Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Holi Festival: यावर्षीची होळी महागणार, पिचकरीपासून मिठाईच्या किमतीत 20 ते 50% वाढ

Holi Festival

Holi Festival: भारतीय बाजारपेठेने चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकल्यामुळे सध्या बाजारपेठेत भारतीय बनावटीच्या वस्तू उपलब्ध आहेत. उत्पादनात घट झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत वस्तूंचे भाव 30 ते 50 टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे यंदाची होळी सर्वसामान्यांसाठी महागणार आहे.

तुम्हालाही रंग खेळायचे आहेत का? आता दोन दिवसांवर होळी आली आहे. मात्र या सणावर महागाईचे रंग पसरलेले पाहायला मिळत आहेत. सध्या बाजारात अनेक नवनवीन उत्पादने पाहायला मिळत आहेत, परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत त्याच्या किमती 50 टक्क्याहून जास्त आहेत. यावेळी मोटू पतलू, बार्बी डॉल, डोरेमॉन, हल्क, फिश, छत्री, टँक आणि स्कूल बॅग अशा वेगवेगळ्या आकाराच्या पिचकाऱ्या बाजारात उपलब्ध झाल्या आहे. मात्र त्याच्या किंमती वाढल्यामुळे ग्राहकांमध्ये थोडी निराशा पाहायला मिळत आहे.

'या' कारणामुळे वाढल्या किंमती

भारतीय बाजारपेठेने चिनी उत्पादनांवर बंदी घातल्यामुळे सध्या बाजारपेठेत भारतीय बनावटीच्या वस्तू उपलब्ध आहेत, यापूर्वी बाजारात चिनी वस्तू पाहायला मिळत होत्या. मुबलक पुरवठा झाला की, साहजिकच उत्पादनाच्या किंमती कमी होतात हा मार्केटचा रुल आहे.

सध्या बाजारात चायनीज पिचकऱ्यांवर बहिष्कार टाकल्यामुळे फक्त भारतीय पिचकाऱ्या उपलब्ध आहेत. उत्पादनात घट झाल्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत 30 ते 50 टक्क्यांनी वस्तूंचे भाव वाढले आहेत.त्यामुळे वस्तूच्या किंमती 150 रुपयांपासून ते 1000 रुपयांपर्यंत पाहायला मिळत आहेत. वाढलेल्या किंमतीमुळे लोकांमध्ये थोडीशी निराशा पाहायला मिळत आहे. मात्र पिचकारी मेड इन इंडिया असल्याने लोकांमध्ये तसा आनंदही पाहायला मिळत आहे.

खाद्यपदार्थ ही महागले

महागाईचा परिणाम आपल्याला खाद्यपदार्थांवर पाहायला मिळू शकतो. दूध, खवा, साखर, तेल, सुका मेवा इ. खाद्यपदार्थ ही महाग झाले आहेत. दिल्लीतील सर्वात जुनी खवा मंडई आजकाल होळीच्या रंगात रंगली आहे. होळीशी निगडीत मागणी पूर्ण करण्यावर मिठाईवाल्यांचा संपूर्ण भर आहे, मात्र खव्याच्या वाढत्या किमतींमुळे खरेदी पूर्वीसारखी होत नसल्याचे देखील पाहायला मिळाले आहे. गेल्या 10 दिवसांत खव्याच्या दरात किलोमागे 100 रुपयांची वाढ झाली आहे. खवा 250 रुपये किलोवरून 350 रुपये किलो झाला आहे. खवा महाग झाला म्हणजे साहजिकच  मिठाईचे भाव वाढतात. मिठाईच्या दरातही किलोमागे दीडशे रुपयांची वाढ झाल्याचे पाहायला मिळते.

गेल्या सहा महिन्यांत दुधाच्या दरात लिटरमागे 5 ते 10 रुपयांनी वाढ झाली आहे. साखर आणि रिफाइंड तेलही महाग झाले आहे. सुक्या मेव्याच्या किरकोळ दरात 15 ते 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. काजू 800 रुपये तर बदाम 700 रुपये किलोवर आहेत, याचाच अर्थ घरी बनवल्या जाणार्‍या पदार्थांनाही महागाईचा फटका बसला आहे.