Visa आणि Mastercard या क्रेडिट कार्डची सेवा देणाऱ्या कंपन्यांनी कार्डच्या शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ थेट क्रेडिट कार्डधारकांवर लागू होणार नाही. तर क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट स्वीकारणाऱ्या व्यापाऱ्यांकडून प्रत्येक स्वॅपवरील शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे क्रेडिट कार्ड स्वीकारणाऱ्या व्यापाऱ्यांचा खर्च वाढणार आहे. पण हा खर्च व्यापारी स्वत:च्या खिशातून कधीच भरणार नाहीत. परिणामी त्याची वसुली थेट कार्डधारकांकडून केली जाण्याची शक्यता आहे.
क्रेडिट कार्डधारकांवर याचा थेट किती परिणाम होणार आहे. हे अद्याप कळले नाही. कार्डधारक जेव्हा क्रेडिट कार्डचा वापर करतात. तेव्हा व्यापाऱ्यांना ग्राहकांनी पेमेंट केले की, लगेच त्याची फी बँकेला दिली जाते. ही वाढ बहुतांश ऑनलाईन शॉपिंगवर होणार असल्याचे कळते. म्हणजे व्यापारी किंवा दुकानदारांनी ऑनलाईन शॉपिंगचे बिल क्रेडिट कार्डद्वारे स्वीकारले तर त्यांना त्याबदल्यात कंपनीला जादा चार्जेस द्यावे लागणार आहेत. ही दरवाढ ऑक्टोबर महिन्यापासून होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शुल्काचा उपयोग सुरक्षिततेसाठी आणि सुविधांसाठी
व्हिसा, मास्टरकार्ड आणि इतर मोठमोठ्या बँकांच्या मते क्रेडिट कार्डसाठी आकारले जाणारे शुल्क हे ग्राहक आणि व्यावसायिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना अत्याधुनिक सुविधा देण्यासाठीच वापरले जाते. तसेच इंटरचेंज फीजमधून मिळणाऱ्या रकमेचा उपयोग बँक रिवॉर्ड्स प्रोगॅमसाठी करते.
व्यापाऱ्यांवरील बोजा वाढणार
क्रेडिट कार्डशी संबंधित व्यापाऱ्यांसोबत काम करणाऱ्या कन्सलटन्ट कंपनी CMSPI च्या मते, यामुळे व्यापाऱ्यांच्या खर्चात वाढ होणार आहे. दरवर्षी कंपन्यांना हजारो रुपये शुल्क म्हणून भरावे लागू शकते. अर्थात हे शुल्क तेव्हाच लागू होणार आहे. जेव्हा ग्राहक क्रेडिट कार्डचा वापर करून शॉपिंग करतील तेव्हाच त्यावर अधिकचे शुल्क आकारले जाणार आहे.
ग्राहकाने क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यानंतर त्याचे तीन भाग पडतात. त्यातला एक भाग नेटवर्क पेमेंट जे थेट Visa आणि Mastercard कंपनीकडे जाते. दुसरी इंटरचेंज शुल्क ते ज्या बँकेने कार्ड इश्यू केले आहे. त्या बँकेकडे जाते आणि तिसरे पेमेंट व्यापाऱ्याचे. व्हिसा आणि मास्टर्डकार्ड या दोन्ही कंपन्या जागतिक असून त्या अमेरिकेतील आहेत. पण यांचे ग्राहक संपूर्ण जगभरात असल्याने त्याचा परिणाम सर्व ग्राहकांवर होणारच.
कार्डधारकांवर काय होणार परिणाम
क्रेडिट कार्ड स्वीकारणारे व्यापारी किंवा दुकानदार स्वत:भुर्दंड भरणार नाहीत. एक तर ते क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट स्वीकारण्यास नकार देतील किंवा त्यांना जे अधिकचे शुल्क भरावे लागणार आहे; त्याची वसुली थेट ग्राहकांकडूनच करतील. त्यामुळे ही शुल्कवाढ व्यापाऱ्यांसाठी असली तरी त्याचा नकळत फटका कार्डधारकांनाच बसण्याची शक्यता अधिक आहे.