गृह कर्जाची प्रक्रिया करत असताना अनेकदा बँकेकडून तुमच्या जामीनदार कोण आहे का? अशी विचारणा केली जाते. बहुतांशवेळा कर्जदाराचे उत्पन्न कमी असल्यास किंवा कर्जाची रक्कम जास्त असल्यास बँकेकडून जामीनदाराची विचारणा केली जाते. जर तुमच्याकडे कोणी जामीनदार असेल तर तुमचे कर्ज प्रकरण लवकर मंजुर होऊ शकते. तसेच गृह कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचे सिबिल (CIBIL) खराब असल्यास जामीनदाराशिवाय कर्ज प्रकरण मंजुरच होत नाही. मात्र, तुम्ही जर अशा प्रकारच्या गृह कर्जासाठी कोणाला जामीनदार होणार असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
जामीनदार म्हणजे काय?
एखाद्या कर्जदाराने काढलेल्या कर्जाची हमी घेणारा व्यक्ती म्हणजे जामीनदार होय. अनेकवेळा आपण नातेवाईक, मित्र यांच्या विनंतीवरून गृहकर्ज अथवा अन्य कर्जाची हमी घेण्यास तयार होतो. त्या कर्जाच्या जोखमीची हमी घेणे म्हणजे तुम्ही त्या संबंधित कर्जदारासाठी जामीनदार होता. जामीनदार म्हणजे तुम्ही त्या कर्जाची जबाबदारी आणि जोखीम स्वीकाराण्यास तयारी दर्शवलेली असते. जर तुम्ही गृहकर्जासाठी जामीनदार म्हणून जी हमी घ्यावी लागणार आहे, त्याबाबतची संपूर्ण माहिती असणे आवश्यक आहे.
दोन प्रकारचे जामीनदार-
भारतात वयाची 18 वर्षे पूर्ण झालेली व्यक्ती जामीनदार होऊ शकते. यामध्ये दोन प्रकारचे जामीनदार असतात एक म्हणजे नॉन फायनान्शिअल जो संपर्क साधण्यासाठी एक मध्यस्थाची भूमिका निभावतो आणि दुसरा म्हणजे फायनान्शिअल जामीनदार जो या कर्जाची हमी घेतो. बऱ्याच वेळा वित्तीय संस्था हमी घेणाऱ्या व्यक्तीचे उत्पन्न किती आहे आणि स्त्रोत काय आहे याची देखील खात्री करून घेतात. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीच्या गृह कर्जासाठी आर्थिक जामीनदार व्हायचे असेल तर जामीनदार म्हणून पुढील जबाबदाऱ्या तुम्ही लक्षात घेणे गरजेचे आहे.
आर्थिक जामीनदार असल्यास-
जर तुम्ही गृहकर्जासाठी जामीनदार झाला असाल तर तुम्ही कर्जाची परतफेड होई पर्यंत त्या कर्जास जबाबदार असाल. कर्जदार व्यक्ती कर्ज फेडण्यास असमर्थ ठरला तर ते कर्ज फेडण्यास तुम्ही जबाबदार ठरू शकता. कर्जाची परतफेड वेळेत होत नसेल आणि कर्ज डिफॉल्ट झाल्यास बँक तुम्हाला नोटीस पाठवू शकते. तुम्हाला ते कर्ज चुकवावे लागते. त्यामुळे कर्जदाराला जामीनदार राहताना सावधानी बाळगणे गरजेचे असते. असे न केल्यास त्याचे आर्थिक नुकसान जामीनदार म्हणून तुम्हाला सहन करावे लागते. तसेच गृह कर्जाचे हप्ते वेळेत फेडले नाही किंवा कर्ज एनपीए झाल्यास तुम्हाला कर्ज फेडण्याची जबाबादारी घ्यावी लागते. काही वेळा कर्जाची पुर्ण रक्कम वसुल करण्या करीता वित्तीय संस्थाना जामीनदाराची संपत्ती जप्त करण्याचे अधिकार असतात.
यासह पुढील गोष्टीचाही विचार करा
- जामीनदार होण्यापूर्वी कर्जदाराची आर्थिक परिस्थिती जाणून घ्या
- गृह कर्जाची रक्कम किती आहे? व्याज दर काय आहे याची माहिती घ्या
- गृह निर्माण संस्थेची पूर्ण माहिती घ्या, त्यांचा रेकॉर्ड तपासा
- जामीनदार होण्यापूर्वी वित्तीय संस्थेचे नियम अटी जाणून घ्या
- कर्जदार व्यक्तीचे मागील व्यवहाराचे रेकॉर्ड जाणून घ्या
- कर्जदार व्यक्तीच्या उत्पन्नाचे स्त्रोत जाणून घ्या
- तुम्हाला कर्जदार व्यक्ती कर्जाची परतफेड करण्यास सक्षम वाटत असेल तरच जामीनदार व्हा
- मित्र, नातलग म्हणून जामीनदार होण्यापूर्वी आर्थिक बाबींचा आवश्य विचार करा
- तुमचा सिबिल खराब होणार नाही याची काळजी घ्या