Credit Score Range: कोणताही आर्थिक व्यवहार करताना बँक ग्राहकाचा क्रेडिट स्कोअर तपासत असते. म्हणजेच तुम्ही क्रेडिट कार्ड, होम लोन, कार लोन, पर्सनल लोन कशासाठीही अर्ज करा तुमचा क्रेडिट स्कोअर जर चांगला नसेल तर बँक तुम्हाला कर्ज देणार नाही. त्यामुळे तरुण वयापासूनच निष्काळजीपणा टाळून आर्थिक व्यवहार जबाबदारीनं करायला हवेत.
पण, मग चांगला आणि खराब क्रेडिट स्कोअर म्हणजे काय? किती अंकाचा स्कोअर खराब समजला जातो. म्हणजेच तुम्ही लोनसाठी अर्ज केल्यास तुम्हाला ते मिळणार नाही. आणि किती स्कोअर असल्यास बँक तुम्हाला सहज कर्ज देईल ते पाहूया.
अत्यंत कमी क्रेडिट स्कोअर
जर एखाद्या व्यक्तीचा क्रेडिट स्कोअर अत्यंत कमी असेल तर त्याला कोणत्याही प्रकारचे कर्ज, क्रेडिट कार्ड, वित्त सेवा मिळण्याची शक्यता कमी असते. कारण, ती व्यक्ती आर्थिक व्यवहार करताना चोख नाही, असा याचा अर्थ बँक काढते. थकीत कर्ज, वेळेवर हप्ते न फेडणे, निष्काळजीपणा, खोटी माहिती देणे अशी कारणे यामागे असू शकतात.
ठीक क्रेडिट स्कोअर
जेव्हा तुमचा क्रेडिट स्कोअर कमी किंवा ठीक श्रेणीत असतो तेव्हा सुद्धा कर्ज मिळण्यात अडचणी येऊ शकतात. बँक कर्जाची फाइल नाकारण्याची शक्यता जास्त असते. जरी कर्ज मिळाले तरी व्याजाचा दर आणि इतर फायदे मिळण्याची शक्यता कमी असते. जर तुमचा स्कोअर या श्रेणीत असेल तर तुम्हाला आणखी आर्थिक शिस्त बाळगण्याची गरज आहे. त्यामुळे तुमचा स्कोअर वाढू शकतो.
चांगला क्रेडिट स्कोअर
701 ते 749 च्या दरम्यान जर तुमचा क्रेडिट स्कोअर असेल तर तो चांगला समजला जातो. तुम्ही आर्थिक व्यवहार विना दिरंगाई वेळेवर करता असा त्याचा अर्थ होतो. बँक तुम्हाला कर्ज देण्यास तयार होते. कर्जाचे हप्ते, क्रेडिट कार्ड बिल्स तुम्ही वेळेवर भरत असल्याचे यातून दिसते.
सर्वाधिक नागरिक या श्रेणीत असतात. दरम्यान, बँकेला काही प्रमाणात जोखीम वाटल्यास व्याजदर जास्त आकारू शकते. एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, चांगला म्हणजे अगदीच ‘सर्वोत्तम’ नव्हे. त्यामुळे प्रत्येक बँकेच्या नियमानुसार कर्ज मिळण्यात अडचण येऊ शकते.
सर्वोत्तम क्रेडिट स्कोअर
749 पेक्षा जास्त क्रेडिट स्कोअर अत्यंत चांगला (सर्वोत्तम) समजला जातो. या श्रेणीत जर तुमचा स्कोअर असेल तर तुम्हाला कर्ज मिळण्यास अडचणी येण्याची शक्यता नसते. बँक तुम्हाला कर्ज देण्यास लगेच तयार होते. तुमचे आर्थिक व्यवहार चोख असल्याचे यातून स्पष्ट दिसते. तसेच कमी व्याजदर आणि इतर फायदे सुद्धा बँक चांगला क्रेडिट स्कोअर असणाऱ्यांना देते.
टीप - क्रेडिट स्कोअर मोजणाऱ्या संस्थेनुसार चांगला/खराब स्कोअरची रेंज वेगळी असू शकते. तसेच बँक क्रेडिट स्कोअरचा अर्थ कर्जदाराची इतर माहिती विचारात घेऊन लावू शकते. फक्त क्रेडिट स्कोअर हे कर्ज मिळण्याचे एकमेव परिमाण नाही.