जगभरातील सर्वांत मोठी रिटेलर कंपनी वाॅलमार्टने हेज फंड टायगर ग्लोबलची ई-काॅमर्स कंपनी फ्लिपकार्टमध्ये केलेली गुंतवणूक विकत घेण्यासाठी 140 कोटी डाॅलर मोजले आहेत. वॉल स्ट्रीट जर्नलने हेज-फंडने त्यांच्या गुंतवणुकदारांना दिलेल्या पत्राच्या आधारे ही बातमी दिली आहे. तसेच, वाॅलमार्टच्या प्रवक्त्याने राॅयटर्सला दिलेल्या मेलच्या उत्तरामध्ये व्यवहार झाला असल्याचे सांगतिले. मात्र, कोणत्याही आर्थिक कराराविषयी सांगितले नसल्याचे राॅयटर्सने म्हटले आहे.
भारतातील संधीचे महत्व हेरले!
या व्यवहारामुळे फ्लिपकार्टचे मूल्य 3500 कोटीपर्यंत जाईल असे, असे वॉल स्ट्रीट जर्नलने रिपोर्टमध्ये म्हटले आहे. तसेच या व्यवहारावर वॉलमार्टच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्ही फ्लिपकार्टच्या भविष्याविषयी निश्चिंत असून आम्हाला विश्वास आहे आणि जेव्हा पहिल्यांदा आम्ही गुंतवणूक केली त्यापेक्षा आज भारतातील संधीविषयी जास्त सकारात्मक आहोत. यावरून वाॅलमार्टचा भारताच्या रिटेल मार्केटमध्ये पाया भक्कम करण्याचा प्रयत्न दिसत आहे.
फ्लिपकार्टला दिले होते बळ!
फ्लिपकार्टच्या प्रारंभास तिला उभं करण्यासाठी अॅसेल आणि टायगर ग्लोबलने तिला हातभार लावला होता. या कंपन्यांनी फ्लिपकार्टमध्ये बऱ्यापैकी गुंतणूक केली होती. मात्र, या वर्षाच्या सुरूवातीला इकॉनॉमिक्स टाईम्सने दिलेल्या बातमीत ह्या खाजगी इक्विटी कंपन्या त्यांचा स्टेक वाॅलमार्टला विकत असल्याची बोलणी करत असल्याचे म्हटले होते. ते आता सत्यात उतरताना दिसत आहे. तसेच, टायगर ग्लोबलचा कंपनीत 4 % हिस्सा असल्याचे इकॉनॉमिक्स टाईम्सने बातमीत म्हटले होते.
फ्लिपकार्टने वाढवले साम्राज्य
वॉलमार्टने 2018 मध्ये फ्लिपकार्टचा 77 टक्के हिस्सा सुमारे 1600 कोटी डॉलरमध्ये खरेदी केला होता. याचबरोबर कंपनीमध्ये टेनसेंट, स्वाॅफ्ट बॅंक ग्रुप, अॅसेल व बिन्नी बंसल यांचाही स्टेक आहे. 2007 मध्ये सचिन बंसल आणि बिन्नी बंसल यांनी कंपनीची सुरूवात केली. आजमितीस कंपनीने ई-काॅमर्सच्या क्षेत्रामध्ये त्यांचं अस्तित्व निर्माण केलं आहे. याबरोबर अनेक कंपन्याही विकत घेतल्या आहेत.