Shooting on Western Railway: उत्पन्नवाढीसाठी वेगवेगळ्या मार्गांचा अवलंब करणारी भारतीय रेल्वे नेहमीच चर्चेत असते. कधी रद्दी विकून तर कधी पाणीपुरवठा करून रेल्वे विभागाने कोट्यवधींचे उत्पन्न मिळवले आहे. अलिकडेच पश्चिम रेल्वेने चित्रपटाच्या शुटिंगमधून भक्कम कमाई केली आहे. शुटिंगमधून पश्चिम रेल्वेला 1.64 कोटी रुपये मिळाले आहेत. रेल्वे विभागाने यासाठी स्वतंत्र समितीची स्थापना केली आहे.
Table of contents [Show]
2022-23 या वर्षात 20 पेक्षा अधिक चित्रपटांचे चित्रीकरण
पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिलेल्या माहितीनुसार, 2022-23 मध्ये पश्चिम रेल्वेच्या विविध स्थानकांवर 20 हून अधिक चित्रपटांचे चित्रीकरण करण्यात आले. ज्यात फीचर फिल्म्स, वेबसिरीज, टीव्हीवरील व्यावसायिक जाहिराती, सिरिअल्सचा समावेश आहे. चित्रपटाच्या शुटिंगसाठी रेल्वेने आपला परिसर आणि ट्रेनचे डबे उपलब्ध करून दिले होते. यातून पश्चिम रेल्वे विभागाला 1.64 कोटी रुपयांचा महसूल मिळाला. तर त्याच्या अगोदरच्या वर्षात 2021-22 मध्ये पश्चिम रेल्वेला 67 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले होते. रेल्वे विभागाकडील आकडेवारीनुसार, 2019-20 मध्ये 1 कोटी आणि 2018-19 मध्ये 1.31 कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. यात फक्त कोविड महामारीमुळे 2020-2021 मध्ये घट झाली होती.
या चित्रपटांचे शूटिंग रेल्वे स्थानकांवर झाले!
अलीकडच्या काळात पश्चिम रेल्वे विभागावरील विविध रेल्वे स्थानकांवर लंच बॉक्स, हिरोपंती, गब्बर इज बॅक, एअरलिफ्ट, पॅडमॅन, रा-वन, फँटम, एक व्हिलन रिटर्न्स, ये जवानी है दिवानी, राधे, लक्ष्मी बॉम्ब, काय पोचे, आत्मा, घायाल रिटर्न्स, कमिने, हॉलिडे, थुपकी (तमिळ चित्रपट), डी-डे, शेरशाह, बेल बॉटम, OMG 2 आणि गुजराती चित्रपट कच्छ एक्सप्रेस आणि लोचा लप्सी, मराठी चित्रपट आपडी थापडी यासारख्या अनेक लोकप्रिय चित्रपटाचे शुटिंग रेल्वे स्थानकावर झाले आहे.
मुंबईतील या रेल्वे स्थानाकांना दिग्दर्शकांची पसंती
मुंबईमधील मुंबई सेंट्रल टर्मिनस, चर्चगेट हेडक्वार्टर आणि स्टेशन बिल्डिंग, साबरमती स्पोर्ट्स ग्राउंड, गोरेगाव स्टेशन, जोगेश्वरी एटी (यार्ड), लोअर परळ वर्कशॉप, कांदिवली आणि विरार कारशेड, केळवे रोड, पारडी रेल्वे स्टेशन, कलाकुंड रेल्वे स्टेशन, कालाकुंड रेल्वे स्थानक, ही चित्रपट दिग्दर्शकांच्या सर्वाधिक पसंतीची रेल्वे स्थानके आहेत.
रेल्वेला कमाईसाठी मदत मिळतेय
चित्रपटातील शुटिंगच्या माध्यमातून रेल्वे विभागाला विशेष मेहनत न करता चांगला महसूल मिळत आहे. यासाठी रेल्वे विभागाने स्वतंत्र समितीची स्थापना केली आली आहे. ही समिती चित्रीकरणाची व रेल्वेची वेळ यांचे नियोजन करून देते.