उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. त्यानुसार या आयपीनेसुद्धा गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न दिले आहेत. 25 रुपये प्रति शेअर किंमत असणाऱ्या या आयपीओचे शुक्रवारी (दि. 21 जुलै) 40 रुपयांवर एनएसईवर लिस्टिंग झाले. तर बीएसईवर 39.95 रुपयांवर लिस्टिंग झाले.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेने आयपीओच्या माध्यमातून 500 कोटी रुपयांचे भांडवल उभारण्याचा मानस व्यक्त केला होता. त्यानुसार 12 ते 14 जुलै दरम्यान आयपीओसाठी अर्ज करण्याची मुदत होती. हा आयपीओ 1032 पटीने ओव्हरसबस्क्राईब झाला होता. याचा अर्थ एका शेअरसाठी 102 जणांनी मागणी केली होती. त्याचे आज शुक्रवारी (दि. 21 जुलै) दमदार लिस्टिंग झाले.
उत्कर्ष बँकेच्या आयपीओची प्राईस बॅण्ड 23-25 रुपये प्रति शेअर अशी होती आणि याच्या एका लॉटमध्ये 600 शेअर्स होते. ज्यासाठी गुंतवणूकदारांना 15,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागली असती. या आयपीओमध्ये पात्र संस्थात्मक खरेदीदारांनी 124.8, तर गैर-संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 81.6 पटीने आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी 72.1 पटीने सब्स्क्राईब केला होता.
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेविषयी
उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक ही उत्तर भारतातील वेगाने वाढणारी बँक आहे. रिझर्व्ह बँकेने नोव्हेंबर 2015 मध्ये उत्कर्ष कोअरइन्व्हेस्ट या कंपनीला स्मॉल फायनान्स बँकेचा परवाना दिला होता. जानेवारी 2017 पासून बँकेने प्रत्यक्ष बँकिंग सेवेला सुरुवात केली होती. बँकेचे वाराणसीमध्ये मुख्यालय असून बँकेने आर्थिक वर्ष 2019 ते 2023 या वर्षाच 6000 कोटींचे कर्ज वाटप केले आहे. सध्या 26 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेचा विस्तार आहे. बँकेचे 830 आउटलेट्स असून 15424 कर्मचाऱ्यांचा ताफा आहे. मार्च 2023 अखेर 35 लाख 90 हजार ग्राहक आहेत.