Electronic Goods Price: सुट्या पार्ट्सचे दर खाली आल्याने इलेक्ट्रॉनिक आणि घरगुती उपकरणांच्या किंमती खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काही महिन्यांतील सण उत्सवाच्या काळात बाजारपेठा फुलून गेलेल्या दिसू शकतात. सोबतच जहाज वाहतूक स्वस्त झाल्याने कंपन्यांचा खर्चही कमी होत आहे. निर्मिती खर्च कमी झाल्याचा फायदा ग्राहकांना मिळेल. टीव्ही, मोबाइल आणि कॉम्प्यूटरसह इतरही घरगुती उपकरणे पुढील काही महिन्यात स्वस्त होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
निर्मिती खर्च कमी
कोरोनाकाळात सूटे इलेक्ट्रिकल पार्ट्स आणि आंतराष्ट्रीय मालवाहतुकीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे वस्तूंच्या किंमतीही सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्याबाहेर गेल्या होत्या. सेमिकंडक्टर चीप चा तुडवटा निर्माण झाल्याने चारचाकी वाहनांची निर्मितीही रोडावली होती. मोबाइल, लॅपटॉप निर्मिती कंपन्यांनाही याचा फटका बसला होता. कंपन्यांनी चढ्या दराने सुटे पार्ट्स खरेदी केले होते. मात्र, आता सर्व इलेक्ट्रिकल उत्पादनांचे सूटे पार्ट कोरोनापूर्व किंमतीवर आले आहेत. दिवाळी दसऱ्यापर्यंत इलेक्ट्रॉनिक वस्तूंची मागणी मोठ्या प्रमाणात खाली येऊ शकते. निर्मिती खर्च कमी झाल्यामुळे या क्षेत्रातील कंपन्यांचा नफाही वाढेल, असे मत या क्षेत्रातील कंपन्या व्यक्त करत आहेत.
कोरोनाकाळातील महागाई ओसरली
कोरोनाकाळात चीनमधून जहाजाने माल आणताना 8,000 डॉलर खर्च येत होता. तो आता 850-1,000 डॉलर इतका झाला आहे. इलेक्ट्रॉनिक पार्ट्सच्या किंमती मागील दोन वर्षांच्या तुलनेत 60-80% पर्यंत खाली आल्या आहेत. जागतिक स्तरावरील मंदीसदृश्य परिस्थितीमुळे वस्तूंची मागणी कमी झाली आहे. त्यामुळे सुट्या पार्ट्सचे दरही खाली आले आहेत.
इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्मिती करणाऱ्या डिक्सॉन, हेवल्स आणि ब्लू स्टार या कंपन्यांनी पुढील काही दिवसांत नफा वाढेल, असे सूतोवाच दिले आहेत. 2021-22 वर्षात इलेक्ट्रॉनिक वस्तूंची सरासरी विक्री किंमत 16 हजारांपेक्षा जास्त होती. ती कमी होऊन 11,500 पर्यंत आली आहे. टीव्ही निर्मीतीमध्ये ओपन सेल म्हणजेच डिस्प्ले पॅनल सर्वाधिक महाग असतो. त्याच्या किंमतीही खाली आल्या आहेत.
दरम्यान मागील काही आठवड्यांपासून जहाज वाहतूकीचे दर वाढत आहेत. मागणी कमी झाल्याने मालवाहतूक करणाऱ्या कंपन्या जास्त दर आकारत असल्याचे हायर इलेक्ट्रॉनिक्स कंपनीचे प्रमुख सतीश NS यांनी म्हटले. मात्र, ही दरवाढ खूप जास्त नाही.
भारतीय बाजारपेठेची स्थिती कशी आहे?
मागील वर्षी दिवाळीनंतर टीव्ही, मोबाइल फोन्स आणि इतर घरगुती उपकरणांची मागणी रोडावली आहे. ग्राहकांकडून फक्त गरजेच्या वस्तू खरेदीवरच भर देण्यात येत आहे. ऐच्छिक वस्तू खरेदीकडे पाठ फिरवली आहे. ग्रामीण बाजारपेठेने अद्याप पूर्ण उभारी घेतली नाही. शहरी भागातही नागरिकांचे शॉपिंग बास्टेकही हलकेच आहे. फक्त गरजेच्या वस्तू खरेदीकडे ग्राहकांचा कल आहे. इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या किंमती खाली आल्यानंतर बाजारपेठेत पुन्हा गती येऊ शकते.