Water Tankers Prices increased : मुंबई उपनगरातील अनेक भागामध्ये गेल्या दोन-तीन महिन्यापासून पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. गोरेगाव, जोगेश्वरी, कांदिवली, चांदिवली, खार, घाटकोपर या भागातील लोकवस्तीमध्ये मोठ्या प्रमाणावर टँकरने पाणीपुरवठा केला जातोय. पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या टँकर्सनी पाण्याचे दर आता वाढवले आहेत. 20 हजार लीटर टँकरसाठी आता मुंबईकरांना आता सहा हजार रूपये मोजावे लागणार आहेत.
Table of contents [Show]
टँकर्सची मागणी
आजघडीला मुंबईमध्ये 2500 टँकर्सच्या मदतीने पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये अनधिकृत टँकरचा समावेश नाहीये. या टँकर्समध्ये 10 हजार ते 25 हजार लीटर पाणी पुरविण्याची क्षमता आहे. पिण्याच्या पाण्याच्या टँकरची आणि इतर वापरातील पाण्याच्या टँकरच्या किंमती या वेगवेगळ्या असतात. या टँकरची किंमत ही जागेच्या अंतरानुसार वेगवेगळी असते. साधारण 800 ते 1000 रूपयापासून या टँकरची किंमत सुरू होते.
यापूर्वी हे टँकर्स चालक दिवसातून 4 ते 6 फेऱ्या मारत असत. मात्र, वाढत्या मागणींमुळे आता दिवसाला या टँकर्सना 8 ते 12 फेऱ्या माराव्या लागतात.
मुंबईकरांचा वाढता पाण्याचा खर्च
आज मुंबईकरांचा सर्वाधिक खर्च हा पाण्यावर होतो असं म्हणणं वावगं ठरणार नाही. मुंबईकरांना महानगरपालिकेचा पाणीपट्टी कर भरावा लागतो. घरगुती वापरासाठी पाण्याचा दर प्रति 1000 लीटर मागे 5.22 रूपये आहे. झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्यांसाठी प्रति 1000 लीटर मागे 2.91 रूपये आकारले जातात. व्यवसायिकांसाठी 9.2 रूपये आकारले जातात.
या पाणीपट्टी बिलांसोबत, जेव्हा महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा खंडीत केला जातो तेव्हा नागरिकांना 1600 रूपये टँकर चालकांना द्यावे लागतात. तर पिण्यासाठी बिसलरी बाटलीबंद पाण्याला 1,350 रूपये मोजावे लागतात.
देशातली सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबई महानगरपालिकेची ओळख आहे. मात्र, तरिही ही श्रीमंत महानगरपालिका आपल्या नागरिकांना पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरतेय. आज मुंबईमध्ये 7 तलाव व धरणाऱ्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र हा पाणीपुरवठा अपूरा आहे. दिवसाला मुंबई शहरामध्ये 4 हजार मिलीयन लीटर पाण्याचा पुरवठा पालिकेकडून केला जातो. जवळपास तेवढंच पाणी हे टँकरच्या माध्यमातून पुरवले जाते.
पाणीटंचाई का निर्माण झाली
जागोजागी पाण्याच्या पाईप लाईन फुटणे, पाणी गळती, पाईपलाईनची दुरूस्ती या कामांसाठी महानगरपालिकेकडून पाणीपुरवठा काही काळ खंडीत केला जातो. मात्र, अलीकडे विविध बांधकामांमुळे सुद्धा पाण्याची पाईपलाईन फुटल्याचं निदर्शनास आलं आहे.
थोड्या दिवसापूर्वी ठाण्यामध्ये रस्त्याच्या कामामुळे पाईपलाईन फुटली. त्यामुळे त्या विभागात दोन दिवस पाणीपुरवठा बंद केलेला. दुसऱ्याच दिवशी एका खासगी बांधकामामुळे भांडूप संकुलजवळ असलेला वॉटर टनेल डॅमेज झाला म्हणून संपूर्ण मुंबईतला पाणीपुरवठा खंडीत केला होता. तर फेब्रुवारी महिन्यामध्ये टँकर असोसिएशनच्या संपामुळे मुंबईकराचे पाण्यासाठी हाल झाले होते.
टँकरने पाणीपुरवठा
मुंबईमध्ये पाण्याच्या टँकर्सना मोठी मागणी आहे. उपनगरांसह मुख्य शहारतल्या सुद्धा मोठमोठ्या सोसायट्यांमध्ये, हॉस्पिटल्स, हॉटेल्स, बांधकामाच्या ठिकाणी, रस्त्यांची कामं, कोस्टल रोडचे काम अशा सगळ्यांच ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा केला जातो.