Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Railway Concession for Patients: 'या' रुग्णांना रेल्वे तिकिटावर मिळते सवलत, सेवेकऱ्यालाही मिळतो लाभ

www.india.com

Indian Railways: गंभीर आजाराने पीडित असणाऱ्या रुग्णांना भारतीय रेल्वे तिकीट दरावर सवलत देत आहे. ज्यामुळे रुग्णांना कमी पैशात प्रवास करता येईल. तसेच रुग्णासोबत असणाऱ्या सेवेकरी व्यक्तीला देखील ही सवलत मिळत आहे.

भारतीय रेल्वे देशातील कानाकोपऱ्यात जोडली गेली आहे. रास्त तिकिटाचा दर आणि सर्वोत्तम सुविधेमुळे अनेकजण रेल्वेने प्रवास करण्यासाठी प्राधान्य देतात. रेल्वेतून प्रवास करताना तिकिटांच्या दरात काहींना सवलत देण्यात येते.  जसे की अपंग व्यक्तीला रेल्वेने प्रवास करताना तिकीट दरात सवलत देण्यात येते. अगदी त्याचप्रमाणे एखादी व्यक्ती जर गंभीर आजाराने पीडित असेल, तर अशा व्यक्तीला देखील रेल्वेच्या तिकीट दरात सवलत देण्यात येते.

रुग्णांचा औषधोपचारावरील बोजा कमी करण्यासाठी ही सुविधा रेल्वेकडून देण्यात येत आहे. यामध्ये जवळपास 100 % पर्यंत सवलत दिली जात आहे. जेणेकरून रुग्णांचा प्रवासावरील खर्च कमी करण्यासाठी मदत होईल.तसेच रुग्णांसोबत असणाऱ्या सेवेकरी व्यक्तीला देखील या अंतर्गत तिकिट दरात सवलत देण्यात येते. गंभीर आजारामध्ये नेमके कोणते आजार सामील करण्यात आले आहेत, जाणून घेऊयात.

एड्सबाधित रुग्ण (Aids)

एड्स झालेले रुग्ण उपचारासाठी जर रेल्वेमधून प्रवास करत असतील, तर त्यांना तिकिटावर 50% सूट दिली जाते. ही सूट सेकंड क्लासच्या डब्यातील तिकिटावर देण्यात येते.

टीबी आणि कुष्ठरोगी (TB and Leprosy)

टीबी झालेल्या रुग्णांना आणि कुष्ठरोग झालेल्या रुग्णांना रेल्वेच्या तिकिटावर सूट देण्यात येते. फस्ट क्लास, सेकंड क्लास आणि स्लीपर क्लास तिकिटावर 75% सूट देण्यात येते. तसेच रुग्णासोबत असणाऱ्या व्यक्तीला देखील ही सूट मिळते.

कॅन्सर रुग्ण (Cancer)

कॅन्सर झालेला रुग्ण उपचारासाठी रेल्वेने प्रवास करत असेल, तर त्याला रेल्वे तिकिटावर 50 ते 100 टक्क्यापर्यंत सूट दिला जाते. कॅन्सर झालेल्या रुग्णांना रेल्वेच्या फस्ट क्लास, सेकंड क्लास आणि एसी चेअर कारमध्ये 75 टक्क्यापर्यंत सूट देण्यात येते. तर 3 AC मध्ये 100% सूट दिली जाते. 1AC आणि 2AC मधील तिकिटावर कॅन्सर झालेल्या रुग्णांना 50% सवलत दिली जाते. जर अशा रुग्णांसोबत त्यांची देखभाल करण्यासाठी सेवेकरी असेल, तर त्याच्या तिकिटावर देखील सूट देण्यात येते. त्या व्यक्तीला स्लीपर आणि 3AC मधील तिकीट दरावर 75% सूट देण्यात येते. 

थेलिसीमिया, हृदयविकार, आणि किडनीचे रुग्ण

थेलिसीमिया एक आनुवंशिक आजार असून यामध्ये रुग्णाचे हिमोग्लोबिन कमी झाल्याने त्याला सतत रक्त चढवण्याची गरज असते. असे रुग्ण जर रेल्वेने प्रवास करत असतील, तर त्यांना तिकीट दरावर सूट देण्यात येते. यासोबतच हृदय विकाराच्या आजारावर आणि किडनीच्या आजारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांना रेल्वेच्या तिकीट दरावर सूट देण्यात येते. रेल्वेच्या फस्ट क्लास, सेकंड क्लास,स्लीपर, AC चेअर कार आणि 3AC मधील तिकिटावर 75% सूट देण्यात येते. तर 1AC आणि 2AC मध्ये 50% सूट देण्यात येते.

हिमोफिलिया (Hemophilia)

या आजारात जर रुग्णाला कोणतीही जखम झाली, तर रक्त वाहायला सुरुवात होते. हे रक्त लवकर गोठत नसल्याने जास्तीत जास्त रक्त वाहते. अशा परिस्थितीत रुग्णाच्या जीवाला धोका देखील संभवू शकतो. अशा रुग्णांना रेल्वेतून प्रवास करताना तिकिटांच्या दरावर सवलत दिली जाते.  रुग्णासोबत असणाऱ्या व्यक्तीलाही तिकिटावर सूट देण्यात येते. रेल्वेच्या फस्ट क्लास, सेकंड क्लास,स्लीपर, AC चेअर कार आणि 3AC मधील तिकिटावर 75% सूट देण्यात येते.

ऑस्टोमी (Ostomy)

ऑस्टोमीच्या रुग्णांना रेल्वेने प्रवास करताना 50% पर्यंत सवलत देण्यात येते. मात्र ही सूट त्यांना मासिक आणि त्रैमासिक पासवर देण्यात येत आहे. तसेच त्यांच्यासोबत असणाऱ्या व्यक्तीला देखील रेल्वे तिकिटावर सूट देण्यात येते

Source: hindi.moneycontrol.com