कुत्रा, मांजर यासारखे पाळीव प्राणी हे अनेकांच्या कुटुंबाचा एक अविभाज्य भाग असतात. माणसाप्रमाणे त्यांच्याही आरोग्याची काळजी घेणे गरजेचे ठरते. पाळीव प्राण्यांच्या आजारासाठी करावे लागणारे उपचारही महागडे असतात. त्यामुळे पाळीव प्राण्यांच्या उपचारासाठी, तसेच भविष्यातील कोणत्याही अपघात किंवा आजारपणाच्या प्रसंगी विविध पशुवैद्यकीय खर्चासाठी पेट विमा योजना (Pet Animal Insurance Policy) घेणे गरजेचे ठरत आहे.
भारतात कुत्रा, मांजरासाठी विमा पॉलिसी-
भारतामध्ये सध्या कुत्रा आणि मांजर (Dog And Cat )हे सर्रास घरामध्ये पाळले जातात. तसेच वेगवेगळे देशी विदेशी प्रजातीचे कुत्रे, मांजर पाळण्याच्या प्रमाणात देखील वाढ होत आहे. त्यामुळे काही विमा कंपन्यांकडून आता पाळीव प्राण्यांसाठी देखील विशेष विमा योजना सुरू करण्यात आल्या आहेत. पाळीव प्राण्याचा विमा हा त्या प्राण्याचा मालक घेऊ शकतो. या विमा पॉलिसीमध्ये प्राण्याच्या आजारपणातील वैद्यकीय उपचार, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची फी या पासून संरक्षण दिले जाते. याच बरोबर जर तुमचा कुत्रा मांजर हरवले अथवा चोरी झाल्यासही नुकसान भरपाईचे काही अतिरिक्त विशेष लाभ निवडक विमा पॉलिसीमधून दिले जातात.
फायदे काय आहेत?
पाळीव प्राण्यांच्या विमा काढल्यास प्राण्याच्या आजारपणावर होणाऱ्या खर्चापासून संरक्षण मिळते. उपचारा दरम्यान औषधावर होणार खर्च, तपासण्या, डॉक्टरांची फी, या खर्चासाठी तुम्हाला विमा पॉलिसीचे कव्हरेज मिळते. त्याच बरोबर प्राण्याच्या नियमित तपासणीसाठी होणारा खर्चाचा ही यामध्ये समावेश होतो. काही विमा पॉलिसीमध्ये मोफत वार्षिक आरोग्य तपासणीच्या योजना समाविष्ट करण्यात आलेल्या असतात. तसेच तुमच्या पाळीव प्राण्याकडून तिसऱ्याच पक्षाचे अथवा मालमत्तेचे नुकसान झाल्यास त्यामध्येही विमा संरक्षणाचे लाभ घेता येतात. तसेच काही विमा कंपन्याकडून मृत्यू आणि अंत्यविधीचा खर्च, शस्त्रक्रियेचा खर्च, तसेच रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी आणि नंतरच्याही खर्चासाठी देखील विमा संरक्षण दिले जाते.
50000 रुपयांपर्यंतचे कव्हरेज
भारतात बजाज अलियांझ पेट डॉग इन्शुरन्स पॉलिसी, फ्युचर जनरल इंडिया डॉग हेल्थ इन्शुरन्स, न्यू इंडिया अॅश्युरन्स डॉग इन्शुरन्स पॉलिसी, ओरिएंटल इन्शुरन्स डॉग इन्शुरन्स या कंपन्यांकडून पाळीव प्राण्यासाठी विमा सुविधा पुरवल्या जातात. यामध्ये प्रामुख्याने वार्षिक 50000 रुपयांपर्यंतचे कव्हरेज दिले जाते.