आयुष्यात वेगवेगळ्या कारणांसाठी आपल्याला बॅंकांमध्ये अनेक बचत खाती (savings account) उघडावी लागतात. तरुण असताना जितक्या झटपट नोकऱ्या बदलतो, तितक्याच झटपट बॅंक अकाउंट उघडली जातात. पुढे आपल्या कंपन्या बदलतात, जागा बदलतात, शहरं बदलतात तसतशी अकाउंटही बदलत जातात. मात्र वापर थांबलेली अकाउंट बँक काही काळानंतर बंद करते. वापरात नसलेली अकाउंट तशीच राहिली तर आपलं नुकसान (loss) देखील होऊ शकतं. न वापरलेल्या बँक अकाउंटचा आर्थिक फटका कसा आणि कशामुळे बसतो ते आपण आता पाहूयात.
बॅलन्स रक्कम
वापर थांबलेल्या बॅंक अकाउंटमध्ये बॅलन्स (balance) तसाच पडून राहतो. सध्याच्या काळात जो मिनिमम बॅलन्स ठेवावा लागतो, ते आकडेही मोठे आहेत. जशी बॅंक असेल त्यानुसार ही किमान पाच आकडी रक्कम असते. ती आपण उगाच पडून राहू देतो, तिचा काही उपयोग नसतो.
रिटर्नच्या कामात अडचण येऊ शकते
प्राप्तिकरावर (income tax) वार्षिक रिटर्न (return) दाखल करायच्या वेळी ही वापर थांबवलेली बॅंक अकाउंट आठवतात. कारण रिटर्न दाखल करण्यासाठी सगळ्या अकाउंटची माहिती मागवली जाते. ती द्यावी लागते. अशा वेळी अकाउंट वापरात नसलं तरी त्याची माहिती गोळा करून द्यावीच लागते.अकाउंट चालवण्याचे नियम - अलीकडे बॅंक अकाउंटबद्दल नियम खूप कडक केले आहेत. त्यात बदल होत आहेत. सहसा वर्षापेक्षा जास्त काळ वापरात नसलेलं अकाउंट निष्क्रिय होतं. (य़ाबाबतचे आपल्या अकाउंटला लागू असलेले नियम आपल्या बॅंकेकडून माहिती करून घ्यावेत.) असं dormant account काही काळानं, कोणत्याही कारणानं ॲक्टिव्हेट करायची वेळ आली की पुन्हा कागदपत्रांचे सोपस्कार करावे लागतात.
लॉंग टर्मची गुंतवणुकीत अडचण
निष्क्रिय अकाउंटचे डिटेल्स आपण कुठं दिले, हे काही काळानं आठवणं कठीण होतं. विशेषतः, ज्यांना स्वतःकडील कागदपत्रं, नोंदी इत्यादी व्यवस्थित ठेवण्याची सवय नाही अशांची अडचण होते. दीर्घकाळसाठीची गुंतवणूक केली असेल आणि त्यासाठी हे बॅंक अकाउंट वापरलं असेल तर ती गुंतवणूक (investment) परत मिळवताना कटकट वाढू शकते. आणि परिणामी विलंबही होऊ शकतो. अनेक तोटे दिसत असताना, वापरात नसलेल्या बॅंक अकाउंटकडं दुर्लक्ष करणं योग्य नाही. त्यापेक्षा ते बंद करणंच योग्य ठरतं.
अकाउंट बंद करण्यापूर्वी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे ते पाहू
- आधी संबंधित अकाउंटचं संपूर्ण स्टेटमेंट किंवा पूर्ण पासबुक कंटाळा न करता लक्षपूर्वक पाहावं. हे अकाउंट आपण कशासाठी वापरलं, त्याचे डिटेल्स अन्य कुठं दिले होते का याची माहिती त्यातून मिळते. स्वतःच्या आर्थिक नोंदी व्यवस्थित ठेवण्याची सवय नसलेल्यांना या आठवणीचा उपयोग होऊ शकतो. या अकाउंटचे डिटेल्स, वापरातल्या अकाउंटने रिप्लेस करता येतात. म्हणजे गुंतवणूक( investment) इत्यादी परत मिळताना अडचण येत नाही.
- प्रॉव्हिडंट फंड, पेन्शन स्कीम्स, रिटायरमेंट प्लॅन्स, वेगवेगळे इन्शुरन्स, पीपीएफ इत्यादी जिथे कुठे हे अकाउंट जोडलेलं असेल, त्याचे डिटेल्स दिले असतील तर तिथे ते आधी रिप्लेस करून घ्यावे. कारण या सगळ्या हमखास दीर्घकाळच्या योजना असतात आणि भविष्यकाळ सुरक्षित ठेवण्यासाठी महत्त्वाच्या असतात.
- त्याशिवाय परदेशातला प्रवास, सुरू नसलेले व्यवसाय, टॅक्स सिस्टीम्स, वेगवेगळ्या फायनान्शिअल संस्था, वेगवेगळी कार्डस, डिजीटल ट्रांझॅक्शनच्या जागा इत्यादी ठिकाणांपैकी कुठेही अकाउंट डिटेल्स दिले असतील तर ते बदलण्याची दक्षता घेणं योग्य ठरतं.
- बंद करायच्या अकाउंटचे संपूर्ण पासबुक किंवा स्टेटमेंटच्या प्रिंटआऊट आणि डिजीटल स्वरुपात बॅकअप घेऊन ठेवणेही अनेकांना योग्य वाटतं. विशेषतः लोन इंस्टॉलमेंट इत्यादी दिल्या असतील तर त्याच्या नोंदी सांभाळणं आवश्यकच असतं .
- त्यानंतर जे अकाउंट बंद करत आहोत त्यावरचा इतर डेटा पहावा. तिथून कुणाला फंड ट्रांसफर केले असेल आणि ते महत्वाचे किंवा पुन्हा लागणारे असेल तर त्यांचे अकाउंट डिटेल्स इत्यादी घ्यावे लागतात. डिमॅट अकाऊंट जोडलं असेल तर त्याचा काही परिणाम होणार नाही हे पहावं लागतं. असा सगळा बॅकअप घेणं उत्तम ठरू शकतं.
आपण स्थलांतरित झाल्यावर एखादे घर रिकामे करताना आयुष्याच्या पुढच्या प्रवासासाठी लागणारं जे जे असेल ते सोबत घेऊनच बाहेर पडतो. तशीच काळजी जुनं बँक अकाउंट बंद करताना घेणं आपल्याच हिताचं असतं.