अडी-अडचणीच्या वेळी सामान्यांना कर्जासाठी बँक जवळची वाटते. बँक सर्वसामान्यांना वेळेत आर्थिक मदत मिळावी म्हणू अनेक प्रकारची कर्जे देत असते. त्या बदल्यात व्याज गोळा करते. सामान्य माणूसही अनेक वेळा बँकेतून कर्ज घेतो पण काही अडचणीमुळे त्या कर्जाचे हप्ते भरले जात नाहीत. एक-दोन हप्ते चुकले तरी बँक कर्जदाराला लगेच काही डिफॉल्टर (Loan Defaulter) यादीत टाकत नाही. पण काही दंड घेऊन कर्ज सुरु ठेवते. पण काही वेळेला कर्ज घेतल्यानंतर कर्जदार बँकेला हप्ताच देत नाही; अशा वेळेला बँक काय करते याची माहिती घेऊया.
लोन डिफॉल्टर कोण असतो?
तुम्ही जर एखाद्या तारखेला ईएमआय (EMI) भरू शकला नाही तर तुम्ही लगेच डिफॉल्टर बनत नाही. पण एका नंतर एक असे अनेक EMI थकवले तर तुम्हाला कर्ज देणारी बँक डिफॉल्टर म्हणून रिपोर्ट करू शकते. त्यापैकी काही तुम्हाला कर्ज परतफेड करण्यासाठी काही वेळ देऊ शकतात. पण तुमच्याकडे EMI भरण्यास उशीर केल्याबद्दल ठराविक रक्कम दंड म्हणून आकारू शकतात. त्यामुळे क्रेडिट स्टेटस सुधारण्याची संधी मिळते.
किती हप्ते चुकल्यास बँक कारवाई करते
बँकेकडून कर्ज घेतल्यानंतर बँक आपल्याकडून कर्जाचे हप्ते ठरवून घेते. ज्याप्रमाणे आपण दरमहा हप्ते भरत असतो. ज्या कालावधीसाठी आपण कर्ज घेतले आहे; त्या कालावधीत ते फेडले तर बँक आपले कर्जाचे खाते बंद करते. पण तुमचे ईएमआय (EMI) म्हणजेच हप्ते जर तुम्ही सलग तीन महिने भरले नाहीत तर तुमचे कर्जाचे खाते एनपीए (Non-Performing Assets) होते. अशा वेळी कर्जाचे हप्ते द्यावे म्हणून या कालावधीत बँकेकडून तगादा लावला जातो. फोन केले जातात. तसेच नोटीसही पाठवली जाते. जर तुम्ही या नोटीशीकडे दुर्लक्ष केले तर कर्जदाराला एनएपी (NPA) समजले जाते आणि इथून पुढे बँक तुमच्या विरोधात कारवाई करायला लागते.
बँक कोणत्या प्रकारची कारवाई करू शकते
अशा वेळेला बँक सिबिल कंपनीला रिपोर्ट करते. कर्जदार हप्ते भरत नसल्याने त्याचे खाते एनपीए केले जाते. कर्जदाराची कर्जाबद्दलची माहिती सिबिल कंपनीला दिली जाते. सिबिल या सगळ्या माहितीवर आधारित प्रत्येक व्यक्तीची क्रेडिट इन्फॉर्मेशन रिपोर्ट (सीआयआर) म्हणजेच क्रेडिट स्कोर तयार करत असते. यासाठी बँक आपण केव्हाही कर्ज घ्यायला गेल्यावर आधी क्रेडिट स्कोर बघत असते. त्यामुळे हे लक्षात घ्या की तुम्ही कर्ज फेडू शकला नाहीत तर तुमचा रिपोर्ट खराब होईल. अशावेळी तुम्हाला कोणतीही बँक कर्ज देत नाही.
जर आपण कर्ज घेत असू तर त्याचे हप्ते वेळेत भरणे महत्त्वाचे आहे. जर 3 महिन्यांपेक्षा जास्त कर्जाचे हप्ते थकवल्यास तुमचा सिबिल स्कोर खराब होऊ शकतो. परिणामी भविष्यात मोठे कर्ज घ्यायचे असेल तर अडचण होऊ शकते.