Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Travel Insurance म्हणजे काय? त्याचे प्रकार आणि फायदे जाणून घ्या

What is Travel Insurance

Image Source : www.idfcfirstbank.com

Travel Insurance: देशामध्ये किंवा परदेशात फिरताना एखाद्या कारणामुळे तुमचे आर्थिक नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई मिळण्याची सुविधा ट्रॅव्हल इन्शुरन्समध्ये उपलब्ध असते.

ट्रॅव्हल इन्शुरन्स हा एक इन्शुरन्स पॉलिसीचा प्रकार आहे; ज्याद्वारे प्रवास करताना आपल्यावरील जोखीम कव्हर होते. साधारण इन्शुरन्समध्ये पॉलिसीधारकाबाबत एखादी दुर्देवी घटना घडल्यास त्याच्या कुटुंबियांना पॉलिसीमध्ये नमूद केल्यानुसार ठराविक रक्कम मिळण्याची तरतूद असते. पण ट्रॅव्हल इन्शुरन्समध्ये तुमची ट्रिप कॅन्सल झाल्यास, तुमचे सामान हरवल्यास, प्रवासादरम्यान मेडिकल इमर्जन्सी आल्यास, तसेच इतर प्रकारचे आर्थिक नुकसान झाल्यास त्याची भरपाई मिळण्याची सुविधा असते.

ट्रॅव्हल इन्शुरन्स अंतर्गत देशामध्ये किंवा देशाबाहेर परदेशात फिरताना वरीलपैकी एखाद्या कारणामुळे तुमचे आर्थिक नुकसान झाल्यास त्याची ट्रॅव्हल इन्शुरन्सद्वारे भरपाई मिळण्याची सुविधा उपलब्ध आहे.  

ट्रॅव्हल इन्शुरन्स म्हणजे काय?

ट्रॅव्हल इन्शुरन्स हे इतर इन्शुरन्सप्रमाणे एक इन्शुरन्सचे प्रोडक्ट आहे. जे प्रवासादरम्यान होणाऱ्या अनपेक्षित अपघातामळे झालेल्या आर्थिक नुकसानाची भरपाई मिळवून देण्यास आपल्याला मदत करते. साधारण इन्शुरन्स पॉलिसीमध्ये आपण आपल्यावरील जोखीम कमी करून त्यातून त्याची आर्थिक नुकसान-भरपाईची तरतूद करतो. त्याचप्रमाणे ट्रॅव्हल इन्शुरन्सद्वारे आपण आपल्या सामानाची किंवा एखाद्या अनपेक्षित अपघातामुळे होणाऱ्या नुकसानीची जोखीम कमी करण्याचा प्रयत्न करतो.

ज्यांना नेहमी विविध कारणांमुळे फिरावे लागते. त्यांच्यासाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स खूप महत्त्वाचा आहे. ज्यांना सतत प्रवास करण्याची आवड आहे किंवा विविध ठिकाणी फिरणे आणि त्यातूनच आपला उदरनिर्वाह करणे, हे ज्यांच्यासाठी पॅशन आहे. त्यांनी तर ट्रॅव्हल इन्शुरन्स काढलाच पाहिजे. यामुळे तुमचे इन्शुरन्सच्या प्रीमिअम व्यतिरिक्त काहीही नुकसान होणार नाही. पण तुमच्याजवळ इन्शुरन्स नसेल तर तुमचे खूप मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते.

ट्रॅव्हल इन्शुरन्समध्ये खालील गोष्टींचा समावेश होतो

  • पासपोर्स हरवल्यास
  • विमान/बस हायजॅक झाल्यास
  • प्रवासादरम्यान सामान/वस्तू हरवल्यास
  • सामानाची चोरी झाल्यास
  • ट्रिप/टूर कॅन्सल झाल्यास
  • प्रवासात मेडिकल इमर्जन्सी आल्यास
  • प्रवासादरम्यान अपंगत्व/मृ्त्यू आल्यास
  • हॉटेल/विमान बुकिंग रद्द झाल्यास

ट्रॅव्हल इन्शुरन्स घेताना काय लक्षात ठेवावे

ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी घेताना त्यात कोणकोणत्या जोखमी कव्हर केल्या जात आहेत. तसेच यासाठी ते किती पैसे चार्ज करतात. हे तपासणे गरजेचे आहे. कारण प्रत्येक इन्शुरन्स कंपनीची पॉलिसी आणि नियम वेगवेगळे असू शकतात. अशावेळी इतर पॉलिसींचे नियम गृहित धरून ती खरेदी करू नये. काही कंपन्या आपण वर पाहिलेल्या कारणांपेक्षा अधिक जोखीम कव्हर करतात आणि त्याचा ते जास्त प्रीमिअम ग्राहकांकडून घेतात. तर काही कंपन्या ठराविक प्रवासासाठी किंवा ठरलेल्या गोष्टींचीच जोखीम कव्हर करतात. त्यामुळे त्यांचा प्रीमिअम कमी असू शकतो. अशावेळी आपल्या गरजा आणि जोखीम लक्षात घेऊनच ट्रॅव्हल पॉलिसी खरेदी करावी.

ट्रॅव्हल इन्शुरन्सचे प्रकार

ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी साधारण दोन प्रकारात विभागली जाते, एक देशांतर्गत प्रवास (Domestic Travel Insurance Policy) आणि दुसरी आंतरराष्ट्रीय प्रवास (International Travel Insuranc Policy). बऱ्याच इन्शुरन्स कंपन्या या सिंगल ट्रिप इन्शुरन्स देणाऱ्यावर भर देतात. म्हणजे ग्राहकांकडून अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणात मागणी केली जाते. पण एखादा ग्राहक एकाच पॉलिसीद्वारे अनेक प्रकारच्या ट्रिपमधील जोखीम कव्हर करण्याची मागणी करू शकतो. त्यानुसार इन्शुरन्स कंपन्या पॉलिसी डिझाईन करून देतात. आज आपण मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या विविध प्रकारच्या ट्रॅव्हल इन्शुरन्सबद्दल जाणून घेणार आहोत.

सिंगल ट्रिप ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी

सिंगल ट्रिप ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी ही एका स्पेसिफिक ट्रिपसाठी काढली जाते. या पॉलिसीमध्ये फक्त त्याच ट्रिपमधील जोखीम कव्हर होते.

मल्टी ट्रिप पॉलिसी

जे सतत फिरतीवर असतात; त्यांच्यासाठी ही माफक दरातील मल्टी ट्रिप पॉलिसी फायदेशीर ठरू शकते. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रिप कव्हर केल्या जातात. जसे की, वर्षभरात तुम्ही 5 ते 6 वेळा बाहेर फिरण्यासाठी जात असाल तर या सर्व ट्रिप या इन्शुरन्समध्ये कव्हर केल्या जातात.

एज्युकेशनल ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी

जे विद्यार्थी शिकण्यासाठी बाहेरगावी जातात. विशेष करून परदेशात जातात. त्यांच्यासाठी वेगळी ट्रॅव्हल इन्शुरन्स पॉलिसी असते. यामध्ये विद्यार्थ्यांना लक्षात ठेवून त्यानुसार वेगवेगळ्या प्रकारच्या जोखीम कव्हर केल्या जातात. परदेशात गेल्यावर तिथे सेट होण्यासाठी साधारण महिन्याभराचा कालावधी लक्षात ठेवून कमाल 30 ते 45 दिवसांचा कव्हर विद्यार्थ्यांना दिला जातो.

ग्रुप पॉलिसी

ग्रुप पॉलिसी ही नावाप्रमाणे संपूर्ण ग्रुपसाठी असते. यामध्ये तुम्ही ग्रुपने फिरण्यासाठी जात असाल तर प्रत्येकाचा वैयक्तिक इन्शुरन्स काढण्याऐवजी संपूर्ण ग्रुपचा इन्शुरन्स काढला जातो. यामध्ये किती जणांचा ग्रुप कव्हर होतो. हे प्रत्येक कंपनीनुसार वेगवेगळे असू शकते.

या अशा विविध ट्रॅव्हल इन्शुरन्स व्यतिरिक्त ग्राहक आपल्या गरजेनुसार पॉलिसी निवडू शकतो. जसे की, कुटुंबातील ज्येष्ठ नागरिकांसाठी किंवा संपूर्ण कुटुंबासाठी. यामध्ये ते मेडिकल इन्शुरन्सचा कव्हरदेखील अॅड करू शकतात.

अशाप्रकारे ट्रॅव्हल इन्शुरन्सचा लाभ वेगवेगळ्या कारणांसाठी घेता येतो. त्याचे फायदे आपण वर जाणून घेतले आहेतच. पण तुम्ही तुमच्यासाठी ट्रॅव्हल इन्शुरन्स निवडताना त्याची व्याप्ती नक्की समजून घ्या.