खाणकाम क्षेत्रातील आघाडीची कंपनी वेदांताला 30 जून 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत 2640 कोटींचा नफा झाला. यंदा नफ्यात तब्बल 40% घसरण झाली. या निराशाजनक कामगिरीने वेदांताच्या शेअरमध्ये आज सोमवारी सलग दुसऱ्या सत्रात घसरण झाली. मात्र कंपनीने गुंतवणूकदारांना प्रति शेअर 18.5 रुपयांचा लाभांश जाहीर केला.
वेदांता लिमिटेडला एप्रिल ते जून या तिमाहीत 2640 कोटींचा नफा झाला. त्यात 40% घसरण झाली. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 4421 कोटींचा नफा झाला होता. कंपनीला महसुलात 13% घसरण झाली आहे. पहिल्या तिमाहीत कंपनीला 33342 कोटींचे उत्पन्न मिळाले होते. गेल्या आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत कंपनीला 38251 कोटींचा महसूल मिळाला होता.
वेदांता मॅनेजमेंटने प्रति शेअर 18.5 रुपयांचा डीव्हीडंड जाहीर केला आहे. मात्र त्याचा फारसा परिणाम कंपनीच्या शेअरवर झाला नाही. आज सोमवारच्या सत्रात वेदांताचा शेअर 2.50% घसरणीसह 271.30 रुपयांवर बंद झाला. त्याआधी शुक्रवारच्या सत्रात वेदांच्या शेअरमध्ये 1.4% घसरण झाली होती. वेदांताचा शेअर 278.15 रुपयांवर स्थिरावला होता.
वेदांताने आपल्या व्यवसायातील वैविध्यता जपली आहे. भविष्यात तंत्रज्ञानाची कास धरत त्यादृष्टीने व्यवसाय करण्यासाठी कंपनी कटीबद्ध असल्याचे वेदांताचे सीईओ सुनील दुग्गल यांनी सांगितले. ते म्हणाले की पहिल्या तिमाहीत कंपनीने 6975 कोटी करपूर्व नफा म्हणून मिळवले होते. ऑपरेटिंग मार्जिनमध्ये 24% वाढ झाल्याचे दुग्गल यांनी सांगितले. कंपनीने कार्यक्षमता वाढवण्यासाठी कौशल्य विकासाला प्राधान्य दिले आहे. त्यातून शाश्वत वृद्धीच्या दिशेने पाऊल टाकू असे त्यांनी सांगितले.