ट्रेकिंग इन्शुरन्स हा ट्रॅव्हल इन्शुरन्समधील एक प्रकार आहे; जो स्पेशली धाडसी आणि साहसी गिर्यारोहण किंवा डोंगरदऱ्यातून फिरणाऱ्यांसाठी डिझाईन करण्यात आला आहे. ट्रेक करताना अनेक प्रकारच्या संकटांना तोंड द्यावे लागते. यामध्ये मोठा अपघात होण्याची किंवा काही वेळेस मृत्यू होण्याची शक्यता असते. त्यामुळेच ट्रेकिंगचा साहसी खेळामध्ये समावेश केला जातो. यामुळेच पूर्वी ट्रेकिंगसाठी इन्शुरन्स दिला जात नव्हता. पण आता तो दिला जात आहे. ही ट्रेक करणाऱ्यांसाठी खूप महत्त्वाची बाब आहे.
ट्रेकिंग इन्शुरन्स म्हणजे काय?
ट्रेकिंग या शब्दामध्येच थ्रील आहे. त्यामुळे प्रत्यक्ष ट्रेक करणे ही एक प्रकारची मोहीम मानली जाते. त्यासाठी शारीरिक आणि मानसिकरीत्या तयार असणे गरजेचे असते. त्याचबरोबर वैयक्तिक सुरक्षितता म्हणून सेफ्टी गिअर्स खूप गरजेची असतात. यासोबतच इन्शुरन्स हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. एखादा अवघड किंवा पहिलाच ट्रेक करत असाल तर ट्रेकिंग इन्शुरन्स काढणे आवश्यक आहे. ट्रेकिंग दरम्यान येणाऱ्या विविध संभाव्य जोखीम लक्षात घेता इन्शुरन्स कव्हर असायलाच हवा. जो तुम्हाला मेडिकल इमर्जन्सीमधील खर्च, अपघातामुळे झालेला खर्च आणि कुटुंबाची आर्थिक सुरक्षितता आदी प्रकारचे संरक्षण पुरवतो.
ट्रेकिंग इन्शुरन्सचे प्रकार
इन्शुरन्स कंपन्या ज्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे इन्शुरन्स विकते. त्याचप्रमाणे या कंपन्या ट्रॅव्हल इन्शुरन्स अंतर्गत आता ट्रेकिंग इन्शुरन्सचे वेगवेगळे प्रकार ग्राहकांसाठी आणत आहे. जसे की अगदी हिमालय,कांचनगंगा बेस कॅम्प, केदारनाथ तर महाराष्ट्रातील कळसुबाई, हरिच्छंद्रगड, सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यातील गडकिल्ल्यांसाठी कंपन्यांनी ट्रेकिंगचे इन्शुरन्स आणले आहेत. पण प्रत्येक ट्रेकला इन्शुरन्स गरजेचाच आहे, असे देखील नाही. पण तुम्ही ग्रुपने किंवा एका साहसी संस्थेतर्फे समुहाने ट्रेक करत असाल तर त्यावेळी संबंधित संस्थेकडून इन्शुरन्स काढण्यासाठी सांगितले जाते.
पण तुम्ही जर एकट्याने किंवा कुटुंबासह ट्रेक करत असाल, तर ट्रेकिंग इन्शुरन्स काढणे कम्पलसरी नाही. पण वैयक्तिक सुरक्षा म्हणून तुम्ही इन्शुरन्स काढू शकता.
ट्रेकिंग इन्शुरन्समध्ये काय कव्हर होते?
ट्रेकिंग इन्शुरन्स हा ट्रॅव्हल इन्शुरन्सप्रमाणेच काम करतो. यामध्ये तुमची ट्रिप कॅन्सल झाली किंवा ट्रेक दरम्यान मेडिकल इमर्जन्सी आली, अपघातामुळे तुमच्या दातांना इजा झाली किंवा प्रवासादरम्यान एखादी तुमची एखादी वस्तू हरवली, चोरीला गेली तर त्याची आर्थिक नुकसान भरपाई मिळण्याची तरतूद ट्रेकिंग इन्शुरन्समध्ये असते.
काहीवेळा ट्रेकिंगदरम्यान संबंधित व्यक्तीला मेडिकल इमर्जन्सी म्हणून विमानाने किंवा हॅलिकॉप्टरने आणावे लागते. त्यावेळी होणारा खर्च खूप असतो. असा खर्च देखील या इन्शुरन्समध्ये समावेश होतो.
ट्रेक करणे हे ज्यांच्यासाठी पॅशन आहे; त्यांनी आवर्जून ट्रेकिंग इन्शुरन्स काढणे गरजेचे आहे. इन्शुरन्स काढताना आपण कोणत्या प्रकारचे ट्रेक करतो. त्यात कोणत्या प्रकारची जोखीम असू शकते आणि इन्शुरन्स कंपनीकडून कोणत्या प्रकारच्या जोखमीवर संरक्षण मिळते. याची माहिती घेऊनच ट्रेकिंग इन्शुरन्स काढणे योग्य ठरू शकते. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील ट्रेक करताना तर इन्शुरन्स काढणे बंधनकारक असते.