अवकाळी पाऊस (Untimely rains) यासह जोरदार वारा आणि गारपीट (Hailstorm and strong wind) यांमुळे देशातला आंबा उत्पादक शेतकरी अडचणीत आलाय. आंबा पिकाचं सरासरी 20 टक्के नुकसान झालंय. आयसीएआरच्या (ICAR) वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याविषयी सविस्तर माहिती दिलीय. उत्तर भारतासह महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी गारपीट आणि वादळामुळे मोठं नुकसान झालं आहे, असं विविध ठिकाणच्या आंबा उत्पादकांनी सांगितलं. आंबा (Mango) हे भारतातलं एक महत्त्वाचं फळ पीक आहे. आंब्याला फळांचा राजाही म्हटलं जातं. तर भारत हा एक प्रमुख आंबा उत्पादक देश आहे. जगाच्या एकूण आंबा उत्पादनात भारताचा 42 टक्के वाटा आहे.
Table of contents [Show]
आयसीएआरची माहिती
यंदा मात्र हवामानातल्या बदलाचा फटका आंबा उत्पादकांना बसला. अवकाळी पाऊस, गारपीट आणि जोरदार वादळ यामुळे देशाच्या विविध भागात धान्यासह बागायती पिकांवर परिणाम झाला. पहिल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालं नाही, मात्र नंतरच्या पाऊस आणि गारपिटीमुळे आंबा पिकावर विपरित परिणाम झालाय. आत्तापर्यंत एकूण नुकसान सुमारे 20 टक्क्यांच्या जवळपास होईल, असा आमचा अंदाज आहे, असं भारतीय कृषी संशोधन परिषदेचे (ICAR) उपमहासंचालक (उत्पादन) डॉ. ए. के. सिंग यांनी पीटीआयला सांगितलंय.
Untimely rains, hailstorm and strong wind damaged about 20% of mango crop in India: ICAR
— Press Trust of India (@PTI_News) March 31, 2023
सर्व राज्यांच्या आकडेवारीची प्रतीक्षा
उत्तर भारतात आंबा पिकाचं जास्त नुकसान झाल्याचं समोर आलंय. विशेषतः उत्तर प्रदेश हे देशातलं अग्रगण्य आंबा उत्पादक राज्य आहे. एकट्या उत्तर भारतात अंदाजे आंबा पिकाचं नुकसान सुमारे 30 टक्के आहे, तर दक्षिण भारतात हे नुकसान 8 टक्क्यांपेक्षा कमी आहे, असं सिंग म्हणाले. मात्र अद्याप विविध राज्यांतली आकडेवारी येणं बाकी आहे. त्यानंतरच नेमकं नुकसानीचं प्रमाण कळणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
जास्त आर्द्रतेमुळे आंब्याला फटका
आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रतिक्रियाही येत आहेत. 5 हेक्टर आंब्याची बाग असलेले लखनौचे आंबा उत्पादक उपेंद्र सिंग यांनी सांगितलं, की माल-मलीहाबाद आंबा हब परिसरात गारपिटीमुळे 75 टक्क्यांपर्यंत नुकसान झालंय. पावसासोबतच इथं गारपीटही झाली, त्यामुळे खूप जास्त प्रमाणात नुकसान झालं आहे. गेल्या 30 वर्षाचा विचार केल्यास 19 मार्चपर्यंत आंबा पिकाची स्थिती उत्तम होती. 20 मार्चपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं मोठं नुकसान केलं आहे. फुलांच्या अवस्थेत जास्त आर्द्रतेमुळे काळी बुरशी येते, असं त्यांनी सांगितलं.
कीड अन् बुरशी
ताफारी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक अतुल कुमार अवस्थी यांनीही नुकसानीविषयीची माहिती दिली. आंबा बहरत होता. पण त्याचवेळी जोरदार वादळ आणि वाऱ्यामुळे फळे गळाली. यामुळे पिकाचे सुमारे 25 टक्के नुकसान झाल्याचा अंदाज आहे, असं ते म्हणाले. जास्त आर्द्रतेमुळे काही भागात आंब्याच्या झाडांवर किडींचाही प्रादुर्भाव झालाय, बुरशी आलीय. या सर्वांचा परिणाम निर्यातीवर होणार आहे. दर्जेदार आंब्याच्या उपलब्धतेवर परिणाम होणार आहे, असे ते म्हणाले.
50 टक्क्यांपर्यंत नुकसान
आयसीएआर आयसीएआर-सेंट्रल इन्स्टिट्यूट फॉर सबट्रॉपिकल हॉर्टिकल्चरचे संचालक टी. दामोदरन म्हणाले, की सीतापूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या माळ-मलिहाबाद पट्ट्यात 50 टक्क्यांपर्यंत नुकसान झालंय. लखनौ, हरदोई, कुशीनगर, गोरकपूर, अलिगढ, सहारनपूर आणि बाराबंकी या सात प्रमुख आंबा पिकवणाऱ्या जिल्ह्यांपैकी सहा जिल्ह्यांमध्ये पीक स्थिती चांगली आहे, असे ते म्हणाले. 2021-22 पीक वर्षात (जुलै-जून) देशातलं आंब्याचं उत्पादन 210 लाख टन होतं. सरकारच्या अंदाजानुसार मागील वर्षी ते 203.86 लाख टन होते.
महाराष्ट्रातली स्थिती काय?
राज्यात आंब्यासह इतर पिकांचं अवकाळीमुळे मोठं नुकसान झालं. पालघर, रायगडमध्ये विशेषकरून हे नुकसान झालंय. तर नाशिक जिल्ह्यातल्या कळवण, दिंडोरी तर पालघरमधल्या विक्रमगड, जव्हार याठिकाणी आंबा पिकाचं नुकसान झालंय.