Pottery Sold In Market : मातीची भांडी आपल्याला जुन्या काळाची आठवण करुन देतात. आजी-आजोबांच्या काळात घरा-घरामध्ये मातीची भांडी वापरली जायची. मात्र, जसजसा काळ बदलत गेला, मातीच्या भांड्यांची जागा तांबा, पितळ, स्टील, अॅल्युमिनिअम, काच, नॉनस्टीकच्या भांड्यांनी घेतली. केवळ घरातील पाण्याचा माठ तेवढा अनेक घरांमध्ये कायम राहीला. मात्र, अॅल्युमिनिअम आणि नॉनस्टीकच्या भांड्यात अन्न-पदार्थ शिजवण्याचे दुष्परिणाम आपल्या शरीरावर काय होतात? याची जाणीव होताच, लोकं परत मातीच्याच भांड्यांकडे वळू लागली आहेत. त्यामुळे केवळ बाजारातच नाही, तर रस्त्याच्या आजुबाजूला, प्रदर्शनी मध्ये देखील सुंदर-सुबक अशी मातीची भांडी बघायला मिळतात.
मातीच्या भांड्यांची क्रेझ कायम
मातीच्या भांड्यात तयार केलेले अन्न चविष्ट तर बनतेच. शिवाय मातीच्या भांड्यात शिजवलेले अन्न खालल्याने मनुष्य निरोगी राहतो, ही बाब आता आधुनिक विज्ञानाने देखील मान्य केली आहे. त्यामुळे काही मिनिटात ओवन मध्ये अन्न शिजविणारे लोकं आणि हॉटेल्स देखील मातीच्या भांड्यात अन्न शिजवू लागले आहेत. त्यामुळे स्टील, पितळ आणि अॅल्युमिनियमच्या भांड्यांचे चलन असतानाही मातीच्या भांड्यांची क्रेझ कायम आहे.
काय आहे दर?
उन्हाळा येताच माठ आणि सुरईची मागणी वाढते. शहरातील अनेक भागांमध्ये लाल आणि काळ्या रंगाच्या केवळ साध्या गोलाकार माठाने नव्हे, तर विविध रंगाच्या, आकाराच्या व विविध प्रकारच्या माठांनी दुकान सजले आहेत. आणि याबरोबरच विक्रीला विविध मातीची भांडी देखील आहेत.
त्यामध्ये तवा, सुरई, हांडी, पाण्याची बाटली, कढाई, ग्लास, इत्यादी भांडी असतात. विविध ठिकाणी या भांड्यांचे दर वेगवेगळे आहेत. परंतु, आपण त्याचे सर्वसाधारण दर बघितल्यास माठ आणि सुरई 150 ते 350 रुपयाला मिळते. हांडी 200 ते 500 रुपयाला मिळते. तवा 150 ते 350 रुपयाला मिळतो. आणि मध्यम आकाराची पाण्याची बाटली 300 ते 450 रुपयाला मिळते.
मातीच्या भांड्यांचे महत्व
आयुर्वेदात म्हटले आहे की, जेवण पौष्टीक आणि स्वादिष्य बनवायचे असेल, तर ते हळूवार शिजवल्या गेले पाहिजे. त्यामुळे मातीच्या भांड्यात अन्न तयार होण्यास थोडा वेळ जास्त लागतो. मात्र हे अन्न आरोग्यास लाभदायक असते. मातीच्या भांड्यात जेवण तयार केल्यास, शंभर टक्के पोषण तत्वे शरीराला मिळतात. त्यामुळे आता मोठ-मोठ्या रेस्टॉरेंटमध्ये देखील ग्राहकांना आकर्षित करण्याकरीता मातीच्या भांड्यांचा वापर करतात. मातीच्या भांड्यात शिजविलेल्या अन्नपदार्थांचे दरही जास्तच असते. तर, आरोग्य हितासाठी अनेक उच्चभ्रू लोकही आता घरी मातीची भांडी घेऊ लागली आहे.