बहुतांश लोकांनी कॅन्सल चेकचा वापर केला असेल. बँकेत बचत खात्यात रक्कम अधिक असेल तर आर्थिक व्यवहारासाठी चेकबुकची गरज भासते. कारण घर खरेदीची नोंदणी असो, गाडी खरेदी असो किंवा स्कूल फीस भरायची असो आपल्याला चेकनेच व्यवहार करावे लागतात. पण कॅन्सल चेक म्हणजे काय हे अनेकांना माहती नसते.
कॅन्सल चेक हा एक सामान्य चेक असतो. यासाठी आपल्याकडे असलेल्या चेकवर दोन मोठ्या रेषा आडव्या माराव्या लागतात आणि त्या दोन रेषांच्या मध्ये CANCELLED असे इंग्रजीत लिहावे लागते. त्याला आपण कॅन्सल्ड चेक असे म्हणतो. यावर कॅन्सल्ड शिवाय काहीच लिहावे लागत नाही. सही सुद्धा करायची गरज नसते. कॅन्सल लिहण्यामागे एकच कारण म्हणजे या चेकचा कोणीही गैरवापर करू नये. आपण कोणत्याही बँकेच्या चेकला कॅन्सल चेक म्हणून सादर करू शकता. या कॅन्सल चेकच्या आधारे एखादी वित्तीय संस्था किंवा बँक आपल्या खात्याची संपूर्ण माहिती मिळवू शकते. जसे की खाते क्रमांक, आयएफसी कोड, ग्राहक क्रमांक, शाखेचा पत्ता, एमसीआर कोड आदी.
कॅन्सल चेकचा उपयोग
- बँकेत खाते सुरू करण्यासाठी: जर आपल्याला अन्य शाखेत नवीन खाते सुरू करायचे असेल तर आपल्याला कॅन्सल चेकची मागणी केली जावू शकते. पुरावा म्हणून त्याचा वापर होऊ शकतो.
- कर्जासाठी: जर आपण एखाद्या बँकेतून कर्ज घेत असाल तर आपल्याला बँकेत पाच ते दहा कॅन्सल चेक जमा करावे लागू शकतात.
- गुंतवणुकीसाठी: जर आपल्याला शेअर मार्केटमध्ये काही गुंतवणूक करायची असेल केवायसी करावे लागते. यासाठी आपल्याला कॅन्सल चेकची मागणी केली जाऊ शकते. इसीएस (इलेक्ट्रिक क्लिअरिंग सर्व्हिस) सेवा सुरू करण्यासाठी देखील कॅन्सल चेक द्याा लागतो.
- पेमेंटसाठी: अनेकदा कंपनीकडून आपल्याला अनेक प्रकारचे पेमेंट घ्यावे लागते. अशावेळी ऑनलाइन पेमेंट करायचे असेल तर कंपनी आपल्याला कॅन्सल चेकची मागणी करू शकते.
- विमा पॉलिसी: अनेकदा विमा कंपन्यांकडून विमा उतरवत असताना आपल्याला कॅन्सल चेक जमा करावा लागतो.
याखेरीज ऑफलाईन पद्धतीने प्रॉव्हिडंट फंडचे पैसे काढण्यासाठीही कॅन्सल्ड चेकची गरज लागते. तुम्ही एखाद्या बँकेचे खातेदार आहात याची ओळख पटवण्यासाठी किंवा खात्री करुन देण्यासाठी कॅन्सल चेक महत्त्वाचा ठरतो. तसेच तुम्ही नमूद केलेला अकाउंट नंबर तुमच्या नावाशी जोडला गेला आहे की नाही हेदेखील या चेकमुळे तपासले जाते.