Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

What is KYC? केवायसीबाबत सतत विचारले जाणारे प्रश्न?

Know Your Customer-KYC

बदलत्या काळानुसार बँकिंग आणि गुंतवणुकीच्या प्रक्रियेमध्ये लक्षणीय बदल होत आहेत. ग्राहकांची सुरक्षितता तसेच टेक्नॉलॉजीनुसार स्वीकारण्यात आलेल्या नवनवीन गोष्टींमुळे सतत बदल स्वीकारावा लागत आहे. त्यापैकीच एक म्हणजे KYC - Know Your Customer!

तुम्ही वेगवेगळ्या निमित्ताने KYC हा शब्द बर्‍याच वेळा ऐकला असेल, बरोबर ना! पण, तुम्हाला केवायसी म्हणजे काय? (What is KYC?) बँका केवायसी का करतात? केवायसी पूर्ण करण्यासाठी बँकांना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? आणि केवायसी करण्याच्या वेगवेगळ्या प्रक्रिया काय आहेत? या अशा साध्यासोप्या पण सतत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण जाणून घेणार आहोत.

केवायसी म्हणजे काय? What is KYC?

केवायसी म्हणजे ग्राहकांची पूर्णत: ओळख करून घ्या! असा नियमच रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने (RBI) फायनान्शिअल सेवा देणाऱ्या बॅंका, कंपन्यांना घालून दिला आहे. थोडक्यात सांगायचं झाले तर, केवायसी (KYC) ही बँका आणि इतर फायनान्शिअल संस्थांनी (Financial Institute) त्यांच्यासोबत आर्थिक व्यवहार करणाऱ्या ग्राहकांची ओळख आणि पत्ता पडताळण्याची प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया प्रत्येक Bank आणि Non-Banking Financial Company-NBFC यांना अनिवार्य आहे. बॅंकेत खाते उघडणे, म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करताना, कर्ज घेताना, क्रेडिट कार्डसाठी अॅप्लाय करताना किंवा फडी, आरडीमध्ये गुंतवणूक (Investment in FD, RD and Mutual Fund) करताना केवायसी अनिवार्य आहे.

बँकेत खातं उघडताना केवायसीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत?

बँकेत खाते (Bank Account) उघडताना, ओळख पटवण्यासाठी फोटो आयडेंटीटी (Photo ID) आणि अॅड्रेस प्रूफ म्हणून पॅनकार्ड व आधार कार्ड (For Address proof Pan Card & Aadhar Card) द्यावं लागतं.

केवायसीसाठी पत्त्याचा पुरावा म्हणून कोणती कागदपत्रे लागतात?

  • वीज बिल (तीन महिन्यांपेक्षा जुने नाही)
  • टेलिफोन बिल (तीन महिन्यांपेक्षा जुने नाही)
  • पाणी बिल (तीन महिन्यांपेक्षा जुने नाही)
  • पासपोर्ट (Passport)
  • चालक परवाना (Driving Licence)
  • मतदार कार्ड (Voter ID)
  • वैध भाडे करार (Valid Rent Agreement)
  • ICAI, ICWAI, ICSI, Bar Council आदी संस्थांनी वितरित केलेलं ओळखपत्र (i-card)

KYC form साठी लागणारे Documents

ओळख पुराव्यासाठी कोणती कागदपत्रे आहेत?

  • मतदार ओळखपत्र (Voter ID)
  • पासपोर्ट (Passport)
  • आधार कार्डसोबत येणारा UID
  • पॅन कार्ड (Pan Card)
  • योग्य नाव आणि पत्ता असलेले क्रेडिट किंवा डेबिट कार्ड
  • राज्य-केंद्र सरकार किंवा सरकारशी संबंधित संस्थेकडून देण्यात आलेले ओळखपत्र
  • ICAI, ICWAI, ICSI, Bar Council आदी संस्थांनी वितरित केलेलं ओळखपत्र (i-card)


केवायसी पडताळणीचे विविध प्रकार कोणते आहेत?

केवायसी पडताळणीचे दोन प्रकार आहेत. एक आधार आधारित केवायसी (Aadhar Based KYC) आणि दुसरा व्यक्तीगत आधारित केवायसी (In Person Based KYC).

आधार आधारित केवायसी (Aadhar Based KYC)

आधार कार्डवर आधारित केवायसी प्रक्रिया ऑनलाइन केली जाते. जी ब्रॉडबॅण्ड किंवा इंटरनेट कनेक्शन असणाऱ्यांसाठी खूपच सोयीस्कर ठरू शकते. यासाठी ग्राहकाला त्यांच्या मूळ आधार कार्डची कॉपी अपलोड करणे आवश्यक आहे. जर ग्राहकाला म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आधार आधारित KYC करता येते. फक्त ही सेवा वर्षाला 50 हजारापर्यंतची गुंतवणूक असेल तरच वापरता येते.

व्यक्तीगत आधारित KYC (In Person based KYC)

एखाद्या ग्राहकाला प्रत्येकवर्षी म्युच्युअल फंडमध्ये अधिक गुंतवणूक करायची असेल, तर त्याला वैयक्तिक KYC करणे आवश्यक आहे; जी ऑफलाईन केली जाते. व्यक्तीगत केवायसी करण्यासाठी संबंधित ग्राहकाला KYC सेंटरला भेट देणं गरजेचं आहे. त्या सेंटरमध्ये आधार बायोमेट्रिक्सचा वापर करून किंवा केवायसी रजिस्ट्रेशन करणाऱ्या संस्थेशी संपर्क साधून करता येऊ शकते.

एकदा केवायसी केल्यानंतरही कालांतराने पुन्हा केवायसी करणे आवश्यक आहे का?

होय, बँकांना त्यांचे KYC रेकॉर्ड वेळोवेळी अपडेट करणं गरजेचं आहे. त्याची दोन कारणे आहेत. पहिलं, ग्राहकांच्या खात्यांशी संबंधित फसवणूक रोखण्यासाठी आणि आणि दुसरं म्हणजे, ते त्यांच्या बँक खात्यांशी संबंधित असलेल्या गोष्टींची अद्ययावत माहिती ठेवण्यासाठी. KYC रेकॉर्ड अपडेट करण्यासाठी बँकेकडून वेळोवेळी कळवले जाते.

एकाच बँकेतील प्रत्येक खात्यासाठी केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे का?

नाही, जेव्हा तुम्ही सुरूवातीला बँकेत खाते उघडता तेव्हाच केवायसीची आवश्यकता असते. त्याच बँकेत नवीन खाते उघडताना पुन्हा केवायसीसाठी कागदपत्रे देण्याची गरज नसते.

आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्थांसाठी आणि ग्राहकांसाठीही केवायसी ही एक आवश्यक प्रक्रिया आहे; जी बँका आणि वित्तीय संस्थांना त्यांच्या ग्राहकांची ओळख पडताळून घेण्यासाठी मदतीची ठरते. बँकेतील खात्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून ही एक महत्त्वाची प्रक्रिया मानली जाते.