबर लागताच त्यांनी 1995 साली तेलगीला अटक केली. तेव्हा तेलगीच्या विरोधात फारसे पुरावे पोलिसांनी सापडले नाही. मात्र तेलगीचा मुद्रांक विक्रीचा परवाना रद्द करण्यात आला. एव्हाना राम रतन सोनी आणि तेलगी वेगळे झाले होते. तेलगी आपला स्वतंत्र व्यवसाय चालवत होता.

स्वतःची प्रेस सुरु केली! 

1996 साली तेलगीने स्वतःची एक प्रिंटींग प्रेस सुरु केली. याच प्रेसमध्ये तो बनावट मुद्रांक छापू लागला. आता तेलगीचा आत्मविश्वास वाढू लागला होता. त्याने देशभरात आपले हातपाय पसरायला सुरुवात केली होती. जवळपास 18 राज्यांमध्ये तो बनावट मुद्रांक पेपर वितरीत करू लागला. यासाठी त्याने जवळपास 350 एजंट नेमले होते.

तेलगीने छापलेले मुद्रांक इतके हुबेहुबे होते की ते खरे आहेत की बनावट हे सरकारी अधिकाऱ्याला देखील ओळखता येत नव्हते. बनावट मुद्रांक विकले जावेत म्हणून असली मुद्रांक बाजारात येऊ नये म्हणूनही तेलगीने प्रयत्न केले. एजंटकडून चुकीच्या पत्त्यावर सरकारी मुद्रांक मागवून तेलगी त्यांची विल्हेवाट लावायचा.

घोटाळा उघडकीस आला 

2000 साली बंगळूरू येथे बनावट मुद्रांक खरेदी-विक्री प्रकरणी 2 जणांना अटक केली गेली. त्यांच्याकडून माहिती घेतली असता पोलिसांचा तपास अब्दुल करील तेलगीपर्यंत पोहोचला. हे प्रकरण CBI कडे गेले आणि तेलगीच या मुद्रांक घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार असल्याचे उघडकीस आले. तेलगी आणि त्याच्या या घोटाळ्यात सहभागी असलेल्या सर्वांची झाडाझडती घेतली गेली. नाशिकच्या इंडियन सेक्युरिटी प्रेसपासून मुंबईतील महसूल विभागातील आणि पोलीस दलातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची यात मिली भगत असल्याचे समोर आले. यात काही राजकारणी मंडळी देखील सामील होती. सगळ्या दोषींवर कारवाई केली गेली, त्यांच्यावर आरोपपत्र दाखल झाले आणि त्यांना सेवेतून बडतर्फ केले गेले.

या घोटाळयातून तेलगीने कोट्यवधींची संपत्ती कमवली. CBI च्या तपासात देशभरात त्याच्या नावावर 36 ठिकाणी मालमत्ता होत्या. त्याचे शंभराहून अधिक बँक खाते होते. या बँक खात्यातून तो पैशांचे व्यवहार करायचा.

दोषी आणि शिक्षा

2007 मध्ये, तेलगीला घोटाळ्याशी संबंधित अनेक प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आले आणि त्याला 30 वर्षांची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली. त्याला 10 अब्ज रुपयांचा भरघोस दंडही ठोठावण्यात आला. आतापर्यतच्या इतिहासात इतका मोठा आर्थिक दंड देण्याची ही पहिलीच वेळ होती. 
शिक्षा भोगत असताना 2017 मध्ये त्याचा मृत्यू झाला.

मुद्रांक पेपर घोटाळ्यामुळे भविष्यात अशा मोठ्या प्रमाणात फसवणूक टाळण्यासाठी भारत सरकारने मुद्रांक शुल्क संकलन प्रक्रियेत विविध सुधारणा केल्या. आता मुद्रांकपत्रांची सुरक्षित छपाई होते आणि छपाईबाबत सरकारने कठोर नियम केले आहेत. तसेच मुद्रांक शुल्क संकलनाचे आता डिजिटलरित्या केले जाते.